हळदी कुंकू!
हळदी कुंकू म्हणजे पती नसलेल्या महिलांना अपमानीत करण्याचा सण....
हळदीकुंकू या विषयावर लिखाण करताना महिला माझ्यावर नाराज होणार हे अपेक्षित आहे. कोणाला बरं वाटाव कोणी मला चांगले म्हणावे म्हणून मी कधीही लिखाण केले नाही.
ज्या सणामध्ये पती मयत झालेल्या स्त्रिया, शहीद जवानांच्याच्या वीर पत्नी व आत्महत्या शेतकर्यांच्या पत्नी यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसेल ते सण मला मान्य नाहीत. त्या सणाचे मी आज ही समर्थन करत नाही या पुढे करणार नाही. संक्रांतीनंतर हळदीकुंकू कार्यक्रम घरोघरी गल्लीबोळात दिसतात. हळदी कुंकू सण म्हणजे नवरा असणाऱ्या बायका नटून थटून एकमेकींना हळदी कुंकू लावतात व भेटवस्तू देतात. हे हळदी कुंकू त्याच स्त्रिया लावतात ज्यांचा पती जिवंत आहे. हा कार्यक्रम करत असताना त्या महिलेचा नवरा असणे अपेक्षित आहे. तिला सवाष्णी असे म्हणतात.
देशाच्या सिमेवर शहीद झालेल्या वीर पत्नीला कधी सन्मानपूर्वक या कार्यक्रमात वागणूक दिलेली मी पाहिले नाही. जेव्हा तुम्ही नटूनथटून तुम्ही हळदीकुंकू समारंभात जाता तेव्हा ज्या महिलांचे पती जिवंत नाहीत त्यांच्या मनात सतत येत असते माझे पती असते तर मीही अशी नटली असते. फक्त महिला बोलतात एका स्त्रीचे मन फक्त एक स्त्रीच जाणू शकते. कधी पती नसलेल्या महिलांचे हळदीकुंकू विषयावर मन जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? सतत त्यांना हेतू पुरस्सर अपमानीत केल जाते. का यांना सन्मानपूर्वक वागणूक देणारा सण असू शकत नाही का? कोणत्या शुभ कार्यात त्यांना पुढे येऊन देत नाही. ती चुकून त्या कार्यक्रमात पुढे आली तर तिच्यावर रागावले जाते. असं का अपमानीत जीवन जगायचे.
"नवरा असणे" हाच केंद्रबिंदू मानून बाईचं मूल्यमापन करणार का? खरंतर जास्तीची भावनिक मदत समाजात एकटे पडलेल्या स्त्रियांना असते. समाजाने त्यांना कुशीत घ्यायला हवे. जेव्हा पुरुष अर्ध्यावर संसार टाकून जातो तेंव्हा अपमानीत न करता त्यांना सन्मानपूर्वक सणांमध्ये सहभागी करुन घेणे गरजेचे आहे.
पती नसलेल्या स्त्रियांना अपमानीत करणारे सण, उत्सव, प्रथा अजून किती काळ चालू ठेवायच्या? कर्मकांडाच्या आणि धार्मिक श्रध्दांच्या नावाखाली असले सरळ सरळ 'विषमतेला' खतपाणी घालणारे रिवाज किती वर्षे पाळायचे ? पाया पडणाऱ्या स्त्रीला फक्त 'सौभाग्यवती भवः' असा आशीर्वाद देणे, ही तिच्या आत्मसन्मानाची कुचेष्टाच आहे हे जोपर्यंत स्त्रीला समजत नाही, तोपर्यंत ती संस्कृतीच्या मानसिक गुलामगिरीतच राहणार!
वर्षानुवर्षे चालत आलेल्या या मानसिक गुलामगिरीचं काय? परंपरांच्या नावाखाली चालत असलेल्या सांस्कृतिक गुलामगिरीचं काय? मूग गिळून गप्प बसणार का ?
आपलं हे वागणं सुसंस्कृत म्हणायचं की संधिसाधू?
शिकलेला स्त्री, पुरुष समाज आपल्या परिवार, समाजाला अनिष्ट रूढी, परंपरा, यातून मुक्त करु शकत नाही त्या शिक्षणाचे काय उपयोग? शिक्षण याला म्हणावे जे घेतल्यानंतर चांगले वाईट यातील फरक समजतो व वाईट कृतीला विरोध करतो.आता आपण बदलायला हवं. नवरा नसलेल्या स्रीलाही सन्मानपूर्वक जगता आले पाहिजे.
साभार🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा