देवाची जपमाळ ओढत बसायचे की जशास तसे वागायचे?
डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत हा नुसता निसर्ग विज्ञानापुरताच मर्यादित नाही तर तो परमेश्वराच्या अध्यात्म धर्माची चिकित्सा करण्यासाठीही उपयुक्त आहे. पुराणे ही घडली की रचली यावर वाद आहेत. इतिहासाला पुरावे आहेत पण पुराणांना पुरावे नाहीत. पुराण कथा या बोध कथा म्हणून घ्यायच्या की सत्य कथा म्हणून घ्यायच्या यावर सत्याचे पुरावे हाच निकष आहे.
प्रश्न हा आहे की निसर्गापासून परमेश्वराला वेगळा करून त्याची आध्यात्मिक उपासना करण्याची कल्पना प्राचीन, अर्वाचीन समाजात का व कशी निर्माण झाली? मुद्दा हा आहे की सजीव शरीरापासून जसे मनाला वेगळे करता येत नाही तसे निसर्गाच्या अंतरात्म्याला म्हणजे परमात्म्याला किंवा परमेश्वराला वेगळे करता येत नाही. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या वेगळ्या कशा असू शकतात? निसर्गाला विज्ञानात जगायचे व त्याच्या अंतरात्म्याला म्हणजे परमात्म्याला, परमेश्वराला मात्र अध्यात्मात भजायचे, पूजायचे ही मानवी मनाची संभ्रमावस्था नव्हे काय?
पूर्वी लोक टोळ्यांनी जगायचे. नंतर सुद्धा टोळ्या संपल्या नाहीत. सद्या सुद्धा अंडरवर्ल्ड मध्ये अधूनमधून टोळी युद्धे होतच असतात. अशाच काही परकीय टोळ्यांनी आपल्या भारतावर अनेकदा आक्रमणे केली. ब्रिटिश ही सुद्धा व्यापाराचे निमित्त करून हळूच भारतात घुसलेली व नंतर भारतालाच गुलाम करून राज्य केलेली धूर्त परकीय टोळीच होय. मग भले त्याला राष्ट्र हे आधुनिक नाव द्या. अशा या परकीय टोळ्यांचे हल्ले परतवून लावता न आल्याने, त्यांच्या आक्रमणापुढे टिकाव लागू न शकल्याने, बराच काळ त्यांचे गुलाम होऊन रहावे लागल्याने पराभूत मानसिकतेतून गुलाम लोकांकडून निसर्गात परमेश्वराचा दैवी आधार शोधला गेला असावा का? त्यातूनच पुढे सगुण-निर्गुण परमेश्वराची कल्पना उदयास येऊन त्याची आध्यात्मिक उपासना सुरू झाली असावी का? पण हळूहळू पुढे निसर्गाचे वैज्ञानिक वास्तव जसजसे जनमानसाला कळत गेले तसतसे अध्यात्म धर्मातील अंधश्रद्धा दूर होत जाऊन चांगल्यास चांगले, वाईटास वाईट, म्हणजे जशास तसे हे निसर्ग वास्तववादी तत्वज्ञान उदयास आले असावे का? हे जशास तसे तत्वज्ञान डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांतील बळी तो कानपिळी या निसर्ग नियमाशी जुळते. जगातील राष्ट्रांनी निर्माण केलेली लष्करे व शस्त्रसज्जता याच बळी तो कानपिळी निसर्ग नियमावर आधारित आहेत. त्यात परमेश्वर व त्याचे अध्यात्म कुठे येते? जशास तसे हे वास्तववादी तत्वज्ञानच आधुनिक नीतीधर्म व कायदेकानून, नियमांचा आधार आहे. आता या नैसर्गिक वास्तवातून परमेश्वराला बाजूला करून त्याची जपमाळ किती ओढत बसायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा