ओम् सुख शांती!
(१) निसर्ग व देव यांना मला मरेपर्यंत सोडता येणार नाही. नास्तिक निसर्गाला जवळ करतात पण देवाला दूर करतात. त्यामागे त्यांची एक विशेष बौद्धिक धारणा आहे. पण मी निसर्ग व देव या दोघांनाही चिकटून आहे व त्यामागे माझीही एक विशेष बौद्धिक धारणा आहे. निसर्गाच्या पाठीमागे व निसर्गात भले भौतिक स्वरूपात का असेना पण कोणती तरी प्रचंड मोठी देव शक्ती असल्याशिवाय निसर्गाचा पसारा वाढू शकत नाही व त्या पसाऱ्याचा गाडा चालू शकत नाही, अर्थात आईबापाशिवाय मुले होऊ शकत नाहीत व मुलांचा नीट सांभाळ होऊ शकत नाही, ही माझी आस्तिक होण्यामागील सरळ साधी मूळ बौध्दिक धारणा!
(२) माझ्यासाठी निसर्ग म्हणजे संपूर्ण विश्व जे पदार्थमय आहे व शक्तीमय आहे. या निसर्गाचे रंग, रूप, गुण त्यातील असंख्य सजीव, निर्जीव पदार्थांच्या विविधतेमुळे वेगवेगळे आहेत. पण तरीही या निसर्गाचे (म्हणजे विश्वाचे) वैश्विक वागणे सगळीकडे म्हणजे सगळ्या विश्वात सारखेच आहे हे विशेष! पृथ्वीवरील संपूर्ण सजीव, निर्जीव सृष्टी हे पृथ्वीवरील संपूर्ण विश्व असा मर्यादित अर्थ घ्यायला हवा. कारण ग्रह, तारे युक्त अंतराळ विश्व हे प्रचंड मोठे आहे व त्यात पृथ्वीच काय पण तिच्यासोबत असलेली सूर्यमाला हा सुध्दा अंतराळ विश्वातला एक छोटासा कण आहे. त्यामुळे आपण आपल्या पृथ्वीवरील विश्वाविषयीच जास्त बोलू शकतो.
(३) निसर्गाचे वागणे हे त्याच्या विविधतेसह जगात सगळीकडे म्हणजे पृथ्वीवर असलेल्या वेगवेगळ्या प्रदेशात सारखेच आहे हे सद्याच्या कोरोना विषाणूने (कोविड-१९) सिद्ध केले आहे. विविधतेत असलेला निसर्गाचा हा वैश्विक सारखेपणा हेच सिद्ध करतो की निसर्ग हा सगळीकडे एकच आहे. सगळीकडे एकच असलेल्या निसर्गाची निर्मिती ही आपोआप झालीय की ती कोणत्या तरी दैवी शक्तीने (देवशक्तीने) केलीय हे समजायला मार्ग नाही. ही निर्मिती देवशक्तीने केली असावी असा एक बौद्धिक तर्क आहे. पण विश्वाची निर्मिती ही आपोआप झालेल्या महास्फोटाने झाली असाही काही वैज्ञानिकांचा तर्क आहे. मी तो तर्कच म्हणतो कारण त्या वैज्ञानिकांकडे बिग बँग नावाची एक थिअरी आहे जी थिअरी ठोस शास्त्रीय पुराव्याने सिद्ध झालेली नाही. नास्तिक लोक ती सिद्ध न झालेली थिअरी स्वीकारतील पण देवशक्तीचा तार्किक सिद्धांत स्वीकारणार नाहीत. मी मात्र तसा महास्फोट झालाच असेल तर त्यामागेही देवशक्तीच असली पाहिजे या मताशी ठाम आहे.
(४) माझ्या मनात येणारा दुसरा तार्किक विचार असाही आहे की निसर्गाची निर्मितीच झाली नाही. निसर्ग पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. त्याला सुरूवात नाही की अंत नाही. हा निसर्ग त्याच्या प्रचंड मोठ्या विश्वात त्याला हवा तिथे व त्याला हवा तसा त्याच्या मर्जीप्रमाणे उत्क्रांत होतो जसा तो पृथ्वीवर उत्क्रांत झाला. डार्विन या शास्त्रज्ञाने पृथ्वीवर सजीव सृष्टीची उत्क्रांती "बळी तो कानपिळी" या नियमानुसार कशी झाली हे काही वैज्ञानिक पुराव्यांसह पटवून सांगितले आहे. पण मी तर म्हणेल की पृथ्वीवर निसर्ग हा त्याच्या मर्जीनुसार उत्क्रांत झाला व या उत्क्रांती मागेही निसर्गातील गूढ शक्ती आहे. या निसर्गाचे एकंदरीत वागणेच एक गूढ आहे. मग पुन्हा मनात एक तार्किक प्रश्न असा निर्माण होतो की गूढत्वाने भारलेल्या या निसर्गालाच देव मानावे की निसर्गाहून वेगळी अशी कोणती तरी गूढ दैवी शक्ती (देवशक्ती) या निसर्गातच वास्तव्य करून आहे असे मानून त्या सर्वश्रेष्ठ शक्तीलाच देव मानावे? या तार्किक प्रश्नांची उत्तरे वैज्ञानिक पुराव्यांनी मिळणे हे खूप कठीण आहे. याचे कारण म्हणजे माणूस नावाचा स्वतःला अती बुद्धीमान समजणारा प्राणी हा निसर्गापुढे अत्यंत क्षुल्लक आहे.
(५) मी मात्र माझ्या सरळसाध्या बुद्धीने या प्रश्नांची उत्तरे शोधली आहेत जी भली लोकांना वरवरची उत्तरे वाटतील. माझ्या बुद्धीला एकच कळते आणि ते म्हणजे निसर्ग काय किंवा त्या निसर्गातला देव काय या दोन्ही गोष्टी एकमेकांत इतक्या मिसळलेल्या आहेत की त्या अलग करताच येणार नाहीत. जसे मनुष्याचे शरीर व मन या दोन गोष्टी एकमेकांपासून अलग करता येणार नाहीत. म्हणून माझ्यासाठी निसर्ग व देव या दोन्ही गोष्टी जशा एक आहेत त्याप्रमाणे निसर्गाचे भौतिक विज्ञान व देवाचा आध्यात्मिक धर्म या दोन्ही गोष्टीही एकच आहेत. एकच याचा अर्थ असा की या दोन्ही गोष्टी त्यांच्या विविधतेसह एकमेकांत योग्य प्रमाणात अशा मिसळून गेल्या आहेत की त्यातून एकच एकसंध अशी गोष्ट अस्तित्वात आली आहे किंवा पूर्वीपासूनच ती तशीच एकसंध आहे. ती एकसंध गोष्ट म्हणजे निसर्गासह देव आणि विज्ञानासह धर्म!
(६) मी अशाप्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोन जवळ बाळगूनच आस्तिक आहे. अर्थात देवाविषयीची माझी आस्तिकता ही पूर्णतः नैसर्गिक आहे. त्यात अंधश्रध्दा बिलकुल नाही. मी निसर्गातील देवापुढे "ओम् सुख शांती" असे पुटपुटतो त्यामागे मोठा अर्थ आहे. ओम् मध्ये संपूर्ण निसर्ग त्यातील देवासह सामावलेला आहे अशी मी तार्किक कल्पना करतो (ज्याची नास्तिक लोक मिथ्य किंवा असत्य कल्पना अशी संभावना करतील) व मग त्या ओम् पुढे सुख, शांती या दोनच गोष्टींची संक्षिप्त प्रार्थना करतो. कारण माझ्या मते या दोन गोष्टी मिळाल्या की सर्व गोष्टी मिळाल्या (या प्रार्थनेचीही नास्तिक लोक अंधश्रध्दा अशी संभावना करतील). ओम् मध्ये मी संपूर्ण जग व जगाचा म्हणजेच निसर्गाचा ईश्वर पाहतो आणि म्हणून त्या ओम् पुढील माझी "सुख, शांती" ही प्रार्थना फक्त स्वतःसाठी नसते तर संपूर्ण जगासाठी असते. जगात मीही आलो म्हणजे परमार्थात स्वार्थाचे समाधान हे सुध्दा आपोआप आले. माझी ही आस्तिकता माझ्यासाठी तरी पूर्ण नैसर्गिक असल्याने नास्तिक काय किंवा इतर लोक काय म्हणतात याची मी पर्वा करीत नाही.
ओम् सुख शांती!
-ॲड.बी.एस.मोरे©१८.५.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा