सत्य हाच ईश्वर!
(१) महात्मा गांधी म्हणाले की Truth is God म्हणजे सत्य हाच ईश्वर! त्यांच्या या वाक्यात खूप सखोल अर्थ दडलेला आहे. हिंदू धर्मात सत्यनारायणाची पूजा केली जाते. पण त्या पूजेमागील शास्त्रीय अर्थ समजून घेण्याचा कोणी प्रयत्न केलाय का? तो अर्थ समजून न घेता चमत्कार असलेल्या काही कथा त्या पूजेत घालून लोकांना सत्यापासून अंधश्रध्देकडे नेण्याचा प्रयत्न चुकीचा आहे.
(२) महात्मा गांधी म्हणतात त्याप्रमाणे संपूर्ण विश्व हे सत्याने भरलेले आहे. विश्व म्हणजेच निसर्ग! देवाची करणी आणि नारळात पाणी या म्हणीचा अर्थ हाच की नारळ हे विश्व किंवा निसर्गाचे प्रतीक होय आणि त्यातील पाणी हे विश्वातील किंवा निसर्गातील सत्य ईश्वराचे प्रतीक होय! थोडक्यात विश्व किंवा निसर्ग हे सत्य ईश्वराचे घर किंवा मंदिर होय! या घराचे किंवा मंदिराचे सत्य हे त्यातील सत्य ईश्वराचेच सत्य होय. संपूर्ण विश्व किंवा निसर्गाचे नैसर्गिक सत्य हे त्यातील सत्य ईश्वराचेच प्रतिबिंब होय!
(३) सत्य निसर्गातील सत्य ईश्वर कसा आहे? तर तो त्या निसर्गाप्रमाणेच आहे. अर्थात आपण आपल्या शरीराला जर निसर्ग मानले तर त्या शरीरातील आपल्या मनाला आपण ईश्वर मानणे यात चूक नाही (तोरा मन दर्पण कहलाये या आशा भोसले यांनी गायलेल्या गाण्यातील मन ही ईश्वर, मन ही देवता हे शब्द आठवा). आपले शरीर व आपले मन या दोन्हीही गोष्टी सत्य आहेत व निसर्गातील सत्य ईश्वराचाच त्या आविष्कार आहेत. निसर्गाचे नैसर्गिक सत्य हे निसर्गातील सत्य ईश्वराप्रमाणे दोन स्वरूपात आहे. हे सत्य सुंदर आहे तसे बीभत्सही आहे, प्रकाशमय आहे तसे अंधारमयही आहे, चांगले आहे तसे वाईटही आहे, स्वच्छ आहे तसे अस्वच्छही आहे, सुखदायक आहे तसे दुःखदायकही आहे. हे सत्य म्हणजे ऊन सावलीचा खेळ! निसर्गात असलेल्या सत्य ईश्वराचे किंवा सत्यनारायणाचे हेच तर खरे रंग, रूप आहे व हेच गुण आहेत.
(४) निसर्गाचे नैसर्गिक सत्य हाच ईश्वर आहे हे एकदा का मनात ठामपणे पक्के केले की मग देवाविषयीच्या अंधश्रध्दा आपोआप दूर होतात. या अर्थाने ईश्वरावर श्रध्दा असणाऱ्या महात्मा गांधी यांचा ईश्वराविषयीचा दृष्टिकोन हा पूर्ण वैज्ञानिक होता हे मान्य करावेच लागेल.
(५) निसर्गातील ईश्वरी सत्य ही मिथ्या कल्पना करायची गोष्ट नाही तर प्रत्यक्षात अनुभवायची गोष्ट आहे. निसर्गातील नैसर्गिक सत्याचा खरा अनुभव हीच निसर्गातील सत्य ईश्वराची प्रत्यक्ष अनुभूती होय! निसर्गात सतत सत्यकर्म करीत रहायचे व त्या सत्यकर्माचा सत्य अनुभव घेत रहायचा हेच तर त्या सत्य ईश्वराने नेमून दिलेले ईश्वरी कार्य होय!
-ॲड.बी.एस.मोरे©२०.५.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा