https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०

सरकारनामा!

पोरांनी आईबापाला विसरून कसे चालेल?

अरेरे, काय पण जमाना आलाय! पोरं आईबाप विसरू लागलीत, त्यांच्या काही चुकांवर बोट ठेऊन त्यांनी दिलेले योगदान विसरू लागली, त्यांचा चांगला इतिहास पुसू लागली. काळा चष्मा घालून आईबापाच्या चांगल्या गोष्टींवर काळे फासू लागली. भारतीय काँग्रेसच्या मुख्य माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधीचे योगदान नाही, राज्यघटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान नाही, राष्ट्राच्या वैज्ञानिक व औद्योगिक क्रांतीत प. नेहरूंचे योगदान नाही, सरदार वल्लभभाई पटेल काँग्रेसचेच पण त्यांचे काही योगदान नाही, १९६५ भारत पाकिस्तान युद्धात लालबहादूर शास्त्रींचे योगदान नाही, समाजवादी व भांडवलशाही अशी संमिश्र अर्थव्यवस्था विकसित करून हरित क्रांती, १९७१ भारत पाकिस्तान युद्ध, संस्थानिकांचे तनखे बंद व बँकांचे राष्ट्रीयीकरण, अॉपरेशन ब्लू स्टार मध्ये देशासाठी बलिदान केलेल्या लोहस्त्री इंदिरा गांधीचे योगदान नाही, राजीव गांधींचे संगणक क्रांतीत योगदान नाही, त्यांनी भारत श्रीलंका शांती करारात देशासाठी केलेले बलिदान व्यर्थच, नरसिंह राव यांचे उदारीकरण धोरणात योगदान नाही, मोठी जागतिक मंदी आली होती तेंव्हा भारताला आर्थिक संकटातून वाचविण्यात डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान नाही. म्हणजे काँग्रेसने देशासाठी काहीच का चांगले केले नाही! सगळे वाटोळे केले! अहो, इतिहासाची पाने फाडून किंवा डिजिटल क्रांती करताना डिलिट मारून का कधी इतिहास संपवता येतो? खोटे रेटून सांगितले म्हणजे का सत्य लपवता येते? आहात कुठे तुम्ही? जुना इतिहास पुसून टाकताय का? ज्यांनी मूलभूत पाया घालून मोठे केले त्या आईबापालाच तुम्ही विसरताय का? धन्य हो तुमची! कोपरापासून नमस्कार तुम्हाला! मतभेद टोकाचे आहेत बरं का आपल्यात! तरीही आम्ही तुमच्यावर केवळ करायची म्हणून टीका करणार नाही. चांगल्या कामाला चांगलेच म्हणणारी आम्ही माणसे! अहो, तुम्ही कितीही नावे ठेवली तरी आम्हा गरिबांना इंदिरा गांधी यांचा त्या काळात खूप आधार वाटायचा. मी तर इंदिरा गांधी यांच्या शिका व कमवा (Earn while you learn) या योजने अंतर्गत कॕनरा बँकेत अर्धवेळ नोकरी करीत कॉलेज गाठायचो व त्यांच्याच राष्ट्रीय कर्ज शिष्यवृत्ती (NLS - National Loan Scholarship) च्या जोरावर बी.कॉम. चे शिक्षण पूर्ण केलेय. तो माझा इतिहास पुसता येईल का तुम्हाला? आता काय श्रीमंतांचे दिवस आलेत. खाली मान घालून आहे त्या पगारात काम करायचे नाहीतर उद्यापासून काम बंद असे अमेरिकन स्टाईलचे हायर आणि फायरचे दिवस आलेत हो! करार पद्धतीने नोकऱ्या (कॉन्ट्रॕक्ट लेबर) मिळतात हल्ली! परमनंट नोकरी आता इतिहासजमा! किती कामगार चळवळी पाहिल्या आम्ही, पण आता कुठे ती चळवळच दिसत नाही. चळवळ कशाला साधी वळवळ सुद्धा दिसत नाही. सगळं चिडीचूप! असं का कधी जास्त दिवस चालते! असो, आपण काही चांगली कामेही करीत आहात. काश्मीरचा तो स्वतंत्र दर्जा तुम्ही रद्द केला तेंव्हा किती बरे वाटले आम्हाला! गेल्या ७० वर्षांत काँग्रेसला जे जमले नाही ते तुम्ही फटक्यात करून दाखवले. श्रीराम मंदिराचा गहन प्रश्नही सयंमाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने निकालात निघाला. आताही अटल टनेलचे उदघाटन तुम्ही  केले, बरे वाटले! पण एक सांगा या टनेलसाठी काँग्रेसने काहीच केले नव्हते का? बरं त्या नोटबंदीने व जी.एस.टी. ने काय साधलेय हे अजूनही आमच्या डोक्यात नीट शिरलेले नाही. तुमचा लॉकडाऊन मात्र खूपच कडक होता. आता तो सैल करा ना लोकल ट्रेन चालू करून. आम्ही मास्क लावून कामाला जाऊ. गेले सहा महिने जाम टरकून आम्ही अर्धपोटी आमच्या घरी सुरक्षित राहिलोय. पण आता थोडी रिस्क ही घ्यायला लागणारच ना! नाहीतर काय होईल की आम्ही घरात कोरोना पासून सुरक्षित राहू पण उपासमारीने तडफडून मरू. आमचे माय बाप सरकार आहात तुम्ही! काही चुकलं का आमचं असे स्पष्ट बोलून? अहो, भीती वाटते आम्हाला कारण शेवटी तुम्ही सरकार आहात!

-ॲड.बी.एस.मोरे©५.१०.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा