विविधतेत समरसता व सहजता आहे, पण समता (समानता) नाही!
(१) मानव समाजात माणसे सारखी का वागत नाहीत हा मला सतावणारा एक वैज्ञानिक व कायद्याचा प्रश्न! माणसे व त्यांची माणुसकी हा सुद्धा याच प्रश्नाला चिकटलेला दुसरा एक प्रश्न! माणसे इथून तिथून सारखीच! समता व बंधुत्व हे शब्द किती गोड! मन प्रसन्न होऊन जाते हे शब्द ऐकताना, वाचताना. पण हे खरेच असे आहे का?
(२) माणसे इथून तिथून सारखीच, त्यांच्या सभोवतालचे नैसर्गिक पर्यावरण सारखेच, त्यांच्यावर असलेला निसर्गाचा प्रभाव पण सारखाच, पण या सारखेपणात जगणाऱ्या माणसांचे विचार व वर्तन सारखे का नाही हा मला सारखा सतावणारा मूलभूत वैज्ञानिक व कायद्याचा प्रश्न!
(३) मग वरील प्रश्नातून बाहेर पडलेला माझा पुढील प्रश्न हा की, निसर्गाने माणसांना दिलेली शरीरे व वासना-भावना-बुद्धी या तिन्हींचा संगम असलेली मने सारखी नाहीत का? मग आणखी पुढे पडणारा प्रश्न हा की, निसर्गाने सृष्टीत जशी विविधता निर्माण केलीय तशी माणसांच्या शरीर व मनातही विविधता निर्माण केलीय का? मग वरील विचारातून पडणारा पुढील प्रश्न हा की, निसर्गाने जर सृष्टीप्रमाणे माणसांतही विविधता निर्माण केली असेल तर मग त्यांच्यात समानता कुठून येणार?
(४) वरील प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता मला कळलेले नैसर्गिक सत्य हे आहे की, निसर्गाने माणसे अगदी तंतोतंत सारखी केली नाहीत. म्हणून तर मराठीत एक म्हण आहे की हात एक असला तरी हाताची सर्व बोटे सारखी नसतात. निसर्गाने सृष्टीच्या रचनेप्रमाणे माणसांतही विविधता निर्माण केलीय आणि म्हणून तर माणसांचे धर्म सारखे नाहीत, त्यांच्या भाषा सारख्या नाहीत, त्यांच्या संस्कृती सारख्या नाहीत. निसर्गाने जर सृष्टीप्रमाणेच विविधता प्रधान रचना माणसांतही निर्माण केली आहे तर मग त्यांच्यात समानता कुठून आणणार?
(५) विविधतेने नटलेल्या सृष्टीत समरसता आहे म्हणजे सृष्टीतील विविध आकारी, विविध गुणधर्मी पदार्थ एकमेकांशी समरसतेच्या एका समान धाग्याने बांधले आहेत, ते समरसतेच्या धाग्याने एकमेकांशी निगडीत आहेत. अशा विविध पदार्थांना एकमेकांशी जोडणारा हा समरसतेचा धागा समान असला तरी या विविध पदार्थांत व त्यांच्या समरसी देवाणघेवाणीच्या जोडणीत समानता नाही अर्थात सर्वांना ५०ः५० टक्के असा समान न्याय नाही.
(६) वरील नैसर्गिक सत्य लक्षात घेऊन भारतीय संविधानात वाजवी वर्गीकरण (reasonable classification) व त्याबरोबर वाजवी बंधने (reasonable restrictions) या महत्वाच्या तरतूदींचा समावेश केला आहे. या तरतूदी या मूलभूत नैसर्गिक तरतूदी आहेत ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. याच तरतूदीनुसार समान काम, समान वेतन व असमान काम, असमान वेतन हे मूलभूत नैसर्गिक तत्व मानवी श्रम कायद्यात समाविष्ट केले आहे. म्हणून तर औद्योगिक कारखान्यात व्यवस्थापक व कामगार यांच्या पगारात तफावत असते. याच नैसर्गिक तत्वाने समान वर्तणूकीला समान कायदा व असमान वर्तणूकीला असमान कायदा हे नैसर्गिक तत्व अधोरेखित होते.
(७) या लेखाचा सार हाच आहे की, माणसांनी कितीही ठरवले तरी त्यांच्यात पूर्ण समानता निर्माण होणे केवळ अशक्य आहे. समानतेचा असा कायदा करून का मानव समाजात अशी ओढूनताणून कृत्रिमपणे पूर्ण समानता निर्माण करता येऊ शकेल? अशा कृत्रिम समानतेत नैसर्गिक सहजता कशी असेल? साम्यवाद जर अशा कृत्रिम समानतेचा आग्रह धरीत असेल तर तो आग्रह अनैसर्गिक होय. म्हणून नैसर्गिक विविधता, समरसता, सहजता, पदार्थांतील मोजकी समानता (समता) व त्यासोबत सर्व विविध पदार्थांतील असमानता (असमता) ही नैसर्गिक तथ्ये व सत्ये नीट समजून घेतली पाहिजेत.
-ॲड.बी.एस.मोरे©१२.१०.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा