https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०

उडणारे पक्षी!

राजकीय नेते म्हणजे हवेत उडणारे पक्षी!

खूप हेवा वाटतो मला त्या पक्षांचा जे हवेत उडतात व त्या राजकीय नेत्यांचा जे विमानात बसून आकाशात विहार करतात. आपल्याला पण असे हवेत उडता आले असते तर किती मज्जा आली असती असा विचार अधूनमधून मनात येतो. पण नुसत्या विचारांवर हवेत उडता येत नाही हे कळल्यावर त्या विचारांना खाली बसवतो, त्यांना शांत रसात विश्रांती घ्यायला भाग पाडतो. आज असाच आकाशात पक्षांना न्याहाळत बसलो होतो. पण त्यांचे निरीक्षण करता असे लक्षात आले की हे पक्षी जास्त काळ हवेत उडू शकत नाहीत. वर उडून उडून एकतर ते थकतात व मग अन्न, पाण्यासाठी जमिनीवर येतात. हे पक्षी हवेत अंडी घालू शकत नाहीत व हवेत त्यांच्या पिलांना जन्म देऊ शकत नाहीत. त्यासाठी त्यांना जमिनीचा किंवा जमिनीवरील झाडांचा आसरा घ्यावाच लागतो. राजकीय नेत्यांचे सुद्धा तसेच असते. ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, चक्रीवादळ, अतीवृष्टी, महापूर, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तींनी झालेल्या लोकांच्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी जेंव्हा हे नेते विमानात बसून आकाशातून उडत उडत आपत्तीग्रस्त भागात जातात तेंव्हा त्यांना तिथे विमानातून उतरावेच लागते, स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांत, तिथल्या लोकांत मिसळावेच लागते. सांगायचे तात्पर्य काय तर लोकच नसतील, पक्ष कार्यकर्तेच नसतील तर राजकीय नेत्यांना कोण विचारेल? खाली जमीनच नसेल तर उडणारे पक्षी हवेत किती तग धरून राहतील? इथे प्रश्न पक्षांनी हवेत उडण्याचा नाही तर जमिनीने तिची किंमत  ओळखण्याचा आहे. तसेच इथे प्रश्न राजकीय नेत्यांनी रूबाबात राहण्याचा नाही तर त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांनी व लोकांनी स्वतःची किंमत ओळखण्याचा आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©२०.१०.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा