https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ५ मे, २०२०

वृध्दापकाळातील शहाणपणा!

वृध्दापकाळातील शहाणपणा!

पुढच्या महिन्यात २७ जून रोजी ६३ वर्षे पूर्ण करून मी ६४ व्या वर्षात पदार्पण करणार. या कोरोना विषाणूने लॉकडाऊनच्या काळात मला अंतर्मुख केले आणि स्वतःचा विचार करायला भाग पाडले. माझ्या म्हाताऱ्या शरीराचे आता पूर्वीसारखे खाण्यापिण्याचे लाड नकोत की या शरीराला पूर्वीसारखा जड व्यायाम नको. या वयात या गोष्टी म्हणजे शरीराचे चोचले नव्हे तर वृध्द शरीराची चैनच झाली. साधे, हलके फुलके खाणे व हलका फुलका व्यायाम आता पुरेसा! तसेच माझ्या म्हाताऱ्या मेंदूचे आता पूर्वीसारखे अती विचाराचे चोचले नकोत. या उतार वयात अती खोलातला, अती लांबचा विचार करणे ही तर वृध्द मेंदूची चैनच झाली. हलका फुलका विचार, जगाकडे सहजसाध्या नजरेने बघणे हेच आता ठीक! भूतकाळ हा भूतकाळ असतो. तो पुन्हा पुन्हा आठवून काही उपयोग नसतो.  भूतकाळातील कटू आठवणींना उजाळा देणे म्हणजे म्हाताऱ्या मेंदूला उगाच ताप देणे. तसेच  भूतकाळातील रम्य आठवणींत रमणे म्हणजे उतार वयातील शरीर व मनाला न झेपणाऱ्या  जुन्या आकर्षणांना कवटाळून बसणे. अशा व यासह अनेक आकर्षणांचा व अशा बऱ्याच गोष्टींचा त्याग करणे हाच वृध्दापकाळातील शहाणपणा!

काम, क्रोध, लोभ जवळ मी केला
मद, मोह, मत्सर उगाच का केला
जगाचा लांब खोल विचार अती केला
संसार स्वतःचा उगाच दुबळा केला
बाळू म्हणे आता सोड विचार जगाचा
अंत जवळ आला आता घोर कशाचा?

-ॲड.बी.एस.मोरे©५.५.२०२०

टीपः
हा लघुलेख उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या मोठ्या माणसांसाठी जी माणसे वृध्दापकाळातही न थकता महान कार्ये करीत आहेत त्यांच्यासाठी नसून माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व असलेल्या वृध्दांसाठी आहे. त्यांनीही माझा हा विचार पटला तर घ्यावा नाहीतर सोडून द्यावा!

-ॲड.बी.एस.मोरे (५.५.२०२०)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा