आयुष्याच्या अखेरीस येणारे एकटेपणाचे दुःख भयंकर!
आज दिनांक ११.१०.२०२० च्या रविवारच्या लोकसत्तेत आयुष्याच्या अखेरीस एकाकीपणा असह्य झाल्याने अरण्य जीवनावर सतत लेखन करणारे प्रसिद्ध लेखक मारूती चितमपल्ली यांना नागपूर सोडून सोलापूरला स्थलांतर करावे लागले ही बातमी वाचून काळजात धस्स झाले. आधी त्यांची पत्नी गेली, मग मुलगीही काळाने हिरावून नेली. मग लेखकाची वैयक्तिक काळजी घ्यायला घरी कोणीच नाही. बाहेरून भरपूर मानसन्मान मिळवलेले. पण बाहेरची मंडळी वैयक्तिक काळजी घ्यायला घरी रहात नाहीत. बायको नाही, मुलगी नाही. मग घरात एकटेच मरून पडू की काय ही भीती मनाला सतत सतावू लागली. आयुष्याच्या अखेरीस आलेला हा एकाकीपणा खायला उठला. म्हणून शेवटी नागपूर ही कर्मभूमी सोडून चितमपल्ली यांनी सोलापूरला जायचे ठरवले. कारण काय तर तिथे त्यांचा पुतण्या आहे म्हणून. शेवटी काय तर बाहेरची माणसे तुमच्या उपयोगाला येत नाहीत. तुमच्यावर माया प्रेम करणारी तुमची जवळची माणसेच तुमच्या उपयोगाला येतात. असे नातेवाईक आयुष्यात शेवटपर्यंत जवळ असणे हेच जगातील सर्वात मोठे सुख आहे हेच वरील उदाहरणावरून सिद्ध होते. जोपर्यंत तुमच्या अंगात ताकद आहे, तुमचा फायदा आहे तोपर्यंतच बाहेरचे लोक तुमच्या अवती भोवती घुटमळतील. वयानुसार तुम्ही त्यांना निरूपयोगी झालात की तुमचे कौतुक करणारी हीच मंडळी तुम्हाला टाटा, बाय बाय करून दूर निघून जातील. म्हणून सार्वजनिक लोकप्रियता, घराबाहेर मिळणारा मानसन्मान याची नशा डोक्यात शिरू देऊ नका. हा खेळ क्षणिक असतो. आयुष्याच्या अखेरीस जेंव्हा शरीर थकते व मन खचते तेंव्हा या खेळातील हवा फुस्स होते. दुसरे एक उदाहरण सांगतो. माझ्या ओळखीचा एक वयस्कर पुरूष क्लायंट आहे. भरपूर पैसा जवळ, मुंबईत आलिशान फ्लॅट पण पैशाच्या मस्तीत राहून लग्न केले नाही. मुंबईतील मोठ्या आलिशान फ्लॅटमध्ये आता एकटाच राहतोय. पण पैशाच्या मस्तीत सगळे जवळचे, लांबचे नातेवाईक दूर ठेवले. आता आयुष्याच्या अखेरीस जवळ कोणीच नाही. त्याने लग्न केले असते तर त्याच्या जवळ निदान बायको, मुले तरी असती त्याची काळजी घ्यायला. कोरोना लॉकडाऊन काळात तर या जीवघेण्या एकाकीपणामुळे त्याची हालत खूप खराब झाली. एकही नातेवाईक जवळ आला नाही. पैशाला मिठीत घेऊन जग आता शेवटचे आयुष्य असे ते म्हणाले. शेवटी एका मित्रालाच त्याची दया आली. तो मित्र पैशाने गरीब पण मनाने खूप श्रीमंत आहे. तो मित्र दररोज माझ्या या श्रीमंत क्लायंटच्या फ्लॅटवर दोन्ही वेळचे जेवण सकाळच्या नाष्ट्यासह आणून देतो. त्याचे पैसे मात्र घेत नाही. इथे तो पैसा किती भिकारी झाला बरे! अहो पण नुसते जेवण पुरेसे नसते आयुष्याच्या अखेरीस! मायाप्रेमाची माणसे जवळ लागतात तुमची आपुलकीने वैयक्तिक काळजी घेण्यासाठी! लोकप्रियता मिळवलेले मारूती चितमपल्ली व माझा श्रीमंत क्लायट यांची ही उदाहरणे खूप बोलकी आहेत. अखेरच्या आयुष्यात लोकप्रियता कामी आली नाही व पैसाही कामी आला नाही. फौजदारी कायद्यात एकांतवासाची शिक्षा (solitary confinement) ही फार भयंकर मानली जाते. एकटेपणा हा खायला उठतो. म्हणून हजारो, लाखो लोकांची लोकप्रियता तुम्ही नाही मिळवली तरी चालेल पण मरेपर्यंत तुमची काळजी घेणारी मायाप्रेमाची थोडी जरी माणसे मिळवलीत तरी खूप मिळवलेत. विवाहसंस्था ही या दृष्टीने अत्यंत मोलाचे काम करीत आहे. आयुष्यातील तिचे महत्त्व जाणा! जीवनभर तुमची साथ देणारा आयुष्याचा जोडीदार व तुमच्यावर प्रेम करणारी तुमची मुले व तसेच आपुलकीचे नातेवाईक हीच जगातील तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे हे कायम ध्यानात ठेवा! वरील दोन उदाहरणातून मला बस्स एवढेच सांगायचे आहे.
-ॲड.बी.एस.मोरे©११.१०.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा