विज्ञान तंत्रज्ञानाचे नैसर्गिक वास्तव व सामाजिक कायद्यातील नैतिक, आध्यात्मिक परमार्थ!
निर्जीव पदार्थांचे पदार्थ विज्ञान व रसायनशास्त्र, अर्धसजीव वनस्पतींचे वनस्पती शास्त्र, सजीव पशुपक्षी, माणसांचे प्राणी शास्त्र (वनस्पती शास्त्र व प्राणी शास्त्र मिळून बनते जीवशास्त्र) अशी पृथ्वीवरील सजीव, निर्जीव पदार्थांची व त्यांच्या निसर्ग शास्त्रे/विज्ञानांची सर्वसाधारण विभागणी पृथ्वीवर आढळून येते. यात माणसे व त्यांचे प्राणी शास्त्र थोडे हटके आहे कारण माणूस सर्व प्राण्यांत जास्त बुद्धिमान प्राणी आहे.
निसर्ग शास्त्रे/निसर्ग विज्ञाने ही विविध पदार्थांमधील भौतिक/नैसर्गिक देवाणघेवाणीची शास्त्रे/विज्ञाने होत. म्हणून या सर्वांना भौतिक शास्त्रे/भौतिक विज्ञाने असेही म्हणता येईल. परंतु निर्जीव पदार्थांमधील भौतिक/नैसर्गिक देवाणघेवाणीचे पदार्थ विज्ञान हेच तेवढे भौतिक शास्त्र/भौतिक विज्ञान ही व्याख्या चुकीची आहे. भौतिक शास्त्र/भौतिक विज्ञान व्यापक आहे. भौतिक विज्ञानात पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, वनस्पती शास्त्र, प्राणी शास्त्र ही सर्व शास्त्रे/विज्ञाने येतात.
पृथ्वीवरील सर्व सजीव, निर्जीव भौतिक पदार्थ व त्यांची सर्व भौतिक विज्ञाने (ज्यात स्त्री पुरूष लैंगिकता व माणसांचे पुनरूत्पादन यासारख्या मानवी प्राणी शास्त्राचाही भाग आला) यांची माणसा माणसांतील (आंतरमानवी) देवाणघेवाण हा खास वेगळा विषय आहे ज्याला समाजशास्त्र असे म्हणतात. हे आंतरमानवी समाजशास्त्र भौतिक विज्ञानाला जोडला गेलेला एक विशेष पूरक पर्यावरणीय भाग आहे. पण या पूरक पर्यावरणीय भागाला भौतिक विज्ञान म्हणणे चुकीचे होईल. पण मानवी समाजशास्त्राचा हा पूरक पर्यावरणीय भाग जैविक उत्क्रांतीच्या अगदी शेवटाला किंवा टोकाला असल्याने कदाचित तो भौतिक विज्ञानापासून वेगळा वाटू शकतो. परंतु समाजशास्त्र हे काही फक्त माणसांपुरतेच मर्यादित नाही. सिंहासारखे प्राणी सुद्धा कळपाने राहतात व त्यांचे ही समाजशास्त्र असते व त्यांचाही सामाजिक कायदा असतो. फरक इतकाच की इतर प्राण्यांतील सामाजिक कायदा हा बळी तो कानपिळी या नियमावर आधारित असतो तर आंतरमानवी सामाजिक कायद्यात नैतिक भावना व विवेकबुद्धीचा संगम असतो.
भौतिक पदार्थ व त्यांच्या भौतिक विज्ञानांची आंतरमानवी/सामाजिक देवाणघेवाण नियंत्रित करणाऱ्या कायद्याला सामाजिक कायदा असे म्हणतात. भौतिक विज्ञानांची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही तांत्रिक असते म्हणून त्याला तंत्रज्ञान म्हणतात. पण भौतिक पदार्थ, त्यांचे भौतिक विज्ञान व त्या भौतिक विज्ञानाचे तंत्रज्ञान या सर्वांच्या आंतरमानवी सामाजिक देवाणघेवाणीला तंत्रज्ञान म्हणणे चुकीचे होईल. ही सामाजिक देवाणघेवाण पूरक समाजशास्त्र व सामाजिक कायद्याचा विशेष भाग आहे. भौतिक विज्ञानाची प्रैक्टिस (अंमलबजावणी) तंत्रज्ञानाने केली जाते तर समाजशास्त्राची प्रैक्टिस (अंमलबजावणी) सामाजिक कायद्याने केली जाते. मानवी मनाची नैतिक भावना व विवेकबुद्धी यांचा सुरेख संगम म्हणजे सामाजिक कायदा.
समाजशास्त्र व सामाजिक कायद्यात माणुसकी म्हणजे मानवी मनाचा चांगुलपणा, मानवी नैतिकता, उदात्त भावना, सुसंस्कृतपणा यांचा काही प्रमाणात तरी समावेश होतो. पण भौतिक विज्ञान-तंत्रज्ञानात कसली माणुसकी, कसली नैतिकता? तिथे फार तर पर्यावरणीय संतुलनाचा विचार म्हणजे शेवटी तांत्रिक भागच येतो. या तांत्रिक भागाला नैतिकतेचा मुलामा देणे चुकीचे.
माणसाला भोगावी लागणारी आजार, वृध्दत्व, मृत्यू यासारखी दुःखे हा तर भौतिक विज्ञानाचा भाग आहे. गौतम बुद्धांना या तीन गोष्टी दिसल्या व त्या त्यांच्या चिंतनाच्या कारण बनल्या. या गोष्टी हे नैसर्गिक वास्तव आहे जे कितीही परमेश्वर भक्ती, देव प्रार्थना केली तरी टाळता येत नाही. मानवी स्वार्थ हेही मानवी दुःखाचे कारण आहे. गौतम बुद्धांना त्यांच्या चिंतनातून मानवी दुःखाचे हे कारण कळले जे कारण माणसाला टाळता येत नाही. फार तर नैतिक भावना व विवेकबुद्धी यांचा सुरेख संगम असलेल्या सामाजिक कायद्याने ते नियंत्रित करता येते.
भौतिक स्वार्थ व नैतिक परमार्थ या दोन्ही गोष्टी सामाजिक कायद्याच्या माध्यमातून माणसाला साध्य करता येतात. नैतिक परमार्थाला परमेश्वर जोडून नैतिक परमार्थाचे रूपांतर आध्यात्मिक परमार्थात होऊ शकते. याचा अर्थ सामाजिक कायद्यातून आध्यात्मिक परमार्थही साधता येऊ शकतो.
-©ॲड.बी.एस.मोरे, २३.२.२०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा