https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, १९ मे, २०२०

कोरोनाची भीती?

कोरोनाची भीती, खरे काय आणि खोटे काय?

कोरोनावर लस नाही, औषध नाही तर मग कोरोनाचे रोगी बरे कसे होतात? अहो, ज्यांचा कोरोना प्राथमिक अवस्थेत आहे व ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत आहे ते सर्दी, खोकला, तापाच्या जनरल ट्रीटमेंटने बरे होतात आणि कोरोनावर स्पेसिफिक ट्रीटमेंट नसल्याने बाकीचे मरतात हे जनतेला नीट समजावून कधी सांगणार? सूर्यप्रकाशात असलेल्या  ड जीवनसत्वामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पण सक्तीच्या लॉकडाऊन मुळे सूर्यप्रकाश दुर्मिळ झालाय त्याचे काय? लॉकडाऊन हा कोरोनावर उपाय आहे काय? रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असलेली कोरोनाग्रस्त व्यक्ती या रोगाच्या लक्षणाशिवाय मस्त राहते, पण ती समाजात कोरोना वाहक म्हणून फिरते हे विचित्र वाटत नाही काय? मग सगळ्यांनाच क्वारंटाईन करून टाकायचे काय? आम्ही वैद्यकीय तज्ञ नसलो तरी आम्हाला यातील काहीच कळत नाही असे कृपया गृहीत धरू नका! मुंबई, पुण्यातील एखाद्या कोपऱ्यात कोरोनाग्रस्त वाढत असतील तर मग तो तेवढा कोपराच रेड झोन म्हणून सील करून त्या कोपऱ्याचीच विशेष वैद्यकीय काळजी घेत राहिल्यावर सगळी मुंबई व सगळे पुणे शहर कोरोनामय झालेय असा चुकीचा संदेश गावी जाणार नाही ना? मुंबई, पुण्यातील मोठा प्रदेश कोरोनापासून सुरक्षित असेल तर तसे जाहीर का होत नाही? रोज नवीन आकडेवारी जाहीर होतेय व सरसकट प्रचंड मोठी भीती निर्माण होतेय या कोरोनाविषयीच्या नकारात्मक बातम्यांनी त्याचे काय करायचे? खरं तर, कोरोनाची भीती ही त्याच्या प्रत्यक्ष धोक्यापेक्षा त्याच्या विषयीच्या अज्ञानातच जास्त आहे, हे खरे नाही काय? कधी तळपणार ज्ञानाचा सूर्य आणि कधी होणार अज्ञानाच्या अंधाराचा नायनाट?

-ॲड.बी.एस.मोरे©१९.५.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा