https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०

हिऱ्यांचे नशीब!

सगळ्याच हिऱ्यांच्या नशिबी चमकणे नसते!

सद्या गाजत असलेला दूरदर्शन वाहिन्यांचा टीआरपी घोटाळा हा खोटे खोटेच स्वतःला वर उंचावण्याच्या माणसाच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा एक भाग आहे. पण शैक्षणिक पात्रतेची खोटी प्रमाणपत्रे मिळवून का कोणी सुशिक्षित होतो? स्वतःचे खोटे सत्कार घडवून आणून का कुठे सामाजिक प्रतिष्ठा मिळते? इस्त्रीची पांढरीशुभ्र कपडे घालून का कुठे गुंड मवाली चारित्र्यवान होतात? समाजात असे कितीतरी हिरे आहेत की ज्यांना स्वतःवर पैलू पाडण्याची योग्य  संधी मिळत नाही व त्यांना कायम अंधारातच रहावे लागते. याचे एक कारण असेही आहे की, कृत्रिम प्रक्रियेने सोन्याचा मुलामा अंगावर चढवून तांबे, पितळ, लोखंड हे धातू सोन्याची खोटी चमक दाखवित अंधारात चाचपडणाऱ्या खऱ्या हिऱ्यांना वाकुल्या दाखवित खोट्या रूबाबात फिरत आहेत. अंधारात पडलेल्या हिऱ्यांची पारख करू शकणारे जवाहीर या हिऱ्यांच्या नशिबी येत नाहीत हे या हिऱ्यांचे दुर्दैवच होय! "पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार, अजब तुझे सरकार, देवा अजब तुझे सरकार" असे म्हणतच हे अंधारात चाचपडणारे हिरे जगत असतात. फेसबुक, व्हॉटसॲप सारख्या समाजमाध्यमांवर स्वतःची सुंदर कलाकृती जशी सुंदर चित्रे, सुंदर गायन किंवा नृत्य, लेखन टाकून या माध्यमांवर कोणी कलेची, ज्ञानाची पारख असलेला जवाहीर मिळतोय का याची मोठ्या आशेने चाचपणी करीत या माध्यमांवर वावरणारी काही ज्ञानी,  गुणी मंडळी आहेत. सामान्य लाईक्सपेक्षा कोणी जवाहीर मिळतोय का याकडे त्यांचे लक्ष असते. पण या समाजमाध्यमावर हिऱ्यांची पारख असलेले जवाहीर असतील का याविषयी मला शंका आहे. हे जवाहीर समाजमाध्यमाच्या बाहेर राहून विमानातून प्रवास करीत हिऱ्यांचा शोध घेत फिरत असावेत! समाजमाध्यमांवरील कलाकारांची कला एखाद्या दर्दी माणसाच्या हृदयाला जाऊन भिडेल व मग त्या कलेचे चीज होईल या आशेने समाजमाध्यमी कलाकार मंडळी आपआपल्या कलेच्या चित्रफिती या समाजमाध्यमावर टाकत असतात. माझे लेखन हा या प्रयत्नाचाच एक भाग आहे. पण गेल्या पाच वर्षातील माझ्या अखंडित फेसबुक लेखनाला एक पण मायका लाल जवाहीर भेटला नाही. मी मात्र दुसऱ्यांच्या लेखनाची, कलेची मनापासून प्रशंसा करीत अधूनमधून त्या गोष्टी माझ्या स्वतःच्या फेसबुक खात्यावर शेअर करीत असतो. पण माझ्या त्या वैयक्तिक कौतुकाशिवाय इतरांच्या त्या सुंदर कलाकृतीला खरा न्याय मिळत नाही. कारण हिऱ्यांची खरी पारख असलेले जवाहीर बाहेरच विमानातून फिरत असतात. ते समाजमाध्यमात घुटमळत नसतात.

-ॲड.बी.एस.मोरे©१७.१०.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा