गरजेचा खून करण्याची संधी चैनीला देऊ नका!
सजीवांची जगण्याची गरज भागविण्यासाठी सृष्टीची रचना करणाऱ्या देवाने हवा, पाणी, अन्नधान्य मुबलक प्रमाणात दिले व कधीतरी चैन म्हणून अंगावर घालण्यासाठी सोने, हिरे, माणिक, मोती यांना दुर्मिळ केले. पण ज्या देवाने मनुष्याला बुद्धी दिली त्या बुद्धीचीच मनुष्याने पुरी वाट लावली. त्याने काय डोके चालवले तर देवाने जे मुबलक प्रमाणात दिले त्याची किंमत कमी केली व देवाने अल्प चैन म्हणून जे दुर्मिळ केले त्याची किंमत वाढवली. मग काय दारू, सिगारेट, चित्रपट, नाट्य, संगीत कला, क्रिकेट सारखे खेळ या करमणूक प्रधान चैनीच्या गोष्टी सेलिब्रिटी झाल्या. या दुर्मिळ चैनीच्या गोष्टींचे अक्षरशः सोने झाले. शेतात कष्ट उपसणारा शेतकरी व उद्योगधंद्यात घाम गाळणारा कामगार मात्र या नीच मानसिकतेतून गरीब झाला. अतिशहाणी मूठभर मंडळी याला कारण काय देतात तर अशा कष्टकरी लोकांची संख्या मुबलक आहे व श्रीमंत भांडवलदार मूठभर असल्याने दुर्मिळ आहेत. अहो पण या मूठभर लोकांना दुर्मिळ व सेलिब्रिटी कोणी केले हो? देवाने का माणसाने? देवाने तर चांगली सृष्टी निर्मिली! पण त्याने एक चूक केली की माणसाला थोडी जास्तीची बुद्धी देऊन सृष्टीचे व्यवस्थापन माणसाच्या ताब्यात देऊन तो देव मोकळा झाला. हाच अनुभव पदोपदी येत आहे मग "ज्या प्रभूने या सृष्टीला रचले, तोच ही सृष्टी चालवत आहे" या देवाच्या भजनाला माझ्या सारख्या खोलात विचार करणाऱ्या माणसाने का बरे म्हणून गुणगुणत बसावे? तसे करीत बसले तर आभासात जगल्यासारखे होईल व सत्य लपले जाईल. मूठभर श्रीमंतांना व त्यांना गुपचूप मदत करणाऱ्या काही धूर्त राजकारणी मंडळींना तर हेच हवे आहे की लोकांनी डोळे उघडून सत्य बघूच नये. त्यांनी डोळे झाकून कायमच आभासात जगावे. तेंव्हा लोकांनी "ठेविले अनंते तैसेची रहावे" हा विचार सोडून देऊन डोळे उघडणे गरजेचे आहे. शेतकरी व कष्टकऱ्यांनो तुम्ही आत्महत्येचा विचार सुद्धा मनात आणता कामा नये. तुम्ही असा विचार करून चैनीला गरजेचा खून करण्याची संधी देत आहात हे लक्षात घ्या!
-ॲड.बी.एस.मोरे©७.१०.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा