मानवी संबंधातील भावनिक ओलावा व व्यावहारिक कोरडेपणा!
लहानपणी आईवडिलांच्या छत्रछायेत वाढत असताना बहीण भावंडांत असलेला भावनिक ओलावा पुढे वय वाढत जाईल तसा कमीकमी होत जातो. लग्ने होऊन आपआपल्या संसारात पडल्यानंतर तर या भावनिक ओलाव्याचा प्रवास घट्ट, दाट ते पातळ असा होतो. आठवा ती लहानपणीची रक्षाबंधने, भाऊबीजेच्या ओवाळण्या व नंतर प्रौढपणीचे, वृध्दापकाळाचे बहीण भावातील भावनिक ओलावा जपणारे हेच सण! आईवडील दोघेही वारल्यावर तर मग रक्ताची नाती आणखी पातळ होत जातात. काही अपवाद असतीलही या अनुभवाला पण सर्वसाधारण अनुभव तर कालानुरूप होणाऱ्या भावनिक दुराव्याचाच असतो ना! अगोदरच दुरावलेल्या रक्ताच्या नात्यांत पुढे जेंव्हा व्यवहार आडवा येतो तेंव्हा तर अशा नातेसंबंधात खूप ताणतणाव निर्माण होतात. आईवडिलांच्या इस्टेटीची भावाबहिणीत वाटणी करताना तर भावनिक ओलाव्याची मोठी कसोटी लागते. रक्ताची नैसर्गिक नाती असोत की लग्नाची कृत्रिम नाती असोत, ही नाती इतर कारणांनी सुद्धा दुरावतात. नातेवाईकांतील कोणी त्याच्या स्वकर्तुत्वावर पुढे गेला की नातेवाईकांकडून त्याचे मनापासून कौतुक होण्याऐवजी असूया व तिरस्काराच्या नकारात्मक भावनेतून अशा नातेवाईकाबरोबर संपर्क कमी करीत त्याला दूर ठेवण्याचे (वाळीत टाकण्याचे) प्रकारही काही ठिकाणी होत असतात. अशा जळकुट्या नातेवाईकांकडून भावनिक ओलाव्याची अपेक्षा करणे हा शुद्ध मूर्खपणा! बाहेरच्या जगातही मानवी संबंध निर्माण होत असतात. पण त्यात जवळच्या नातेसंबंधासारखा भावनिक ओलावा नसतो. असे संबंध व्यावहारिक असतात जे कोरडे असतात. अशा व्यावहारिक संबंधात वस्तू व सेवांची व त्यासोबत पैशाची आर्थिक देवाणघेवाण होत असते तशी सत्तेची राजकीय देवाणघेवाणही होत असते. अशा व्यावहारिक संबंधात हृदयापेक्षा (भावनेपेक्षा) मेंदू (बुद्धी) महत्त्वाची भूमिका पार पाडीत असतो. अशा संबंधात फायद्यातोट्याचा हिशोब असतो व अशा हिशोबातून निर्माण होणारा व्यावहारिक कोरडेपणा असतो. भावनिक ओलाव्याचा अंश नगण्य असल्याने असे कोरडे व्यावहारिक संबंध बिघडण्याची शक्यता मोठी असते. गरज सरो व वैद्य मरो असाच काहीसा प्रकार अशा व्यावहारिक संबंधात असतो. म्हणून तर अशा कोरड्या व्यावहारिक संबंधाना नियंत्रित करणे ही सरकारची मोठी जबाबदारी असते. त्यासाठी तर सरकारी कायदे असतात. माझा हा लेख मानवी संबंधातील भावनिक ओलावा व व्यावहारिक कोरडेपणा या विषयापुरताच मर्यादित आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा