https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०

वकिली व्यवसायाचे राजेपण!

वकिली व्यवसाय म्हणजे सर्व व्यवसायांचा, सर्व क्षेत्रांचा राजा व्यवसाय!

गरीब कुटुंबातील मुलामुलींना वकील होऊन या अत्यंत आव्हानात्मक व्यवसायात टिकून राहणे कठीण असले तरी ते अशक्य नाही. यासाठी मी कायद्याच्या विद्यार्थ्यांना माझे स्वतःचे जिवंत उदाहरण बिनधास्त देतो. मी मुंबईतील कापड गिरणी कामगाराचा मुलगा आहे. वडील सातवी शिकलेले, गिरणी कामगार, आई पूर्ण अशिक्षित अंगठेबहाद्दर, एक भाऊ व दोन बहिणी ही माझी सख्खी भावंडे फक्त एस.एस.सी. पर्यंत कशीबशी येऊन तिथेच ठप्प झालेली, घरी अत्यंत गरिबी, शिक्षणात मार्गदर्शन करायला कोणी सुद्धा नाही, वकिली क्षेत्र काय असते याविषयीची माहिती देणारा, त्यातले बारकावे, खाचखळगे समजावून सांगणारा कोणी नाही, आजूबाजूची बहुतेक सगळीच मंडळी माझ्या शैक्षणिक प्रगतीवर जळणारी. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मी जिद्दीने वकील झालो व पैशाची तंगी, चेष्टा, अपमान या सगळ्या गोष्टी सहन करीत वकिलीत टिकून राहिलो व बायको बारावी शिकलेली गृहिणी व मुलगी शाळेत, पुढे कॉलेजात, मग पुढे एम.बी.ए. साठी मोठ्या मॕनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये ही सर्व आर्थिक जबाबदारी एकट्याने डोक्यावर घेऊन वकिलीत राहूनच यशस्वीपणे संसार केला. आज माझी एकुलती एक मुलगी एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत मॕनेजर म्हणून उच्च पदावर आहे. तिला तिचा आयुष्याचा जोडीदार स्वतःच निवडण्याचे मी व माझ्या पत्नीने पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. मुलीनेही त्या स्वातंत्र्याचे सोने केले. तिचे पती हे सुद्धा लंडनचे एम.बी.ए. आहेत. जावई व मुलगी दोघेही त्यांच्या संसारात सुखी आहेत. हे सर्व मला माझ्या वकिली व्यवसायात राहून प्राप्त करता आले. माझे हे यश म्हणजे देशाचे पंतप्रधान होण्याएवढे मोठे यश आहे असे मी स्वतः मानतो. कारण खडतर मेहनत करीत, अपमान सहन करीत मिळविलेल्या माझ्या कायद्याच्या ज्ञानाचा व माझ्या वकिली पदाचा मला गर्व नसला तरी स्वाभिमान मात्र निश्चित आहे. बाकी इतर जळकुटे लोक माझ्या या कणखर मनावर व मोठ्या आत्मविश्वासावर हसून चेष्टा करतील तर त्यांना मी काडीचीही किंमत देणार नाही. गरीब कुटुंबात जन्मून कायदा शिकणाऱ्या कायद्याच्या विद्यार्थ्यांनो तुमच्यात जर हिंमत असेल तर कुणाचीही व कशाचीही पर्वा न करता जरूर वकील बना! वकिलीसारखा दुसरा व्यवसाय नाही, अगदी डॉक्टरकी सुद्धा नाही. कारण इतर सगळे व्यवसाय कोणत्या तरी एकाच ज्ञान क्षेत्रात प्रावीण्य मिळवून त्या संकुचित ज्ञानावर प्रॕक्टिस करण्याचे व्यवसाय आहेत. पण वकिली हा असा एकमेव व्यवसाय आहे जो जगातील सर्व ज्ञान क्षेत्रांवर राज्य करतो. मग कला, क्रीडा, डॉक्टर, इंजिनियर, सी.ए., कंपनी सेक्रेटरी, एम.बी.ए., उद्योगपती, राजकारणी कोणीही असो. या सर्वांवर राज्य करणारा एकमेव व्यवसाय म्हणजेच वकिली व्यवसाय! राजेपण असलेल्या या वकिली व्यवसायात तुम्हाला यायचे असेल तर खिशात दमडी नसताना सुद्धा राजासारखे जगायची हिंमत ठेवा व वकील बना!

-ॲड.बी.एस.मोरे©२०.१०.२०२०

टीपः

काल एका कायद्याच्या विद्यार्थ्याने वकील व्हावे की नको याविषयी मार्गदर्शन विचारले व त्यातून एक लेख तयार झाला. आजही मला कायदा शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने वकिली व्यवसाया विषयी हाच प्रश्न केला व त्यातून हा लेख तयार झाला.

-ॲड.बी.एस.मोरे©२०.१०.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा