मी मरणाच्या वयात आलो!
वैद्यकीय निष्कर्षानुसार भारतीय लोकांचे सरासरी आयुष्य ६७ वर्षे आहे व खूप कमी लोक ८० वर्षाच्या पुढे जगतात. हा निष्कर्ष कळल्यावर मला आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. माझे मन आनंदाने नाचत आहे. याचे कारण काय तर मला हे कळले की परमेश्वराने मला सरासरी वयापर्यंत म्हणजे ६७ वर्षापर्यंत मस्त जगवले. मी आणखी पाच महिन्यांनी २७ जून २०२४ रोजी ६७ वर्षे पूर्ण करून ६८ वर्ष वयात प्रवेश करणार. म्हणजे ६७ वर्षे आयुष्याची सरासरी गाठायला आता फक्त पाच महिने बाकी आहेत. त्याच्या आतच गेल्या महिन्यात परमेश्वराने मला माझ्या मृत्यूचा सिग्नल दिला. मृत्यू घंटाच म्हणा की. गेल्या महिन्यात माझ्या हृदयात सेकंड डिगरीचा हार्ट ब्लॉक निघाला. त्यामुळे माझ्या हृदयाचे ठोके अनियमित, संथ झाले. तसा मी संथ माणूस. शांतपणे हळूहळू कासवासारखा जीवन जगणारा संथ माणूस. मोठ्या श्रीमंत लोकांच्या दारात जाऊन त्यांना कमी फी मध्ये शांतपणे मोठा वकिली सल्ला देणारा व कमी पैशात मोठ्या समाधानाने जीवन जगणारा विशाल मनाचा संथ वकील. आता अशा संथ माणसाच्या हृदयाचे ठोके महान परमेश्वराने ६७ या सरासरी वयात संथ केले व मी आता मरणाच्या वयात आलोय असे संथपणे सांगितले त्याबद्दल महान परमेश्वराचे आभार मानायचे सोडून बसवू का मी तो बॕटरीवाला पेसमेकर माझ्या छातीत माझ्या हृदयाशेजारी? माझे सगळे संघर्षमय जीवन न डगमगता मी बिनधास्त धाडसाने जगलोय. असला माणूस ते कृत्रिम उपकरण छातीत लावून जगण्याचा विचार तरी करू शकेल का? छे, असे करून मी त्या महान परमेश्वराने मला दिलेल्या नैसर्गिक सुंदर शरीर यंत्राचा व त्यातील सुंदर हृदय यंत्राचा अपमान करण्याचे पाप केल्यासारखे होईल. परमेश्वरा, हे पाप मी करणार नाही. तुझा अपमान मी करणार नाही. तुझे उपकार कसे फेडू? तू प्रतिकूल परिस्थितीतही जगण्याची केवढी मोठी हिंमत मला दिलीस. आता तू ६७ या सरासरी वयात मला माझ्या हृदयात तो ब्लॉक दिलास आणि माझ्या हृदयाची गती संथ केलीस. केलीच पाहिजे! किती धावत होतो मी पोटासाठी लोकांच्या दारात जाऊन भेट वकिलीची ती अपमानास्पद मजूरी व चाकरी करण्यासाठी आणि ही असली भेट वकिली करून आयुष्याच्या शेवटी आता माझी शिल्लक काय तर माझा एक फ्लॅट. पण माझ्या या कष्टाचे फळ म्हणून त्याहूनही मोठा ठेवा तू मला दिलास. तो ठेवा म्हणजे माझी उच्च शिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम, वैवाहिक दृष्ट्या सुसंस्कारित अशी माझी एकुलती एक मुलगी व तेवढाच उच्च शिक्षित, सशक्त, समंजस माझा जावई. सोबत माझी सतत काळजी घेत मला प्रतिकूल परिस्थितीतही शेवटपर्यंत साथ देणारी माझी पत्नी. आणखी काय हवंय देवा मला! आता आणखी काही काही नको. मी जीवनात नुसता समाधानी नाही तर तृप्त आहे. चल कधी घेऊन जातोस मला या जगातून. मी आता त्यासाठी तयार झालो आहे. तुझे उपकार कसे आणि किती मानू! भयंकर वेदना देणारा कॕन्सर सारखा आजार तू मला दिला नाहीस. मी ६७ वर्षे या सरासरी वयात सुद्धा अगदी चांगला खातोय, पितोय आणि तू दिलेला हृदयाचा तो ए.व्ही. ब्लॉक बरोबर घेऊन हळूहळू चालतोय सुद्धा. देवा, सगळी माहिती घेतलीय मी त्या पेसमेकर नामक कृत्रिम उपकरणाची आणि ठाम निर्णय घेतलाय की मी तू दिलेल्या हृदयाच्या सुंदर, नैसर्गिक यंत्रात पेसमेकर नावाच्या त्या कृत्रिम उपकरणाने काड्या घालणार नाही. कशासाठी त्या काड्या घालू मी तू दिलेल्या तुझ्या सुंदर नैसर्गिक हृदय यंत्रात? ६७ या सरासरी वयानंतरही आणखी पुढे जगण्यासाठी? छे, बिलकुल नाही. कारण तुझे हे जग मी खालून वरून चांगले बघितले आहे. लोकांची हमालीही भरपूर केली आहे. आता हे जग आणखी बघण्याची इच्छा नाही व ती हमाली करण्याची इच्छा नाही. जे दिलेस ते भरपूर दिलेस. त्याने मी तृप्त झालोय व त्यामुळे मृत्यूची मला भीती वाटत नाही. आणि तू जर मला हार्ट अटॕक नावाच्या सोप्या पद्धतीने मारायचे ठरवले असशील तर मरण्याच्या अगोदर ॲडवान्समध्ये मी तुझे हृदयातून आभार मानतो. चल कधी बंद पाडतोस माझे हृदय!
-©ॲड.बी.एस.मोरे, ६.२.२०२४
https://youtu.be/3FdKjFlzxdM?si=Y9_XKzLxRbCofP2-
https://youtu.be/IDhnwY5M4c4?si=kFx5Y6GS-OZN_m5o
https://youtu.be/pkEQC0EnCXE?si=o2G1Z6ha0Eo_VcYh
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा