https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०

सोपान मोरे, माझा डॕशिंग बाप!

सोपान मोरे या डॕशिंग बापाचा मुलगा आहेस तू!

शिक्षण सातवी, बलभीम नागटिळक या मामाने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील  साडे खेडेगावातून मुंबईत आणलेला मुलगा, मग व्हिक्टोरिया मिलमध्ये बदली कामगार म्हणून नोकरी, चौकस बुद्धीमत्ता, वृत्तपत्रीय वाचनातून परिसर अभ्यास, स्वतःच विकसित केलेली वक्तृत्व कला, मग राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या माध्यमातून गिरणी कामगार पुढारी म्हणून नाव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सारख्या काँग्रेसच्या मोठमोठ्या नेत्यांबरोबर जवळून उठबस आणि या सर्व गोष्टी कोणाच्याही पाठबळाशिवाय फक्त आणि फक्त स्वतःच्या हिंमतीवर, कर्तुत्वावर मिळवून एक आदरयुक्त दरारा निर्माण केलेला डॕशिंग माणूस म्हणजे माझा बाप सोपान मारूती मोरे! त्याच्या तालमीत तयार झालेला गडी आहेस रे तू. या माझ्या बापाने कोणाची पर्वा केली नाही. जे स्वतःला पटले तेच करीत पुढे गेला. ज्यांना हे जमले नाही ते मागे राहिले, माझ्या बापाला वचकून राहिले. बाहेरच्या माणसांना ओळखून त्यांच्याशी सुरक्षित अंतर ठेऊन थोडे लांबच राहिलेल्या माझ्या बापाने नातेवाईकांना सुद्धा हातभर लांब ठेवले व एकटा स्वतःच्या रूबाबात राहून स्वतःचा आब राखून जगला माझा बाप! मग भले त्याला नातेवाईक काहीही म्हणोत. कारण कामगार पुढारी म्हणून मिळविलेले स्थान हे बापाने स्वकर्तुत्वावर मिळविले होते. कोणा नेत्यांची हाजी हाजी केली नाही की कोणा नातेवाईकाचे पाठबळ मिळाले नाही म्हणून चिडचिड केली नाही, मग का करावी कोणाची पर्वा! संसार केला आणि जमेल तेवढे माझ्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले, पण घरात कोणाचेच अतिरेकी लाड केले नाहीत. माझी आई (चंद्रभागा सोपान मोरे) ही ढवळस गावची पूर्ण अशिक्षित, अंगठे बहाद्दर स्त्री असल्याने माझ्या बापाला कामगारांचे पुढारीपण करताना बायकोकडून जो काही थोडाफार मानसिक आधार लागतो तो पण मिळाला नाही. पण ती बिच्चारी घरात तिच्या थोरल्या बहिणी बरोबर खाणावळ घालून संसारात कष्ट उपसत होती. माझ्या बापाला कौटुंबिक जिव्हाळा होता पण त्यात अतिरेकी भावनाप्रधानता नव्हती. स्वतःच्या कुटुंबाविषयी माझ्या बापाचे हे कडक धोरण, मग दुसऱ्या  नातेवाईकांचे तर विचारूच नका. माझ्या डॕशिंग बापाच्या ओळखी मोठ्या, मग त्या ओळखीचा फायदा करून घेण्यासाठी गुळाला मुंगळे जसे चिकटतात तसे हळूच चिकटलेले काही मुंगळे त्यांचा फायदा झाला की माझ्या बापाला टाटा करून गेले व विसरले. गरज सरो आणि वैद्य मरो, दुसरे काय! माझ्या बापाच्या याच खंबीला पावलावर पाऊल टाकून मी जगत आलोय. बापाचे क्षेत्र राजकीय तर कायद्याच्या उच्च शिक्षणामुळे माझे क्षेत्र वकिली! पण दोन्हीही क्षेत्रे ही सामाजिकच! माझ्या बापासारखाच माझा स्वभाव! मग कोणाची बॉसिंग मी काय सहन करून घेणार! डझनभर नोकऱ्या मी मिळविल्या पण बॉस लोकांची दादागिरी सहन झाली नाही की त्यांच्या तोंडावर राजीनामा फेकून देऊन त्यांना रामराम करीत सोडल्या.  घरात कोणीही वकील, न्यायाधीश नसताना किंवा इतर कोणत्याही मित्राचा, नातेवाईकांचा पाठिंबा नसताना हिंमतीने वकिलीत पडलो. बायको गावची बारावी शिकलेली मुलगी व गृहिणी. त्यात मुलगी झालेली. बायकोच्या नातेवाईकांनीही माझ्या या भलत्या धाडसामुळे (काहींनी याला खाता पंढरी अशी नावे ठेवली) मला त्यांच्यापासून हातभर लांब ठेवले. या  वकिलीत सगळीकडून प्रतिकूल परिस्थिती, सगळा अंधार! त्यातून हळूहळू शिकत गेलो व गेली ३२ वर्षे वकिलीत पाय घट्ट रोवून उभा आहे. खडतर परिश्रम घेतले पण अशिलांकडून फी कशी वसूल करायची याची अक्कल नाही. मग या कोर्टातून त्या कोर्टात वणवण व सतत पैशाची चणचण! पण तरीही कसाबसा संसार केला. एकुलत्या एक मुलीला एम.बी.ए. चे उच्च शिक्षण देण्यासाठी जमेल तेवढे आर्थिक पाठबळ व प्रोत्साहन दिले. तिनेही स्वकर्तुत्वावर ते उच्च शिक्षण घेऊन मग मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापक पदाची नोकरी मिळवली. सांगायचे तात्पर्य काय, तर माझा फक्त सातवी शिकलेला डॕशिंग बाप, हिंमत करून वकील झालेला मी स्वतः व एम.बी.ए. चे शिक्षण घेऊन व्यवस्थापक झालेली माझी मुलगी ही प्रगतीची चढती कमान आहे. हे यश कोणतेही माध्यम छापून आणणार नाही कारण तिथे माझी जरा सुद्धा पोहोच नाही. पण गरजच काय मोठ्या माध्यमात जायची. समाज माध्यम आहे ना माझ्या जवळ माझे हे सत्य सांगण्यासाठी! अरे रूबाबात जग रे, भरपूर यश मिळवलेस तू आयुष्यात!

(माझ्या हयात नसलेल्या डॕशिंग बापाचा व माझ्या हयात नसलेल्या अशिक्षित पण अत्यंत प्रेमळ असलेल्या आईचा फोटो समोर ठेऊन स्वतःच स्वतःशी केलेले हे स्वगत आहे. माझ्या बापाला वडील म्हणण्याऐवजी मी या लेखात बाप म्हटलेय कारण तो बाप माणूस होता. एका फोटोत माझा बाप राष्ट्रीय नेते श्री. पी.ए. संगमा यांच्याबरोबर खळखळून हसताना जेंव्हा मी बघतो तेंव्हा उतार वयातही (६४) मला शक्ती मिळते).

-ॲड.बी.एस.मोरे©५.१०.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा