https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४

ताणमुक्ती म्हणजे संन्यास!

ताणमुक्ती म्हणजे संन्यास!

पुराव्याने सिद्ध झालेल्या व त्यामुळे मेंदूने वास्तव म्हणून स्वीकारलेल्या निसर्गाच्या गोष्टी म्हणजे विज्ञान. निसर्ग व विज्ञानाचा निर्माता म्हणून परमेश्वर नावाची एक अलौकिक ईश्वरी शक्ती निसर्ग व विज्ञानाच्या मुळाशी आहे असे मानवी मेंदूमनाने एकदा का गृहीत धरले की असे मेंदूमन परमेश्वराचा विचार करते. इतकेच नव्हे तर त्याला शरण जाऊन त्याची भक्ती, प्रार्थना करते. परमेश्वर किंवा ईश्वरी शक्ती कदाचित वास्तव असेल किंवा कदाचित वास्तव नसेलही अशी रास्त शंका मानवी मेंदूमनात येऊ शकते कारण परमेश्वर ही पुराव्याने सिद्ध करता न आलेली व सिद्ध करता न येणारी गोष्ट आहे व म्हणून ती अनाकलनीय गोष्ट आहे. त्यामुळे परमेश्वराला मानायचे की नाही आणि मानलेच तरी त्याचे भक्तीभावाचे अध्यात्म किती व कसे करायचे हा प्रत्येकाच्या मेंदूमनाचा प्रश्न आहे. या प्रश्नात समाजाचा आस्तिक धर्म लुडबूड करतो तेव्हा हा वैयक्तिक प्रश्न सामाजिक पातळी वर येऊन गंभीर होतो. इतका गंभीर की परमेश्वर व त्याच्या धर्माच्या नावाने हिंसा घडतात, रक्तपात होतो. खरं तर या वैयक्तिक निर्णय प्रक्रियेत समाजाने किंवा सरकारने लुडबूड करू नये. एखाद्याने नास्तिक म्हणून जगायचे व नास्तिक म्हणून मरायचे ठरवले तर अशा नास्तिक व्यक्तीने आस्तिकांच्या आध्यात्मिक भक्ती भावनेला दुखवू नये. तसेच आस्तिक लोकांनीही नास्तिकांच्या स्वतंत्र विचाराची खिल्ली उडवू नये. हा सुज्ञ विचार नास्तिक व आस्तिक दोन्ही समाज गटांकडून व्हायला हवा. खरं तर पुराव्याने सिद्ध करता न येणारा अनाकलनीय परमेश्वर, त्याचे भक्ती भावाचे अध्यात्म व त्याच्या विषयी निर्माण झालेला आस्तिक-नास्तिक वाद या गोष्टींना निव्वळ भावनिक प्रतिसाद दिल्यास मेंदूमनात ताण निर्माण होतो. असा ताण मेंदूमनात निर्माण होऊ नये म्हणून धार्मिक, आध्यात्मिक गोष्टींकडे वैज्ञानिक दृष्टीने व तर्कशुद्ध बुद्धीने बघितले पाहिजे. हा प्रतिसादाचा भाग झाला. परमेश्वराच्या अध्यात्मालाच काय पण निसर्गाच्या विज्ञानालाही तुम्ही किती आणि कसा प्रतिसाद देता यावर तुमचे मानसिक आरोग्य बरेच अवलंबून असते. निसर्गाचे विज्ञान असो की परमेश्वराचे अध्यात्म या गोष्टींपासून पूर्णपणे अलिप्त राहता येत नाही, त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करता येत नाही, त्यांना पूर्णपणे टाळता येत नाही, त्यांच्यापासून पूर्ण मुक्ती किंवा संन्यास घेता येत नाही. पण त्यांना जास्त डोक्यावर घेतले की डोक्यावर ओझे वाढते. म्हणून मेंदूमनावरील त्यांचे ओझे कमी करून त्यांच्या ताणापासून मुक्ती मिळवता येऊ शकते. निसर्गाचे विज्ञान असो की परमेश्वरी अध्यात्म यांचे डोक्यावर (मेंदूवर) ओझे कधी निर्माण होते जेव्हा या गोष्टींना अती महत्व देऊन त्यांना जास्त डोक्यावर घेतले जाते तेव्हा. अर्थात या गोष्टींना जास्त प्रतिसाद दिल्यानेच त्यांचे ओझे मेंदूमनावर निर्माण होते व त्या ओझ्याचा ताण मेंदूमनावर वाढतो. खरं तर विज्ञान असो की अध्यात्म या गोष्टींना जेवढ्यास तेवढे महत्व व जेवढ्यास तेवढा प्रतिसाद दिल्यास मेंदूमनावर या गोष्टींचे ओझे, ताण वाढत नाही. या गोष्टींना जेवढ्यास तेवढा प्रतिसाद देऊन त्यांच्यापासून ताणमुक्त होणे म्हणजे त्यांच्यापासून संन्यास घेणे!

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.२.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा