आत्मनिर्भर भारत ही घोषणा भावनिक आहे, व्यावहारिक नाही!
एक तरी ॲप आहे का टिकटॉक सारखे भारतात? आणि टिकटॉक वरील लोकांची कला ही किटकिट वाटण्यासारखी गोष्ट आहे का? कला सादर करण्याची मक्तेदारी काय फक्त सेलिब्रिटी लोकांनाच आहे? आणि हे फेसबुक काय किंवा व्हॉटसअप काय ते भारत निर्मित समाज माध्यम आहे काय? ते नसते तर माझ्यासारख्या सर्वसामान्य घरात जन्माला आलेल्या व बडी पोच नसलेल्या लोकांचे लिखाण कोपऱ्यात धूळ खात पडले असते ना! वकील, डॉक्टर मंडळी फेसबुक लाईव्ह होऊन लोकांना कायदेविषयक व वैद्यकीय मार्गदर्शन करू शकतात ते या परदेशी समाज माध्यमांच्या मुळेच ना! टिकटॉक वर सादर होणाऱ्या गरिबांच्या, सर्वसामान्य माणसांच्या कलेचेही तसेच आहे. ट्वीटर वरील राजकारणी, सेलिब्रिटी लोकांची टिवटिव चालते आणि टिकटॉक वरील सर्वसामान्य माणसांच्या कलेची किटकिट वाटते? आत्मनिर्भर भारत व्हायचेय ना, मग चीनच्याच का भारत सोडून इतर सगळ्याच देशांच्या सगळ्याच गोष्टी फेकून दिल्या पाहिजेत ना! १४० कोटी भारतीय जनते पैकी किती भारतीय तयार होतील परदेशी अॕप, परदेशी समाज माध्यमे, परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकायला? जरा ही मोहीम उघडून तरी बघा! स्वातंत्र्यपूर्व काळात परकीय ब्रिटिशांबरोबर लढण्यासाठी म्हणून ही स्वदेशी चळवळ ठीक होती, पण आता असे देशप्रेमी करोडोच्या संख्येने पुढे येतील का? आत्मनिर्भर भारत ही घोषणा भावनिक आहे, व्यावहारिक नाही!
-ॲड.बी.एस.मोरे©२३.५.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा