https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

माझी चळवळ बंद!

माझी चळवळ बंद, बंद, बंद!

लहानपणापासून चळवळी बघत आलोय व त्यातून शिकत आलोय. या चळवळी लोककल्याणासाठी असतात का? या चळवळींतून स्वतःच्या कल्याणासाठी भांडवल निर्मिती करून शेत जमिनी विकत घेऊन सधन शेतकरी झालेले तर काहींनी कारखाने उभे करून श्रीमंत  उद्योगपती झालेले धूर्त, वस्ताद लोक मी बघितले. याला काही अपवाद निघाले पण त्यांच्या आयुष्याची वाट लागली.

अशा स्वार्थी चळवळींपासून मी लांब राहिलो. या गोष्टी माझ्या मनाला पटत नाहीत. शुद्ध राजकारण, शुद्ध समाजकारण, शुद्ध अर्थकारण इतकेच काय शुद्ध ज्ञानकारणही समाजात दुर्मिळ होत गेले व आता तर ते शोधूनही सापडेनासे झालेय. धर्मकारणाविषयी तर न बोललेले बरे. स्वार्थी अर्थकारणासाठी, स्वार्थी राजकारणासाठी व तसेच समाजात अंधश्रद्धा पसरवण्यासाठी धूर्त लोक देवधर्माचा दुरूपयोग, गैरवापर करत असताना स्पष्टपणे दिसत आहे. श्रीमंत भांडवलदार, धूर्त राजकारणी व दहशतखोर गुन्हेगार यांची दुष्ट साखळी घट्ट झाल्याचे दिसत आहे. लोकशाहीचे रूपांतर झुंडशाहीत होत असल्याचे दिसत आहे. पण माझी वकिली व माझी देवप्रार्थना या गोष्टी रोखू शकत नाही. त्यामुळे आयुष्यात माझ्या ज्ञान व धैर्याच्या जोरावर मी जी काही थोडीफार सामाजिक चळवळ केली ती आता बंद. माझी ती चळवळ या भयंकर दुष्ट रेट्यापुढे इतकी कमकुवत, इतकी क्षीण ठरली की ती कोणाच्या नजरेसही आली नाही.

आजूबाजूला चाललेल्या या स्वार्थी चळवळी बघून मीही चळवळ केली व ती चळवळ म्हणजे अशिक्षित व गरीब कौटुंबिक वातावरणात खूप हिंमतीने, खूप जिद्दीने, खूप कष्टाने उच्च शिक्षण घेण्याची चळवळ. याच चळवळीतून मी वकील झालो. पण वकील बनून पोटासाठी शेवटी मला काय करावे लागले तर काही सधन शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतमजूरी करावी लागली व काही श्रीमंत कारखानदार लोकांच्या कारखान्यांत जाऊन चाकरी करावी लागली.

मी या स्वार्थी चळवळी लोकांच्या दारात वकील म्हणून जाणे ही गोष्टच माझ्या उच्च शिक्षणाचा, माझ्या प्रामाणिक वकिलीचा घोर अपमान होता. पण या वकिलीत कोणाचाही भरभक्कम पाठिंबा नसल्याने मला हा अपमान सहन करावा लागला. माझ्या घराला मी वकिलीचा फलक (बोर्ड) लावला पण माझ्या घराच्या दारात माझ्या ज्ञानाला योग्य किंमत देणारे अशील आलेच नाहीत. शेवटी मलाच स्वार्थी चळवळी लोकांच्या दारात माझे ज्ञान घेऊन जावे लागले. दुसऱ्याच्या दारात जाऊन चांगल्या मालाची विक्री करू पाहणाऱ्या फिरत्या विक्रेत्याच्या मालाची लोक काय किंमत करतात? अगदी तसेच माझ्या ज्ञानाचे झाले.

काय म्हणावे माझ्या या असल्या वकिलीला? पण मी शेवटी फिरता वकील म्हणूनच प्रसिद्ध झालो. गंमत ही की अगदी कालपरवा सुद्धा एका माणसाने मला मेसेज केला की त्याचा काहीतरी कायद्याचा प्रश्न आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी मी त्याच्या नरीमन पॉईंट, मुंबई येथील कार्यालयात येऊ शकतो काय? काय म्हणावे या असल्या मागणीला? प्रश्न त्याचा, कायदेविषयक चर्चा त्याच्या प्रश्नावर करायची आणि त्यासाठी तो मला माझ्या डोंबिवलीच्या घरातून त्याच्या नरीमन पॉईंटच्या आॕफीसात बोलवतोय आणि त्यासाठी तो मला फी किती देणार यावर काही बोलत नाही? फिरता वकील म्हणून प्रसिद्ध झालेला मी वकील माझ्या भेटीची व नुसत्या चर्चेची फी कमीतकमी किती मागावी? निदान १०००० रूपये तरी पण नाही मला तो १००० रू. एवढी कमी फी सुद्धा त्याच्या दारात जाऊनही देणार नाही याची मला खात्री होती. शेवटी मी पडलो भिडस्त! म्हणून त्याला माझे खरे ते वैद्यकीय कारण सांगून शक्य नाही असे स्पष्ट सांगून टाकले. शिवाय त्याने ती तुटपुंजी १००० रू. फी त्या भेटीची व त्या चर्चेची दिली असती तरी माझे मन आता अशा फुटकळ भेटी व चर्चेला तयार नाही.

वकील असून आयुष्यभर श्रीमंतांच्या शेतात जाऊन एकतर शेतमजूरी केली किंवा त्यांच्या कारखान्यांत जाऊन चाकरी केली. भले ही मजूरी किंवा चाकरी कधी तीन तासांची, कधी दोन तासांची तर कधी एक तासाची होती तरी ती स्वतंत्र बाण्याची वकिली मुळीच नव्हती. लोकांच्या दारात जाऊन कसला वकिलीचा रूबाब दाखवणार मी? त्यांच्या दारात लांबून जाणे हे होते शारीरिक कष्ट व त्यांच्या शेतीतील किंवा कारखान्यातील कचरा माझ्या  कायद्याच्या ज्ञान कौशल्याने साफ करणे हे होते बौद्धिक कष्ट. हे दुहेरी कष्ट मी स्वार्थी चळवळी लोकांच्या शेतात व कारखान्यांत जाऊन ६७ वर्षे वयातही गेल्या महिन्यापर्यंत  करीत होतो.

पण आता परमेश्वरालाच ही गोष्ट पटली नसावी. त्याने माझ्या या दारोदारी भटकण्याच्या वकिलीला चांगलाच खुट्टा मारून ठेवलाय. खरं तर परमेश्वराने हे खूपच मस्त काम करून टाकले. त्याने हृदयाचे ठोके नियमित ठेवणारा माझ्या हृदयाचा इलेक्ट्रिक ट्रान्समिटरच बिघडवून टाकला कसला तो ए.व्ही. ब्लॉक माझ्या हृदयात निर्माण करून. आता  डॉक्टरने कसला तो पेसमेकर माझ्या हृदयात बसवण्याचा वैद्यकीय सल्ला दिलाय. कशासाठी बसवू मी ते कृत्रिम उपकरण माझ्या हृदयात? पुन्हा लोकांची ती हमाली लोकांच्या दारात जाऊन करण्यासाठी? नाही म्हणजे नाही, बिलकुल नाही! आता तो पेसमेकर नाही की ती हमाली नाही. माझी चळवळ बंद, बंद, बंद!

-©ॲड.बी.एस.मोरे, ५.२.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा