https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, ८ मे, २०२०

Instincts versus Emotions and Intelligence!

मानवी जीवनाचे निसर्ग विज्ञान!

(१) सजीवांची नैसर्गिक उत्क्रांती होत असताना मानवी जीवन हे इतर सजीवांपासून उच्च जैविक कसे झाले याचा लाखो वर्षांपासूनचा इतिहास थक्क करून सोडणारा आहे. या उत्क्रांतीत मानवी मेंदू अधिकाधिक विकसित झाला व या विकसित मानवी मेंदूनेच मानवी जीवन उच्च जैविक पातळीवर आणून सोडले.

(२) उच्च जैविक पातळी म्हणजे मानवी मनाची  मूलभूत जैविक वासनांपासून उंचावलेली उच्च भावनिक पातळी! या उच्च पातळीवर मानवी जीवनाच्या निसर्ग विज्ञानाचा अभ्यास वासना व भावना या दोन नैसर्गिक प्रेरणांत विभागून केला तर सोपा होतो. वासना म्हणजे भूक, लैंगिकता, झोप यासारख्या मूलभूत जैविक वासना. मानव सोडून इतर प्राणीमात्रांच्या मनाची पातळी ही या जैविक वासनेच्या पातळीवरच स्थिर असते. पण मनुष्याला या मूलभूत जैविक वासनांच्या बरोबर भावनाही असतात.

(३) मानवी भावनांची विभागणी दोन पातळीत करता येते. एक असते ती कनिष्ठ भावनिक पातळी जी फक्त मूलभूत जैविक वासनांनीच बरबटलेली असते. कनिष्ठ भावनिक पातळीवर मनुष्य व जनावर यात फार मोठा फरक राहत नाही. दुसरी असते ती श्रेष्ठ भावनिक पातळी जी मनुष्याला वासनेच्या कनिष्ठ पातळीवरून वर उंचावून प्रेम, करूणा, परोपकार, समाजहित, विश्वहित या परमार्थी भावनांकडे ओढून नेते. कनिष्ठ पातळीवरील भावनांना वाईट भावना व उच्च पातळीवरील भावनांना चांगल्या भावना अशी सर्वसाधारण मानवी भावनांची वर्गवारी करता येईल.

(४) वासना व भावना यांच्यासोबत मानवी मेंदूत बुद्धीचाही निवास असतो. वासना व वाईट भावना यात फारसा फरक न करता वाईट भावना व चांगल्या भावना यात फरक करणे मानवी बुद्धीला सोपे पडते. वासनेने पूर्णपणे  बरबटलेल्या वाईट भावना व प्रेम, करूणा, परोपकार, समाजहित, विश्वहित यांची ओढ असलेल्या चांगल्या भावना या दोन्ही भावनांचा संतुलित, विवेकी विचार करून त्यांच्यावर विवेकी विचाराचे स्थिर नियंत्रण मिळविणारी बुद्धी हीच मनुष्याची श्रेष्ठ बुद्धी होय. वाईट भावनांच्या आहारी जाऊन भ्रष्ट होणारी बुद्धी ही नीच बुद्धी होय. तसेच दोन्ही भावनांच्या मध्ये चाचपडणारी व ठाम विवेकी निर्णय घेऊ न शकणारी बुद्धी ही अस्थिर बुद्धी होय.

(५) मानवी बुद्धीचा विचार करता ईश्वर व धर्म या संकल्पनांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. या संकल्पनांविषयी मानवी बुद्धी बऱ्याच वेळा  गोंधळून जाते. निसर्गात ईश्वर (देव) बघायचा की नाही अर्थात आस्तिक व्हायचे की नास्तिक व्हायचे, हा देव विरूद्ध निसर्ग वाद हा मानवी बुद्धीच्या दृष्टिकोनातील गोंधळाचा भाग झाला. तर ईश्वरवादी किंवा आस्तिक होत आध्यात्मिक विचारांचा म्हणजे ईश्वराला स्मरून चांगल्या भावनिकतेचा "ईश्वर धर्म" स्वीकारायचा की निरीश्वरवादी किंवा नास्तिक होऊन ईश्वराला सोडून देऊन फक्त मानवी बुद्धीशीच प्रामाणिक असलेल्या विवेकी विचारांचा म्हणजे चांगल्या पण निरीश्वरी भावनिकतेचा "मानव धम्म" स्वीकारायचा, हा धर्म विरूद्ध धम्म वाद हा मानवी बुद्धीच्या वैचारिक किंवा तात्त्विक गोंधळाचा भाग झाला. अशी गोंधळलेली बुद्धी स्थिर होऊ शकत नाही. यावर तोडगा हाच की, जोपर्यंत दुसऱ्यांचे युक्तिवाद तुमच्या बुद्धीला पटत नाहीत तोपर्यंत तुम्ही तुमच्या विचाराशी ठाम राहिले पाहिजे!

-ॲड.बी.एस.मोरे©८.५.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा