https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४

स्वार्थी कंपूगिरी!

स्वार्थी गटबाजी, कंपूगिरीचे दुःख!

संपूर्ण जग, सृष्टी ही परिवर्तनशील आहे. परिवर्तनशील जीवनचक्रात कालानुरूप वाढत्या वयानुसार थकलेल्या शरीराला तारूण्यातील शक्तीप्रमाणे कामाला जुंपता येत नाही व मरगळलेल्या मनाला बळेच उत्साही करता येत नाही. वृद्ध शरीर व मन ओढाताण सहन करू शकत नाही. वृद्ध माणसांची उपयुक्तता जगण्याच्या स्पर्धेत जगासाठी कमी झाल्याने त्यांची जगाशी व्यावहारिक देवाणघेवाण कमी होत जाते व त्यातून जगाशी संवादही कमी होत जातो. तरूण पिढी व वृद्ध पिढी यांच्यातील अंतर (जनरेशन गॕप) याच व्यावहारिक उपयुक्ततेच्या कारणावरून वाढत जाते. इतकेच काय वृद्धांचे वृद्धांशी संबंधही पूर्वी सारखे रहात नाहीत. त्यांच्यातील संवाद कमी होत जातात. शिवाय तरूण पिढीत जसे शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, वांशिक  किंवा जातीय अंतर असते ते अंतर पुढे वृद्धापकाळीही टिकून राहते. म्हणून तर उच्च शिक्षित शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, श्रीमंत उद्योगपती, बलवान राजकारणी, सेलिब्रिटी कलाकार व खेळाडू यांचे तरूणपणी बनलेले गट वृद्धापकाळीही कायम राहतात. त्यामुळे या पॉवरफुल लोकांचे ज्येष्ठ नागरिक संघ व सर्वसामान्य लोकांचे ज्येष्ठ नागरिक संघ वेगळे असतात. ही सामाजिक दरी वृद्धापकाळीही कायम राहते. आयुष्यभर गुंडगिरी केलेला गँगस्टर म्हातारा झाला तरी त्याची दहशत असतेच. त्यामुळे तो इतर वृद्ध माणसांच्या ज्येष्ठ नागरिक संघात नसतो. अर्थात मानवी स्वार्थ व त्यातून निर्माण झालेली गटबाजी, कंपूगिरी माणसांच्या म्हातारपणीही कायम राहते. स्वार्थ हेच मानवी दुःखाचे कारण आहे असा गौतम बुद्धांच्या चिंतनाचा निष्कर्ष आहे. स्वार्थी गटबाजी, कंपूगिरीचे हे दुःख म्हातारपणी मरणाच्या दारातही मानव समाजात कायम राहते.

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.२.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा