https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, १३ मे, २०२०

राजधर्म व नीतीधर्म

राजधर्म व नीतीधर्म!

नीती म्हणजे धोरण! धोरण दिशादर्शक असते. ते ध्येयप्राप्तीचा मार्ग दाखवते. धर्म काय किंवा कायदा काय तो नीतीधर्म असतो. ध्येयाच्या दिशेने न्याय बुद्धीने पुढे जाण्याचा तो मार्ग असतो. उदाहरणार्थ, राज सिंहासन प्राप्त करणे  अर्थात राजा होणे (लोकशाहीत देशाचा प्रमुख म्हणजे पंतप्रधान हा देशाचा लोकनियुक्त राजा असतो, निदान त्याचे स्थान राजाएवढे उच्च मानले जाते) हे जर एखाद्या राजकीय नेत्याचे ध्येय असेल तर त्यासाठी त्याला कायद्याचा नीतीधर्म (उदाहरणार्थ, निवडणूक कायदा) हा पाळावाच लागतो. राजेपद मिळविल्यानंतर राजाला राजधर्म पाळावा लागतो. राजधर्म व नीतीधर्म यात खरं तर फरक असताच कामा नये. कायद्याच्या राज्यात राजाला कायद्याच्या चौकटीत राहून अर्थात न्याय बुद्धीवर आधारित नीतीधर्मानुसारच राज्य कारभार करणे हे बंधनकारक असते. अर्थात धर्मनीती हीच राजनीती असली पाहिजे. पण असे होताना सहसा दिसत नाही. कारण राजकारणात राज सिंहासन मिळविणे ही महत्वाकांक्षा असते व तिच्यासाठी काही राजकारणी मंडळीकडून नीतीधर्माला म्हणजे कायद्याला गुंडाळून ठेवले जाते. पूर्वीचे राजे काय किंवा हल्लीचे राजकीय नेते काय, यांची वैयक्तिक महत्वाकांक्षा, स्वार्थ, असूया इत्यादी वैयक्तिक गोष्टी जनतेला नाहक सार्वजनिक युद्धाच्या खाईत लोटतात. अशा युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी जनतेला धर्मयुद्धाचे तत्त्वज्ञान शिकविले जाते. शेवटी महाभारत कथेतून तरी आपल्याला काय संदेश मिळतो? हस्तिनापूर राज्यासाठी कौरव व पांडवांत जे महायुद्ध झाले त्याला अधर्म विरूद्ध धर्म असा रंग दिला गेला असला तरी यात हस्तिनापूरच्या जनतेचे हित किती होते? दोन्हीही बाजूंनी हस्तिनापूरच्या राज सिंहासनाचा वैयक्तिक हक्कच पुढे केला गेला. बरं मग ज्या वैयक्तिक हक्कासाठी अधर्म विरूद्ध धर्म असे हे युद्ध झाले त्या युद्धात तरी धर्माचे पालन दोन्ही बाजूंनी केले गेले का, हा अभ्यासाचा विषय आहे. कौरवांनी मागे अधर्म केला होता मग पांडवांनी आता युद्धात थोडा अधर्म केला तर बिघडते कुठे असा युक्तिवाद श्रीकृष्णाने करणे म्हणजे सोयीनुसार धर्माने बदलने नव्हे काय? पण एकदा का श्रीकृष्णाला देव मानले की मग असे धार्मिक प्रश्न गौण ठरतात. म्हणून राजधर्म हा बऱ्याच वेळा नीतीधर्म रहात नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©१३.५.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा