https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०

रचा है सृष्टी को जिस प्रभू ने, वही ये सृष्टी चला रहे है!

निसर्गातील देवावर असलेली माझी श्रद्धा ही माझी मूलभूत नैसर्गिक श्रद्धा आहे!

(१) आपल्याकडून जाणीवपूर्वक केली जाणारी कृती ही आपल्या जागृत मनाची प्रत्यक्ष कृती असते. ती आपल्या जागृत मनाने संपादन केलेल्या आपल्या ज्ञानावर आधारित असते. अशा कृतीची अचूकता ही ते ज्ञान नीट समजून घेण्याच्या आपल्या जागृत मनाच्या बौद्धिक कुवतीवर अवलंबून असते. अशी कृती जागृत मनाकडून कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेत केली जाते. जागृत मन म्हणजे जागे असलेले मन. झोपी गेलेले मन अशी जाणीवपूर्वक कृती करू शकत नाही. जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या क्रिया या ऐच्छिक क्रिया होत. पण काही क्रिया झोपेतही अजाणतेपणे केल्या जातात. उदा. प्रतिक्षिप्त क्रिया. आपल्या अजाणतेप्रमाणे केल्या जाणाऱ्या या क्रिया आपल्या जागृत मनाच्या विश्रांती (झोप) काळात आपल्या अजागृत मनाकडून गुपचूप केल्या जातात. या क्रियांना अनैच्छिक क्रिया म्हणतात. ऐच्छिक  क्रिया आपल्या मोठ्या मेंदूकडून व अनैच्छिक क्रिया आपल्या छोट्या मेंदूकडून पार पाडल्या जातात. पण हे दोन्ही मेंदू हे एकाच मेंदूचे दोन भाग आहेत.

(२) याच विज्ञानाचा आधार घेत मी अधिक खोलात जाऊन विचार केला तेंव्हा कळले की आपल्या जागृत मनावर आपल्या प्रत्यक्ष ज्ञानाचा प्रत्यक्ष प्रभाव असतो व त्या प्रत्यक्ष  प्रभावाखालीच आपले जागृत मन जाणीवपूर्वक कृती करते व त्या कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेते. पण मग आपल्या अजागृत मनावर कोणाचा प्रभाव असतो? ते अजागृत मन आपोआप आपल्या अजाणतेपणे कसे कार्य करते? या अप्रत्यक्ष प्रभावाची आपल्या जागृत मनाला बिलकुल जाणीव नसते काय? मग आपले जागृत मन झोपेत स्वप्ने बघते, त्या स्वप्नांचा अप्रत्यक्षपणे अनुभव घेते त्याचे काय करायचे? आपल्या जागृत मनाच्या अप्रत्यक्ष जाणिवेला जाणीव म्हणूच नये काय?

(३) निसर्ग (निसर्ग म्हणजे पदार्थांनी बनलेली सृष्टी) ही प्रत्यक्ष अनुभव घेता येणारी गोष्ट आहे. पण मग निसर्गात असलेल्या अप्रत्यक्ष प्रभावाचे काय करायचे? त्या अप्रत्यक्ष गुप्त प्रभावाचाही अनुभव येतोच की आपल्या जागृत मनाला! या अप्रत्यक्ष गुप्त प्रभावावर आपल्या जागृत मनाचे नियंत्रण आहे का? मग आपला लिखित कायदा कशाचे नियंत्रण करतोय? कायदा व सुव्यवस्था म्हणजे काय? आपल्या समाजाच्या लिखित कायद्याने फक्त आपल्या जागृत मनाच्या प्रत्यक्ष कृतीवर ध्यान देता येते व तिचे नियंत्रण करता येते. निसर्गातील गूढ शक्तीवर, आपल्या अजागृत मनावर असलेल्या   तिच्या अप्रत्यक्ष गुप्त प्रभावावर व त्या अप्रत्यक्ष प्रभावाखाली आपल्या अजागृत मनाकडून केल्या जाणाऱ्या अप्रत्यक्ष कृतीवर (अनैच्छिक क्रियांवर) आपल्या लिखित कायद्याचे नियंत्रण प्रस्थापित होणे केवळ अशक्य आहे. आपल्या जागृत मनाचेच या गूढ शक्तीवर व तिच्या गुप्त प्रभावावर नियंत्रण नाही तर मग आपल्या जागृत समाजमनाकडून निर्माण केल्या गेलेल्या व केल्या जात असणाऱ्या लिखित कायद्याचे अशा गूढ नैसर्गिक शक्तीवर व तिच्या गुप्त प्रभावावर नियंत्रण प्रस्थापित होणे कसे शक्य आहे?

(४) म्हणून माझे हे म्हणणे आहे की, निसर्गाच्या विज्ञानाची व समाजाच्या कायद्याची जाणीव ही आपल्या जागृत मनाची प्रत्यक्ष जाणीव होय तर निसर्गातील गूढ शक्तीची व त्या शक्तीच्या गुप्त प्रभावाची जाणीव ही आपल्या जागृत मनाची अप्रत्यक्ष जाणीव होय. मानवी मनाच्या याच अप्रत्यक्ष जाणिवेतून निसर्गातील देवावर मानवी मनाची श्रद्धा निर्माण झाली असावी. जगात देवावर श्रद्धा ठेवणारे जे धर्म आहेत ते याच नैसर्गिक श्रद्धेवर आधारित आहेत हे माझे वैयक्तिक मत आहे. हे देवधर्म जागृत मानवी मनाच्या अप्रत्यक्ष जाणिवेतून आपोआप, सहज नैसर्गिकपणे निर्माण झाले असावेत असे मला वाटते. निसर्गातील देवावर असलेली माझी श्रद्धा ही माझ्या जागृत मनाच्या अप्रत्यक्ष जाणिवेतून निर्माण झालेली मूलभूत नैसर्गिक श्रद्धा असल्याने मी तिच्यावर ठाम आहे!

-ॲड.बी.एस.मोरे©७.१०.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा