https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

नैसर्गिक आविष्कार!

निसर्गाच्या नैसर्गिक आविष्काराचा कृत्रिम (नकली) मानवी आविष्कार अनैसर्गिक असू शकत नाही!

(१) निसर्गातील देवाचा अर्क हाच निसर्गरूपाने प्रकट झालाय, सादर झालाय. हा आविष्कार म्हणजे त्या देवाची नैसर्गिक अभिव्यक्ती! गंमत अशी की निसर्गातील मूलद्रव्ये मानवी बुद्धीच्या  आकलनाला (विज्ञानाला) सापडली असली तरी निसर्गातील देवाचा तो अर्क किंवा प्रत्यक्षात  तो देव मात्र विज्ञानाला सापडला नाही. मग तो देव सापडत नाही म्हणून निसर्गाचा आविष्कार हेच सत्य आहे, नैसर्गिक आविष्काराच्या या सत्यामागे देवाचा अर्क, देव वगैरे काही नाही  असा निष्कर्ष काढून काही माणसे सरळ हात वर करून मोकळी होतात.

(२) निसर्गातील देव निसर्गात (विश्वात/सृष्टीत) किती गुणांत, किती आकारात, किती रंग व रूपात प्रकट, सादर, व्यक्त झालाय! केवढी प्रचंड ही निसर्गाच्या आविष्काराची अनेकता व विविधता! हा एवढा मोठा निसर्गाचा आविष्कार  माणसाला त्याच्या मेंदूत साठवून ठेवता येईल का? शेतातून जीवनावश्यक धान्य पिकणे, आकाशातून पाऊस पडणे, नद्या समुद्राला जाऊन मिळणे आणि एवढेच नव्हे तर मानवी भाषा, संस्कृती तिच्या वैविध्यपूर्ण रंगढंगाने, लकबीने काय नटणे, प्रादेशिक विविधतेचा या विविध मानवी संस्कृतीवर विविधांगी प्रभाव पडणे, हे सर्व मानवी मनाला अचंबित, चकित करून टाकणारे आहे. फेसबुकवर भारतातील विविध राज्यांतील माझे मित्र, मैत्रिणी आहेत. त्यांच्याकडून त्यांच्या राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडविणारे वेगवेगळे व्हिडिओज, चित्रे मला बघायला मिळतात. सद्या चाललेल्या नवरात्रोत्सवाचेच उदाहरण घ्या! देवीचा उत्सव एकच पण पश्चिम बंगाल, आसाम, गुजराथ, महाराष्ट्र या विविध राज्यांत देवीच्या या सणाचे वेगळेपण दिसते. अर्थात देशात हिंदू संस्कृती एक पण तिच्यातही विविध राज्यांची प्रादेशिक विविधता पहायला मिळते.

(३) अशा पर्यावरणीय परिस्थितीत मानवी मन निसर्ग आविष्काराच्या किती रूपात, किती रंगात, किती गुणांत समरस होणार व या सर्व विविधतेला स्वतःत सामावून घेऊन स्वतःचा कृत्रिम मानवी आविष्कार दाखविणार? असा मानवी आविष्कार, अभिव्यक्ती ही निसर्गाची नकल (कॉपी) असते. अशी नकल करायला पण अक्कल लागते. म्हणून जे जे मानवनिर्मित आहे ते ते नकली (कृत्रिम) आहे. निसर्गाच्या आविष्काराची नकल (कॉपी) करणे व अशा कृत्रिमतेतही निसर्गाची नैसर्गिकता कायम राखणे हे माणसापुढे निसर्गातील देवाने निर्माण केलेले मोठे आव्हान होय! निसर्गाचा विविधांगी आविष्कार मनात मुरवणे, अंगात जिरवणे ही काही सोपी गोष्ट नाही.

(४) निसर्गाची कृत्रिम नकल करताना निसर्गाची नैसर्गिकता या कृत्रिमतेतही कायम ठेवण्याचे आव्हान स्वीकारणारा माणूस या आव्हानात नेहमीच यशस्वी होईल असे नसते. म्हणून तर त्याचे वर्तन कधीकधी नैसर्गिक (नॉर्मल) ऐवजी अनैसर्गिक (अबनॉर्मल) होते. अशा अनैसर्गिक वर्तनाला रोखण्यासाठी, त्यावर नियंत्रण ठेवून माणसाला कृत्रिम पण नैसर्गिक वर्तन करण्यास  भाग पाडण्यासाठी सुशिक्षित, सुसंस्कृत मानव समाजाने कायद्याच्या राज्याची निर्मिती केली आहे जी कृत्रिम असली तरी नैसर्गिक आहे. निसर्गाच्या नैसर्गिक आविष्काराचा कृत्रिम (नकली) मानवी आविष्कार अनैसर्गिक असू शकत नाही हे सांगण्यासाठी तर माझा हा अभ्यासपूर्ण लेख आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©१८.१०.२०२०

https://www.facebook.com/338024653358851/posts/958188094675834/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा