निसर्गातील देवत्व दलदलीवर उभे!
निसर्गातील देव दिसत नाही. त्यामुळे त्याचे प्रत्यक्ष दर्शन घेत त्याला समोरासमोर नमस्कार करता येत नाही. परंतु निसर्गातील देवत्व मात्र प्रत्यक्षात दिसते, प्रत्यक्षात अनुभवता येते. पण हे देवत्व निसर्गातील दलदलीवर उभे आहे, त्या दलदलीला चिकटलेले आहे हेही सत्य आहे. याचा अर्थ हाच की देवाचा स्वर्ग राक्षसाच्या नरकाला चिकटलेला आहे. उदा. चिखलातून कमळ उमलते, काटेरी झुडुपाला गुलाबाची फुले येतात, लैंगिक वासनेतून प्रेमाचा अंकुर फुटतो. चिखल, काटे, लैंगिक वासनेचा अंगार यांना मी राक्षसी नरक म्हणतो तर अनुक्रमे कमळ, गुलाब, प्रेम यांना मी देवाचा स्वर्ग असे म्हणतो. या स्वर्गातच देवत्व दिसते, अनुभवता येते. पण निसर्गाची रचनाच अशी की देवत्वाचे निर्माण हे राक्षसी नरकातून, दलदलीतून होते. माझी पत्नी स्वैपाकघरात अन्नपदार्थ बनवून जेंव्हा माझ्यापुढे जेवणाचे ताट आणून ठेवते तेंव्हा जणूकाही अन्नपूर्णा देवीने प्रसन्न होऊन माझ्या पत्नीच्या माध्यमातून मला अन्नदान केले असे वाटते व ताटातील अन्नपदार्थांत मला देवाचे देवत्व दिसते. मग मी माझे जेवण सुरू करण्यापूर्वी अन्नपदार्थांनी भरलेल्या ताटाला नमस्कार करून जेवण सुरू करतो. माझा तो नमस्कार निसर्गातील देवाला असतो. कच्चे अन्नपदार्थ शिजवून खाण्यायोग्य व चवदार बनविणे ही एक सुंदर निर्मिती प्रक्रिया आहे. या सुंदरतेच्या नवनिर्माण प्रक्रियेत देवत्व असते व तेच देवत्व सुंदर नवनिर्मितीत उतरलेले असते. पण निसर्गात देवत्व शोधणे, स्वतःच्या मनात देवाला जाणून ते देवत्व स्वतःच्या परिश्रमाने निर्माण करणे व टिकविणे हे एक फार मोठे आव्हान असते. दलदलीचा राक्षस या देवत्व निर्मितीच्या व टिकविण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण करतो. त्या राक्षसी दलदलीने भरलेल्या अडचणींवर मात करून दलदलीत राहणाऱ्या राक्षसाला नामोहरम करणे, त्याला हरवणे हे फार मोठे आव्हान निसर्गातील अदृश्य देवाने माणसापुढे उभे केले आहे. सुंदर देवत्व निर्मितीचे हे आव्हान देवाने माणसापुढेच उभे केले आहे, जंगली जनावरांपुढे नव्हे. जंगली जनावरांना जंगली वागण्यासाठी देवाने मुक्त ठेवलेय. त्या जंगली जनावरांची ती नरकातली मुक्ती म्हणजे माणसांना कायम डोकेदुखी! ही डोकेदुखी म्हणजे दलदलीतून देवत्व निर्मितीचे माणसापुढे देवाने उभे केलेले मोठे आव्हान होय! दलदल ही केवळ जंगली जनावरांच्या जंगलीपणातच नसते. ती माणसांतल्या वाईट, दुष्ट प्रवृत्तीतही असते. खून, बलात्कार, चोऱ्या, दरोडे यासारखे गुन्हे करणारी जंगली माणसे, भ्रष्टाचार करणारी व तसेच दुसऱ्याच्या सुंदर नवनिर्मितीच्या कर्तुत्वावर जळणारी व त्या असूयेपोटी नातेसंबंधात विष कालवणारी दुष्ट, हलकट प्रवृत्तीची अर्धजंगली माणसे ही तर फार जवळ चिकटलेली दलदल होय. अशा माणसांना सरळ जंगलात नेऊनही सोडता येत नाही. देवत्वाची आवड असलेल्या चांगल्या माणसांना या राक्षसी प्रवृत्तीच्या माणसांसोबतच जगावे लागते. या बिकट परिस्थितीवर चिडून, त्रागा करून काही उपयोग नसतो. कमळाला चिखलासोबत व गुलाबांना काट्यांसोबत राहण्याशिवाय निसर्गाने की निसर्गातील अदृश्य देवाने पर्यायच ठेवला नाही. मग कमळाला चिखलावर व गुलाबाला काट्यांवर चिडून कसे चालेल? या त्रासदायक दलदलीच्या, काट्याच्या वास्तविक सत्याचा स्वीकार करून निसर्गातील सुंदरतेचा अर्थात देवत्वाचा अनुभव घेणे यातच कमळ व गुलाब यांचे हित आहे. माणसांनीही निसर्गाचे हे सार्वत्रिक कटू सत्य स्वीकारून त्यांच्या जीवनात देवत्वाचे निर्माण करण्याचा, ते देवत्व जगण्याचा व टिकविण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. असा प्रयत्न हीच निसर्गातील देवाची देवपूजा होय! अशा देवपूजेतून देवत्व निर्माण करता येते व ते जगताही येते. प्रयत्नांती परमेश्वर ही मराठी म्हण बहुतेक या नैसर्गिक सत्यावर आधारित असावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा