https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, २६ मे, २०२०

निसर्ग माझा गुरू!

निसर्गाला गुरू मानायचे, पण देव मानायचे नाही?

(१) निसर्गाच्या म्हणजे विश्वाच्या निर्मिती मागे देव आहे की नाही, त्या निर्मिती नंतर निसर्गात देवाचे अस्तित्व, वास्तव्य आहे की नाही यावर होत असलेल्या चर्चा बस्स झाल्या व वादही बस्स झाले. काय झाले या चर्चातून, वादातून तर आस्तिक व नास्तिक असे दोन गट तयार झाले. या दोन गटांनी खरं तर बुद्धीचा फालुदा करून टाकलाय. म्हणून मी या वादातच पडत नाही. काही फायदा नाही या वादात पडून. पण मला निसर्गाचे कुतूहल आहे. त्या कुतूहलापोटी मी निसर्गाचे निरीक्षण करतो. त्याचे परीक्षण करण्याएवढा मी मोठा नाही. म्हणून निरीक्षण हाच माझ्या अभ्यासाचा पाया!

(२) या निरीक्षणातून मला कळते की निसर्ग हा स्वयंभू आहे, स्वयंपूर्ण आहे. तो कोणावरही अवलंबून नाही. मग निसर्ग हा जर एवढा मोठा, परिपूर्ण, शक्तीमान आहे तर त्यालाच देव मानले तर काय फरक पडतो? या निसर्गात जन्म घेतल्यावर हा निसर्गच तर आमचा गुरू होतो. तोच तर आम्हाला त्याच्या सान्निध्यात कसे रहायचे हे शिकवितो.

(३) गुरू म्हणून निसर्गाची शिकवण काय तर तुम्हाला मी जगण्यासाठी शारीरिक व बौद्धिक ताकद दिली आहे तिचा हुशारीने वापर करून जगा. तुम्ही माझ्यासारखे स्वयंभू व स्वयंपूर्ण होऊ शकत नसला तरी तुम्हाला माझ्या कडून मिळालेल्या मर्यादित शारीरिक व बौद्धिक शक्तीच्या जोरावर तुम्ही जास्तीतजास्त स्वावलंबी म्हणजे आत्मनिर्भर व्हा. तुम्ही तुमचे स्वत्व जाणा व स्वतःच्या नैसर्गिक अंतःस्फूर्तीने, स्वयंस्फूर्तीने, स्वप्रेरणेने स्वतःचे स्वकर्तुत्व सिद्ध  करीत स्वाभिमानी व्हा!

(४) निसर्गाचे निरीक्षण करताना व निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घेताना निसर्गाकडून मला वरील संदेश मिळतो आणि म्हणून निसर्ग हाच माझा सर्वात मोठा गुरू होतो. या महान गुरू पुढे इतर सर्व महान शास्त्रज्ञ, महापुरूष, संत, महात्मे मला लहान वाटतात. याचे कारण म्हणजे या महान लोकांचे महान कर्तुत्व हे त्यांनी निसर्ग गुरूला जवळ केल्यानेच शक्य झाले आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे.

(५) आता प्रश्न राहिला की, निसर्गाला गुरू मानायचे पण देव मानायचे नाही, असे का? याचे कारण म्हणजे मानवी मन देव संकल्पने विषयी खूप हळवे आहे. या हळवेपणातूनच देवावर विसंबून राहण्याची मानवी मनाला सवय लागते. आणि हे परावलंबीत्व निसर्गाला मान्य नाही. प्रत्येक सजीवाने स्वावलंबी व्हायलाच पाहिजे हा निसर्गाचा आग्रह असतो. उदा. वयानुसार माणसाची दृष्टी कमी होते. अशावेळी निसर्ग माणसाला काय सांगतो तर "बाबारे, दृष्टी  अधू झाली म्हणून माझ्याकडे रडत येऊन मी तूला दिलेल्या बुद्धीचा अपमान करू नकोस, त्याच बुद्धीने डोळ्यांच्या डॉक्टरकडे जा व चष्म्याचा नंबर काढून घेऊन दुकानातून चष्मा विकत घेऊन तो डोळ्यांवर लाव"! हा निसर्ग संदेश माणसाला स्वावलंबनाचे, आत्मनिर्भरतेचे शिक्षण देतो व त्या शिक्षणातून मानवी बुद्धीला शहाणपणा शिकवितो.

(६) क्षणभर अशी कल्पना करा की, निसर्ग जर देव रूपात प्रकट होऊन माणसांपुढे साक्षात उभा राहिला तर काय होईल? माणसाच्या मर्यादित बुद्धीला, इंद्रियांना निसर्गाचे ते महान देव रूप झेपेल काय? माणसेच काय पण निसर्गातील सर्व सजीव सृष्टीच ठप्प होऊन जाईल. याच प्रमुख कारणामुळे निसर्ग कधीही देव रूपात प्रकट होत नाही किंवा प्रकट होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. हे एकदा का मनाला कळले की मग निसर्गाला देव माना नाहीतर मानू नका, काही फरक पडत नाही. पण निसर्गाला गुरू मानून त्याच्याकडून त्याच्या नैसर्गिक सत्याचे अर्थात विज्ञानाचे शिक्षण घेण्यात व त्या वैज्ञानिक शिक्षणातून शहाणपणा शिकण्यात फायदाच आहे हे विसरता कामा नये.

-ॲड.बी.एस.मोरे©२६.५.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा