https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, १६ मे, २०२०

निसर्गातील देवाला माणसाकडून काय हवंय?

निसर्गातील देवाला माणसाकडून काय हवंय?

निसर्गाचा निर्माता असलेला देव जर निसर्गातच अदृश्य स्वरूपात लपून राहून निसर्गाची भौतिक  हालचाल करीत असेल व या हालचालीतून मनुष्यापुढे अनेक भौतिक आव्हाने निर्माण करीत असेल तर मग त्या देवाला माणसाने आध्यात्मिक प्रतिक्रिया द्यावी की भौतिक? देव निसर्गातून भौतिक प्रश्न निर्माण करीत असताना मनुष्याने त्या प्रश्नांत आध्यात्मिक उत्तरे शोधत बसणे कितपत बरोबर? देवाने निर्माण केलेली निसर्गातील भौतिकता लक्षात न घेता देवाला आध्यात्मिक दृष्टीने बघत त्याला आध्यात्मिक नमस्कार करणे, त्याची आध्यात्मिक प्रार्थना करणे व त्यातून त्याच्याकडून एका बाजूने भौतिक सुख व दुसऱ्या बाजूने आध्यात्मिक शांतीची अपेक्षा करीत राहणे हे किती बरोबर? खरं तर हे आध्यात्मिकतेचे खूळ डोक्यातून काढून टाकून मनुष्याने भौतिक निसर्गातील भौतिक देवाची भौतिक आव्हाने भौतिक भावनेने व भौतिक बुद्धीने स्वीकारून भौतिक प्रश्नांवर भौतिक उत्तरे शोधली पाहिजेत. देवाची नैसर्गिकता ही भौतिकता होय हे ओळखायला हवे. निसर्गातील भौतिक देवाला माणसाकडून काय हवंय, भौतिकता की आध्यात्मिकता की दोन्हीही? पण आध्यात्मिकता म्हणजे काय तर देवापुढे शरणागती! देवाला माणसाकडून अशी आध्यात्मिक शरणागती हवीय की भौतिक हुशारी? याचा छडा निसर्गातील घडामोडींचे नीट निरीक्षण व परीक्षण करून माणसाने लावलाच पाहिजे. माणसाने त्याची मानसिकता बदलण्याचा आटापिटा करण्यापेक्षा त्याची मानसिकता व्यावहारिक बनवायला हवी. निसर्गातील देवाचा व्यवहारच जर भौतिक असेल तर मग त्या व्यवहाराला माणसाने भौतिक प्रतिक्रिया देण्यातच त्याचा व्यावहारिक शहाणपणा होय! स्वतःच्या आध्यात्मिक भावनेला व्यावहारिक वळण द्यायला मनुष्याने शिकले पाहिजे. व्यावहारिक वळण म्हणजे भौतिक वळण! भौतिक व्यवहाराचे महत्व हे भौतिक फायद्यात असते. लोकांना हा फायदा कळला की त्यांची मानसिकता बदलते. भौतिक कायद्याचे बोल हे भौतिक फायद्याचे बोल असतात. निसर्गातील देवाला माणसाकडून हा व्यावहारिक शहाणपणा हवाय का?

-ॲड.बी.एस.मोरे©१७.५.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा