https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

बौद्धिक कौशल्याने व्हा ज्ञानबेटाचे राजे!

बौद्धिक कौशल्याशिवाय ज्ञान बेटाचे राजे होता येत नाही!

माहिती, ज्ञान व कौशल्य असे बौध्दिक प्रगतीचे तीन टप्पे असतात. निसर्गाचे ज्ञान हेच विज्ञान! हे विज्ञान म्हणजे महासागर! या महासागराची वरवरची माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. माहिती ही मनाची प्राथमिक जाणीव असते. ही जाणीव प्रगल्भ होण्यासाठी अर्थात माहितीचे रूपांतर ज्ञानात होण्यासाठी बुद्धीला त्या माहितीवर काम करावे लागते. महासागर लांबून दिसतो तसा नसतो जसा उंच डोंगर लांबून दिसतो तसा नसतो. म्हणून दुरून डोंगर साजरे अशी म्हण आहे. महासागरात लांब गेल्यावर व डोंगरावर उंच गेल्यावर जे प्रत्यक्षात दिसते व अनुभवास येते त्याला ज्ञान म्हणतात. माहितीचे रूपांतर ज्ञानात अशाप्रकारे होते. चौकस बुद्धी नुसत्या माहितीवर गप्प बसत नाही. ती माहितीच्या अधिक खोलात जाते व माहितीतून ज्ञान बाहेर काढते. ज्ञान म्हणजे माहितीचे ताक घुसळून बाहेर काढलेला लोण्याचा गोळा होय. पण नुसते ज्ञान जवळ असून फार उपयोग नसतो. बुद्धीला त्या ज्ञानाचा सराव केल्याशिवाय त्यात कौशल्य प्राप्त करता येत नाही. ज्ञानात बौद्धिक कौशल्य नसेल तर कृती सहज व उत्कृष्ट होऊ शकत नाही. निसर्ग विज्ञानात असलेल्या अनेक ज्ञानशाखा ही ज्ञानाच्या महासागरातील विविध ज्ञान बेटे होत. या ज्ञान बेटांचे राजे होण्यासाठी एखादे बेट निवडून त्या बेटावरील पर्यावरण आत्मसात करून त्यावर बुद्धीचे प्रभुत्व प्राप्त करावे लागते. बेटावरील पर्यावरणाच्या ज्ञानात बौद्धिक कौशल्य प्राप्त केल्याशिवाय अशा निवडलेल्या बेटाचे राजेपण प्राप्त होत नाही. कला, क्रीडा, वैद्यक शास्त्र, अभियांत्रिकी, कायदा, धर्म, अर्थकारण, राजकारण अशा कितीतरी ज्ञानशाखा मानवी बुद्धीला निसर्ग विज्ञानातून सापडल्या आहेत. या सर्व ज्ञान शाखांत कौशल्य प्राप्त करणे मानवी बुद्धीला शक्य नाही. म्हणून तर प्रत्येकाच्या वैयक्तिक  आवडीनुसार व बौद्धिक गतीनुसार निरनिराळी माणसे विविध ज्ञान शाखांतून विशेष प्रावीण्य मिळवित चित्रपट अभिनेते, संगीतकार, गायक, खेळाडू, डॉक्टर, इंजिनियर, वकील, सी.ए., व्यवस्थापक, शिक्षक, अर्थकारणी, राजकारणी होतात. ही सर्व तज्ज्ञ मंडळी फक्त त्यांच्याच ज्ञान शाखेत तज्ज्ञ असतात. इतरांच्या ज्ञान शाखा म्हणजे त्यांच्यासाठी वरवरची माहिती असते किंवा त्यांच्याविषयी त्यांना फार जुजबी ज्ञान असते. सर्वसामान्य माणसे निरनिराळ्या ज्ञान शाखांच्या फक्त माहितीवर किंवा जुजबी ज्ञानावर जगत असतात. पण सामान्य ज्ञान व सर्वसाधारण अक्कल (कॉमन सेन्स) ही सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे. ती प्रत्येकाकडे असलीच पाहिजे, मग तो माणूस तज्ज्ञ असो की सर्वसामान्य माणूस असो. माहिती, ज्ञान व कौशल्य या तीन पायऱ्या पार केल्याशिवाय बुद्धीला पर्यावरणातील पदार्थांना, प्राणीमात्रांना व माणसांना योग्य प्रतिसाद देता येत नाही. उदा. एखादी व्यक्ती ही अन्नावाचून उपाशी आहे व तिला तुम्ही अन्न देण्याऐवजी आध्यात्मिक भक्तीमार्ग शिकवताय हा प्रतिसाद योग्य होईल का? तुम्ही योग्य प्रतिसाद देण्यासाठी तुम्हाला तुमच्या संपर्कात येणाऱ्या पदार्थ, प्राणी व माणसांविषयी अगोदर माहिती व नंतर सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. तरच तुमची अशा पदार्थ, प्राणी व माणसांबरोबर व्यावहारिक देवाणघेवाण शक्य आहे. फेसबुकवर तुमचे मित्र झालेल्या किती लोकांविषयी तुम्हाला प्राथमिक माहिती आहे? त्यांच्याविषयी ज्ञान असणे हा तर खूप पुढचा भाग झाला. मग अशा जवळजवळ अनोळखी असलेल्या व्यक्तीं बरोबर किती संपर्क ठेवायचा, त्यांच्याबरोबर एखाद्या विषयावर किती वादविवाद घालायचे हे तुमच्या बुद्धीला कळले पाहिजे. तुम्ही एखाद्या गोष्टीची प्रथम माहिती मिळवा, नंतर सखोल अभ्यासाने त्या माहितीतले ज्ञान मिळवा व नंतर त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष सराव करून त्यात बौद्धिक कौशल्य प्राप्त करा. कारण तुमचे बौद्धिक कौशल्य तुम्हाला तुमच्या कृतीत आत्मविश्वास व सहजता प्राप्त करून देते. ज्ञानात बौद्धिक कौशल्य प्राप्त केल्याशिवाय त्या ज्ञान बेटाचे राजे होता येत नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©१६.१०.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा