संसार करावा नेटका!
पती, पत्नी व मुले यांच्या कौटुंबिक नात्यातील भावनिक व व्यावहारिक नात्याचे वास्तव फार उच्च दर्जाचे उदात्त आहे. वकील म्हणून मी पती पत्नीच्या केसेस मध्ये जास्तीतजास्त तडजोडीची भूमिका घेत आलोय. घटस्फोट ही मुलांसाठी भयंकर शिक्षा असते. मुलांनी सांगितलेले नसते त्यांना जन्माला घाला म्हणून. मुलांचा त्यात काय दोष? मुलांना जन्माला घालण्यापूर्वी अगोदर पती पत्नी दोघांनीही ते दोघे मुलांची जबाबदारी संयुक्तपणे पार पाडण्यासाठी मानसिक व आर्थिकदृष्ट्या समंजस व सक्षम आहेत का याचा सुज्ञपणे विचार केला पाहिजे. पती व पत्नी दोघेही उच्च शिक्षित, आर्थिकदृष्ट्या दोघेही कमावते व विशेष करून दोघेही करियर मांइडेड असल्यास त्यांनी तर याबाबतीत एकत्र बसून नीट विचार करूनच मुलाला किंवा मुलांना जन्म द्यायचा की नाही याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. विवाह व संसार हा काही खेळ नाही की मनात आले की खेळ मांडला व मनात आले की खेळ मोडला. जीवनशैली कितीही आधुनिक होवो, वैवाहिक बंधन हे खूप जबाबदारीचे बंधन असते. हे बंधन नको असलेले स्त्री पुरूष लिव इन रिलेशनशिपचा पर्याय निवडतात. मनात येईल तेव्हा एकत्र या व मनात येईल तेव्हा सोडून द्या असला विचित्र प्रकार. हे कसले स्वातंत्र्य? विवाह संस्था टिकली पाहिजे. समाजात तिचे महत्व खूप मोठे आहे. संसारात एकत्र राहता न येणारी माणसे देशाची एकता काय सांभाळणार? देश हे सुद्धा एक मोठे कुटुंब आहे. करियर वगैरे स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी पती किंवा पत्नीने कोणीच मुलांच्या जीवनाशी खेळू नये. संसार म्हटला की कोणावरही विशेष करून जन्माला घातलेल्या मुलांवर अन्याय होऊ न देणाऱ्या तडजोडी पती व पत्नी दोघांनाही कराव्या लागतात याचे भान विवाह बंधनात पडू इच्छिणाऱ्या स्त्री व पुरूष दोघांनाही असलेच पाहिजे. म्हणून केवळ विवाहोत्तर कौटुंबिक वादात नव्हे तर विवाहपूर्व निर्णय प्रक्रियेत सुद्धा विवाहोच्छुक स्त्री पुरूषांच्या समुपदेशनाची गरज आहे.
संसार करावा नेटका. संसारासारखे दुसरे सुख जगात नाही. विवाह बंधनात राहून एकमेकांना समजून घेत, एकमेकांना आधार देत मुलांची संयुक्त जबाबदारी घेऊन त्यांना शिक्षण देणे, त्यांना आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम करणे हा फार मोठा सांसारिक आनंद आहे. त्यासाठी पती व पत्नी दोघांनीही करियर व संसार यांची सांगड घालत संतुलित तडजोडी कराव्यात व संसार नेटका, यशस्वी करावा. करियर मधील यशापेक्षा हे यश कितीतरी मोठे आहे.
-©ॲड.बी.एस.मोरे, २५.२.२०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा