https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, १ मे, २०२०

हरी हरी

हरी हरी!

(१) देव ही एक संकल्पना आहे, ते सत्य नाही, असे जर काही लोक म्हणत असतील तर मग ती संकल्पना आधुनिक काळातही का चालू आहे, तिच्या पासून माणसाला असे कोणते मानसिक समाधान मिळते, कोणता मानसिक आधार मिळतो याचा नीट अभ्यास करून ती संकल्पना नीट राबवायला काय हरकत आहे, याचा योग्य, विवेकी विचार झाला पाहिजे. देश ही सुध्दा एक संकल्पनाच आहे ना, मग ती आपण का व प्रत्यक्षात कशी राबवतो? त्याच पध्दतीने देव ही संकल्पना प्रत्यक्षात कशी राबवता येईल याचा नीट विचार झाला पाहिजे.

(२) आपण या जगात, समाजात विशेष कार्य करणाऱ्या महान लोकांना आपआपल्या सोयीप्रमाणे ज्याप्रमाणे विविध जातीधर्मात, समूहात वाटून घेऊन त्यांची विभागणी केली आहे, त्याचप्रमाणे आपण एकाच परमेश्वराची विविध धर्मात, अनेक देवीदेवतांत विभागणी केली आहे. ती विभागणी नष्ट करून देवाला एकसंध करण्यासाठी आपण देव संकल्पनेकडे वेगळ्या स्वरूपात पाहिले पाहिजे. संपूर्ण विश्वाचा निर्माता व नियंता असलेल्या एकमेव परमेश्वराला एकटे राहण्याचा कंटाळा आला म्हणून त्याने स्वतःला अनेक गुणरूपांत निर्मिले (वैज्ञानिक संदर्भः विश्व निर्मितीचा महास्फोटाचा सिद्धांत अर्थात बिग बँग थिअरी) व त्या अनेक रूपांना स्वतःचेच प्रतिस्पर्धी बनवून विश्वाचा एक वेगळाच खेळ मांडला. अशी जर आपण कल्पना केली तर देव ही संकल्पना सहज, सोपी होऊन जाईल.

(३) तो एकमेव परमेश्वर किंवा देव त्याच्या अनेक रूपांना त्यांच्या मूळ ईश्वर स्वरूपाची जाणीव होऊ देत नाही आणि म्हणून ही अनेक रूपे देवाच्या या अजब खेळात स्वतःला स्वतंत्र समजून अखंडपणे खेळ खेळू लागतात, असे समजू या! पण मनुष्याला मोठी बुद्धी आहे, मोठी जाणीव आहे म्हणून तो देव संकल्पनेला अगदी सहजपणे सोडून देत नाही. आपण व देव या दोन वेगळ्या गोष्टी नसून एकच आहेत असा जेंव्हा मनुष्याला साक्षात्कार होतो तेंव्हा  मनाचा गोंधळ संपतो व मग निसर्गाचे विज्ञान व देवाचा धर्म या दोन गोष्टी एक होऊन जातात. मग नैसर्गिक गोष्टी त्यांच्या सत्य स्वरूपात म्हणजे वैज्ञानिक पध्दतीने पार पाडताना सुध्दा ती देवाचीच लीला म्हणून साक्षात्कारी माणूस त्या गोष्टी सहजपणे पार पाडतो.

(४) अशावेळी नैसर्गिक काय व दैवी काय यात फरक राहत नाही. मग अनेक देवीदेवतांच्या प्रतिमा डोळ्यांसमोर आणून त्यांची विविध नावे घेत त्यांना विविध नमस्कार करीत त्यांच्यापुढे विविध प्रार्थना करण्याची सवय हळूहळू सुटते व शेवटी असे कर्मकांड निरर्थक आहे याचा सुध्दा साक्षात्कार होतो. त्यानंतर दिवसाच्या ठराविक वेळीच देवाला नमस्कार करण्याची व वर्षाच्या ठराविक सणीच विविध देवी देवतांची विशिष्ट प्रकारे आराधना करण्याची कर्मकांडे संपून जळी तळी पाषाणी सदासर्वकाळ एकच देव दिसू लागतो व मग माणूस निसर्गाचे कोणतेही काम वैज्ञानिक पद्धतीने करताना सुध्दा ते त्या एकमेव देवाचेच काम आहे असे समजून देवाला फक्त "हरी, हरी" एवढेच म्हणून ते काम पार पाडतो. ते काम करताना कसलेही धार्मिक कर्मकांड नसते की कसलीही प्रार्थना नसते किंवा काही विशेष चमत्कार व्हावा अशी कोणतीही अपेक्षा नसते. फक्त "हरी, हरी" म्हणायचे बस्स!

-ॲड.बी.एस.मोरे©२.५.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा