ही माझ्या मेंदूमनाची समस्या, इतरांच्या नव्हे!
स्वार्थी जगात लोकांना असलेली माझी उपयुक्तता जर संपली असेल तर माझ्या सादाला लोकांकडून प्रतिसाद मिळण्याची माझी अपेक्षा मुळातच चुकीची होय. याचाच दुसरा अर्थ असा की, आता इतर लोकांची उपयुक्तता सुद्धा माझ्यासाठी संपली. अशा परिस्थितीत, माझ्याकडे बघून न बघितल्यासारखे करणारे, असून नसून सारखे असलेले बिनकामाचे व बिनफायद्याचे लोक माझ्यासाठी निरूपयोगी. अशा लोकांशी आता मी तरी संबंध का ठेवावेत? नुसती माणुसकी म्हणून, नुसता चांगुलपणा म्हणून, नुसता सुसंस्कृतपणा म्हणून का मी असे पोकळ संबंध ठेवावेत? परंतु असा सुसंस्कृतपणा एकतर्फी नसतो? त्याची जबाबदारी फक्त मी एकट्यानेच खांद्यावर का घ्यावी? आता असे संबंध संपले हे माझ्या भावनिक मनाला मीच पटवून दिले पाहिजे व असे संबंध संपवून टाकले पाहिजेत. कारण उगाच डोक्यात ठेवलेले असे बिनकामाचे संबंध मनाला ताप, त्रास देतात व उपद्रवी ठरतात. अशा संबंधाकडे जेवढ्यास तेवढे किरकोळ लक्ष देणे हेच आता माझ्या मनःशांती साठी आवश्यक आहे. असा ठाम निश्चय करून तसे वागता येत नसेल तर ती माझ्या मेंदूमनाची समस्या आहे, इतरांच्या नव्हे!
-©ॲड.बी.एस.मोरे, २१.२.२०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा