https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

माझ्या ज्ञानाची शोकांतिका!

माझ्या ज्ञानाची शोकांतिका!

मी एकटाच करतोय माझ्या लेखनाचा सगळा उपद्व्याप! मी काय विचार करतोय, काय लिहितोय याच्याशी माझी पत्नी व एकुलती एक उच्च शिक्षित मुलगी यांना काहीही घेणे देणे नाही, मग इतर नातेवाईक किंवा मित्रांची गोष्टच सोडा. मी पहिली दोन फेसबुक खाती अशीच वैतागून बंद केली. ५०० ते १००० पर्यंत पोस्टस साठल्या होत्या तिथे. पण एखादा संशोधक वैतागून स्वतःच्या हस्तलिखित वह्या फाडतो त्याप्रमाणे फेसबुकवर जतन केलेला तो लेखन साठा डिलिट करून टाकला. आता हे तिसरे फेसबुक खाते मी उघडलेय. कारण डोक्यात साठलेले ज्ञान व त्यावर निर्माण होत असलेले विचार कुठेतरी शेअर केल्याशिवाय मला स्वस्थ बसवत नाही. हा माझा एकखांबी मोठा बौद्धिक कारखाना आहे. देवाने म्हणा नाहीतर निसर्गाने म्हणा माझ्या डोक्यात बळ दिले, पण माझे पंख छाटून टाकलेत. त्यामुळे या ज्ञान व बुद्धीच्या बळावर उंच भरारी घेता येत नाही. मागच्या जुन्या फेसबुक खात्यावर मी छान लिहितो वगैरे बरीच स्तुती केली लोकांनी, पण त्या पलिकडे काही नाही. एक हैद्राबादचा वकील तर माझ्या लिखाणावर इतका खूश झाला की त्याच्या ओळखीने व खर्चाने माझ्या फेसबुक पोस्टसचा भला मोठा ज्ञानग्रंथच करूया म्हणून माझ्या बराच मागे लागला व शेवटी आशा लावून निघून गेला. काय सांगू मी स्वतःविषयी! अधिक काही बोललो तर आत्मप्रौढी होईल. काही वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या कायदा विभागाचे प्रमुख माझ्या लेखनाचा काही भाग बघून मला म्हणाले की विद्यापीठाच्या आवारातील झाडाखाली रोज संध्याकाळी आपण बसू. मग तुम्ही हे जे काय लिहिलेय त्याचा अर्थ नीट समजावून सांगा. मग तुम्हाला पी.एच.डी. चे मार्गदर्शन करता येईल. पण विद्यापीठाच्या झाडाखाली बसून माझे लेखन त्या प्रमुखाला सांगण्याचा पुढे योगच आला नाही. ते कायदा विभाग प्रमुखही नंतर सेवानिवृत्त झाले. हे फेसबुक लिखाण तर काहीच नाही. माझ्या हस्तलिखित लिखाणाच्या जवळजवळ चाळीस मोठ्या वह्या कपाटात धूळ खात पडल्या आहेत. त्यांना कोणी सुद्धा  गॉडफादर मिळाला नाही. मग मी पाच वर्षापूर्वी फेसबुकला जवळ केले. पण इथेही निराशाच पदरी पडतेय. म्हणून मी वैतागून पहिली दोन फेसबुक खाती त्यावरील माझ्या ५०० ते १००० लेखांसह बंद करून टाकली. मागे एकदा मी इंडियन लॉ इन्स्टिट्यूटला माझ्या हस्तलिखित वह्यांची झेरॉक्स पाने सरळ रजिस्टर्ड पोस्टाने पाठवून दिली. पण त्या इन्स्टिट्यूटच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी तो सगळा लेखन पसारा मला तसाच रजिस्टर्ड पोस्टाने न वाचता परत पाठवून दिला. मागे एका व्यक्तीने माझे लेखन बघून काय अॉफर द्यावी? तर म्हणे माझ्या लेखाचे मोठे पुस्तक होईल पण लेखक म्हणून त्या व्यक्तीचे नाव असेल त्या पुस्तकाला व त्याचा मोबदला म्हणून ती व्यक्ती काही पैसे मला देईल. मी नंतर डॉक्टरेट होण्याचा, लेखनाचे पुस्तक करण्याचा नादच सोडून दिला. ही आहे माझ्या ज्ञानाची शोकांतिका, माझ्या आयुष्याची सत्यकथा! आज अंतर्मनातील ही गोष्ट व्यक्त करून मनापासून मोकळा झालो बस्स एवढेच!

-ॲड.बी.एस.मोरे©२.१०.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा