भौतिक निसर्ग हाच आध्यात्मिक देव की भौतिक निसर्गाच्या मागे आध्यात्मिक देव?
(१) देव ही संकल्पना माणसाचा पिच्छा सोडत नाही, मग माणूस आस्तिक असो की नास्तिक! आस्तिक माणूस देवाला मानतोच पण नास्तिक माणूस सुध्दा जगात देव नाहीच हे आग्रहाने पटवून देण्यासाठी तार्किक युक्तिवाद करीत राहतो. म्हणजे नास्तिक माणूस सुध्दा देवाच्या अस्तित्वाला नाकारत अप्रत्यक्षपणे देवाला चिकटतोच. खरं म्हणजे, आस्तिक माणसाकडे देवाला स्वीकारण्यासाठी जसा ठोस पुरावा नसतो तसा नास्तिक माणसाकडेही देवाला नाकारण्यासाठी ठोस पुरावा हा नसतोच! दोघांकडेही असतो तो फक्त तर्क आणि तर्क!
(२) नास्तिकाच्या तर्काचा विचार नास्तिकाकडे सोपवून देऊन आस्तिकाच्या तर्काचा विचार करायचा तर मग देव ही संकल्पना नीट समजून घेतली पाहिजे. देवाला मानायचे तर मग ते कसे मानायचे हा प्रश्न इथे महत्त्वाचा आहे. देव तर दिसत नाही, मग दिसणाऱ्या निसर्गालाच देव मानायचे का? पण शेवटी निसर्ग म्हणजे तरी काय? अंतराळ विश्व व उत्क्रांत, विकसित झालेली पृथ्वीवरील सृष्टी मिळूनच निसर्ग होतो ना! या निसर्गात सूर्य, चंद्र, पृथ्वी, वनस्पती, पक्षी, प्राणी, माणसे या गोष्टीही येतात. मग निसर्गाला देव मानायचे तर या गोष्टींच्याच पाया पडावे लागेल. मग माणसांनाही देव मानून त्यांच्याही पाया पडावे लागेल! हे मनाला पटत नाही. म्हणून मग तार्किक विचार करणारे मन निसर्गाला देव मानणे टाळते. थोडक्यात, निसर्ग म्हणजे तरी काय तर भौतिक जग व निसर्गाचे विज्ञान म्हणजे तरी काय तर निसर्गाचे भौतिक सत्य!
(३) पुढचा प्रश्न हा उपस्थित होतो की, निसर्ग हा जर देव नाही तर मग देव कोण आहे? मग मानवी मन असा तर्क करते की, देव हा निसर्गापेक्षाही मोठा आहे व तो निसर्गाहून वेगळा आहे. तो निसर्गाच्या पाठीमागे अदृश्य स्वरूपात उभा आहे. तो सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तीमान आहे. तोच निसर्गाचा निर्माता, विधाता व नियंता आहे. विधाता म्हणजे विधीनियम, कायदा करणारा निसर्गाचा राजा व नियंता म्हणजे कायद्यानुसार निसर्ग नियमन, नियंत्रण करणारा निसर्गाचा न्यायाधीश. सर्वश्रेष्ठ देव अशाप्रकारे निर्माता, राजा व न्यायाधीश या तीनही भूमिका पार पाडतो हे एकदा का मनाने तर्काने कल्पले की मग मन देवश्रध्द होते. असे देवश्रध्द मन निसर्गातील आव्हानांना नीट व पूर्णपणे तोंड देता येत नाही म्हणून त्या अदृश्य पण सर्वश्रेष्ठ देवाला आध्यात्मिक भावनेने शरण जाते व त्याला भक्तीने प्रसन्न करण्याचा धार्मिक प्रयत्न करते. त्यासाठी देवाच्या भक्तीची उपवास, प्रार्थना यासारखी धार्मिक कर्मकांडे करते.
(४) शरण जायचे म्हणजे तरी काय करायचे असते? ज्यावेळी आपले शरीर व आपली बुद्धी निसर्गाचे आव्हान पेलण्यात नुसती अशक्तच नव्हे तर पूर्णपणे हतबल ठरते तेंव्हा असहाय्य होऊन निसर्गाचे भौतिक आव्हान हलके करून देणाऱ्या कोणापुढे तरी शरणागत होऊन याचक व्हायचे. या संकटातून सोडव बाबा म्हणून त्या कोणा तरी सर्वशक्तीमानाची प्रार्थना करायची. देवाशिवाय असा या जगात कोण आहे की जो सर्वशक्तीमान आहे? म्हणून मग देवालाच शरण जायचे.
(५) अशाप्रकारे अदृश्य देवापुढे आध्यात्मिक भावनेने किंवा श्रध्देनेच शरण जाता येते. तिथे स्वतःच्या शरीराचा माज व स्वतःच्या बुद्धीचा शहाणपणा बाजूला काढून ठेवावा लागतो. तिथे असते ती भावना आणि फक्त भावनाच व तीही आध्यात्मिक! आध्यात्मिक भावना व वैज्ञानिक भावना यात फरक असतो. वैज्ञानिक म्हणजे सत्य! आता जर अदृश्य देव (ईश्वर) हाच सत्य स्वरूपात पुराव्यासह सिद्ध करता येत नाही तर मग आध्यात्मिक भावनेचा व सत्याचा संबंध कसा जोडायचा? बरं, देवाचा पुरावा मागायचा तर आध्यात्मिक भावनेपुढे बुद्धीला वावच नाही. मग देवाच्या सत्याचा शोध कसा घेणार?अशाप्रकारे देव हा नेहमीच अज्ञात, अदृश्य व आध्यात्मिक पातळीवरच राहतो. देवापुढे बुद्धीचे काय काम? तिथे फक्त आणि फक्त आध्यात्मिक भावना किंवा श्रध्दा! मग देवाची चिकित्सा कशी करायची? नव्हे ती करायचीच नसते आणि इथेच श्रध्दाळू आस्तिक विरूद्ध केवळ बुद्धीलाच प्रमाण मानणारा नास्तिक यांच्यात वाद होतो.
(६) निसर्ग प्रत्यक्ष स्वरूपात बघता येतो, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. अर्थात निसर्गाचे भौतिक सत्य हे पुराव्यासह सिद्ध करता येते. म्हणून निसर्गाकडे वैज्ञानिक भावनेने बघायचे व त्याला वैज्ञानिक बुद्धीने अंगावर घ्यायचे! एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, वैज्ञानिक व आध्यात्मिक या दोन शब्दांतील अर्थात खूप फरक आहे. जिथे निसर्गाची भौतिकता आहे तिथे निसर्गाचे भौतिक सत्य म्हणजे भौतिक विज्ञान आहे व जिथे देवाची आध्यात्मिकता किंवा भावनिक श्रध्दा आहे तिथे देवाचे सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक अधिष्ठान आहे. ही आध्यात्मिक भावना माणसाला निसर्गापलिकडील देवाचा आधार घेत त्याच्यापुढे नतमस्तक व्हायला, त्याला शरण जायला प्रेरित करते.
(७) प्रश्न हा आहे की, निसर्गात रहायचे तर मग निसर्गाचे भौतिक सत्य टाळून फक्त देवावर विसंबून चालेल का? जर निसर्गाची निर्मिती हीच मुळी देवाने केली असे गृहीत धरायचे तर मग निसर्गाबरोबर निसर्गाचे भौतिक सत्यही आहे त्या स्वरूपात स्वीकारायलाच हवे ना! हे सत्य डोईजड होत असेल तर मग त्याचा भार हलका करण्यासाठी त्या महान देवाची फक्त आध्यात्मिक प्रार्थना करीत बसून चालेल का? माणूस तेवढेच करीत बसला असता तर त्याला विज्ञानाचे म्हणजे निसर्गाच्या भौतिक सत्याचे शोध लावता आले असते का व त्या सत्यावर आधारित त्याला तंत्रज्ञानातील प्रगती करता आली असती का?
(८) म्हणून आस्तिक माणसाला सुद्धा देवावर आध्यात्मिक श्रध्दा ठेवत निसर्ग व निसर्गाच्या भौतिक सत्याला वैज्ञानिक भावनेने व वैज्ञानिक बुद्धीने सोयीस्करपणे अंगावर घ्यावेच लागते! अर्थात निसर्गाच्या सान्निध्यात भौतिक निवास करताना मनुष्याला आध्यात्मिक भावनेऐवजी वैज्ञानिक भावना (सत्य दृष्टिकोन) व वैज्ञानिक बुद्धी (सत्याला प्रमाण मानणारी बुद्धी ज्यात विवेकबुद्धीचाही समावेश असतो) या दोन्हींचा आश्रय घ्यावा लागतो. अशावेळी आध्यात्मिक भावनेने भौतिक निसर्गामागील आध्यात्मिक देवाची प्रार्थना करताना आस्तिक माणसाने त्याच्या देवश्रध्देला मिथ्या गोष्टी चिकटवून अंधश्रध्द होणे हे चुकीचे होय!
-ॲड.बी.एस.मोरे©१०.५.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा