https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ३१ मे, २०२०

वरळी बीडीडी चाळ

का रे दुरावा?

(१) वय वाढते तसे जीवनात बरेच बदल घडत जातात. तुरळक माणसे अविवाहित राहत असली तरी बरीच माणसे विवाह करून संसारात रमतात. त्यांना मुलेबाळे होतात. मग हळूहळू त्यांचे जुन्या मित्रमंडळींकडे जाणे येणे कमी होते आणि राहतात त्या फक्त जुन्या आठवणी!

(२) तुम्ही जेवढे जास्त संवेदनाशील तेवढ्या जुन्या आठवणी तुमच्या मनात पुन्हा पुन्हा येत राहतात. मी वरळीच्या बी.डी.डी. चाळीत राहायचो. त्या चाळीतले प्रेमळ वातावरण मी कदापि विसरू शकत नाही. १०×१२ च्या छोट्या खोल्यांत सर्वांचे संसार थाटलेले. घरे जेवढी चिकटून तेवढी माणसांची मनेही चिकटून!

(३) दिवाळीच्या अगोदर सगळे शेजारी करंज्या, लाडू वगैरे गोड पदार्थ बनवायचे तेंव्हा एकमेकांच्या घरात मदतीला जायचे. बहुतेक शेजारी गिरणी कामगारच असल्याने दिवाळीचा बोनस मिळाला की मग बाजारातून रवा, मैदा साखर, तेल वगैरे कच्च्या मालाच्या खरेदीची लगबग सुरू व्हायची. सर्वांची आर्थिक परिस्थिती जवळजवळ सारखी असल्याने दिवाळीचे पदार्थ बनविताना तूपाऐवजी गोडेतेलाचाच जास्त वापर व्हायचा. पण रेशनवर डालडा अर्थात वनस्पती तूप मिळायचे. त्या डालड्याचाही पदार्थ खुसखुसीत होण्यासाठी वापर व्हायचा. सगळीकडे दिवाळीच्या पदार्थांचा घमघमाट सुटलेला असायचा. एकमेकांचे पदार्थ चाखून अमूक अमूक शेजाऱ्याचा लाडू मस्तच झालाय, अमूक अमूक शेजाऱ्याची करंजी खूपच छान झालीय, अशी कुजबूज कानी यायची. दिवाळी तर सर्वजण मिळूनमिसळून धूमधडाक्यात साजरी करायचे.

(४) दिवाळीचे जाऊ द्या, पण रोजच्या दैनंदिन जीवनात सुध्दा घरात बनविलेल्या अन्नपदार्थांची देवाणघेवाण व्हायची. अमूक अमूक शेजाऱ्याच्या घरी मच्छी तळत असल्याचे लगेच कळायचे कारण त्याचा ठसका शेजारच्यांना जोरात लागायचा. संबंध खूपच जवळचे असतील तर त्या शेजाऱ्याला तो मच्छीचा तुकडा मिळायचा. 

(५) सांगता येण्यासारख्या बऱ्याच सुंदर आठवणी आहेत वरळी बी.डी.डी. चाळीतल्या त्या वास्तव्याच्या. मनातून जाता जात नाहीत त्या आठवणी. आता सगळी मंडळी विखुरलेली आहेत. जवळजवळ सर्वांचेच आईवडील आता हयात नाहीत. जी मंडळी हयात आहेत ती आता मागेपुढे माझ्याच वयाची आहेत. आता वेगवेगळ्या ठिकाणी राहणारी ही मंडळी आपआपल्या संसारात इतकी समरस झाली आहेत की एकमेकांना पुन्हा भेटून जुन्या आठवणींना उजाळा द्यायला कोणाला वेळच नाहीये. 

(६) काहीजण फेसबुक वर माझे मित्र आहेत. पण माझ्या पोस्टस ते वाचतात की नाहीत हे मला माहित नाही. नाही वाचू देत. पण कधीतरी त्यांनी फेसबुकच्या इनबॉक्स मध्ये यावे, जुन्या आठवणी काढीत मस्त गप्पा माराव्यात असे अधूनमधून वाटत राहते. फेसबुक वर असणाऱ्या एका बी.डी.डी. चाळ शेजाऱ्याचा काल वाढदिवस होता. मी व्हॉटसअपवर नाही त्यामुळे त्याला त्याच्या फेसबुक टाईमलाईन वर वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच इनबॉक्स मध्ये "कसा आहेस, मुलेबाळे काय करतात" असा मेसेज टाकलाय.  बघूया काय उत्तर येतंय ते. शेवटी सर्वांनाच या जगाचा कायमचा निरोप घ्यायचाय. जिवंत आहोत तोपर्यंत तरी अधूनमधून बोलूया की! वय झाले म्हणून काय झाले? एवढा दुरावा का?

-आपल्या सर्वांचा तोच संवेदनाशील बाळू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा