https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४

विज्ञानातले देवत्व?

चाकोरीबद्ध भौतिक विज्ञानातील देवत्व?

विश्वातील ग्रह, ताऱ्यांची व पृथ्वीवर उत्क्रांत झालेल्या सृष्टीची हालचाल चाकोरीबद्ध भौतिक नियमांनुसार होत असल्याचे दिसून येते. चाकोरी आली की त्यात रटाळपणा आला. मनुष्याचे जीवनही जीवनचक्रानुसार चाकोरीबद्ध आहे. परंतु या ठराविक चाकोरीत राहूनही मनुष्याने त्याच्या नैसर्गिक बुद्धी व निर्णयक्षमतेचा वापर करून निसर्गाच्या मूलभूत विज्ञानातील तांत्रिक व सामाजिक स्वातंत्र्य शोधले व अनुक्रमे तंत्रज्ञान व सामाजिक कायद्याच्या जोरावर मानवी जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न पिढ्यानपिढ्या चालू ठेवला आहे. तरीही सूर्यमालेचे नियंत्रण करणारा सूर्य, स्वतःभोवती फिरत सूर्यप्रदक्षिणा घालणारी पृथ्वी, पृथ्वी भोवती फिरणारा चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह, पृथ्वीवरील सागर, जमीन, वनस्पती, पशुपक्षी, माणसे यांची भौतिक हालचाल चाकोरीबद्धच आहे व त्यामुळे जीवनात हळूहळू ही चाकोरीबद्ध भौतिक हालचाल रटाळ, कंटाळवाणी होत जाते. या हालचालीत सगळेच आलबेल नसते. जगण्यासाठीचा संघर्ष व भीती या गोष्टी तर आयुष्यभर साथ करीत असतात. त्यातून क्षणिक सुख व शांतीचा अनुभव हा दुर्मिळ असतो. सुख व दुःख, शांती व अशांती यांचा सतत लपंडाव सुरू असतो. अशा परिस्थितीत माणूस माणसांतच देव शोधतो कारण आकाशातला अदृश्य देव प्रत्यक्षात संगतीला नसतो व तो खरंच कुठे असला तर तो नेहमी मदतीला धावून येत नाही. पण माणूस हा अदृश्य देवाला पर्याय होऊ शकत नाही. फक्त स्वतःपुरते बघणारी संकुचित मनाची स्वार्थी माणसे वाटेत येणाऱ्या दुसऱ्या माणसांना तुडवून पुढे जातात. त्यामुळे जनावरांपेक्षा माणसांचीच माणसांना भीती वाटत राहते. या वास्तव भीतीपोटीच सामाजिक कायद्याची निर्मिती माणसांनी केली. पण या कायद्याला त्याच्या मर्यादा आहेत. त्यामुळे माणूस जन्मापासून मृत्यूपर्यंत मनात भीती घेऊनच जगत असतो. तरीही अशा भयानक परिस्थितीतही काही मोठी माणसे समाजासाठी वरदान ठरतात. अशा थोर माणसांत लोकांचे कल्याण साधणारे, लोकांना सुरक्षित करणारे व लोकांना आधार देणारे राजे, नेते, जनकल्याण, जनसुरक्षा व जनाधार या त्रिसूत्रीवर विराजमान होऊन कार्यरत राहतात. अशा काही थोर माणसांना लोकांनी परमेश्वराचा अवतार मानले तर त्यात त्यांची चूक काय? परंतु अशा महामानवांच्या मृत्यूनंतर लोकांनी त्यांच्या प्रतिमा, मूर्ती मंदिरात ठेवून त्यांची पूजा अर्चा करणे, त्यांच्या कडून चमत्काराची अपेक्षा करणे हे अंधश्रद्ध वर्तन असल्याने ते मात्र चुकीचेच!

-©ॲड.बी.एस.मोरे, १७.२.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा