दुरून डोंगर साजरे!
विश्वाचा पसारा इतका मोठा आहे की त्याचा अंदाज सुद्धा नीट करता येत नाही. विश्व म्हणजेच निसर्ग आणि या निसर्गातील विविधता लांबून सुंदर भासली तरी आपण तिच्या जेवढे जवळ जाऊ तेवढी ती किचकट, कठीण होत जाऊन तापदायक होते. कुतूहलाचे समाधान म्हणून विश्वाचे लांबून दर्शन घेणे म्हणजे त्याचे सामान्य ज्ञान घेणे वेगळे आणि त्याच्या एकदम जवळ जाऊन त्याचे विशेष ज्ञान घेऊन त्याच्या कार्यात प्रत्यक्ष सहभाग घेणे वेगळे. उदाहरणार्थ, सूर्याला लांबून बघणे, त्याच्या उष्णतेचा, प्रकाशाचा लांबून फायदा घेणे वेगळे व त्याच्या जवळ जाऊन त्याच्या उर्जा कार्यात प्रत्यक्षात सहभागी होणे वेगळे.
विश्व पसाऱ्याच्या व निसर्गाच्या विविधतेच्या जेवढे जवळ जावे तेवढया गोष्टी अधिकाधिक कठीण होत जातात. निसर्गाने एकीकडून माणसाला प्रचंड मोठी बुद्धिमत्ता व निर्णयक्षमता दिली आहे तर दुसरीकडून निसर्गाचा पसारा प्रचंड वाढवून व त्यातील विविधता कठीण करून माणसाचे जीवन प्रचंड आव्हानात्मक व संघर्षमय करून ठेवले आहे.
आकाशात असंख्य चांदण्या, ग्रह, तारे असतात. पण त्यांच्याशी आपला प्रत्यक्ष संपर्क, प्रत्यक्ष संबंध व त्यांच्या हालचालीतील प्रत्यक्ष सहभाग किती असतो? अगदी तसेच या पृथ्वीतलावर निरनिराळ्या प्रदेशात असंख्य माणसे जगत असतात पण त्यांच्याशी आपला प्रत्यक्ष संपर्क, प्रत्यक्ष संबंध, तसेच त्यांच्या हालचालीतील प्रत्यक्ष सहभाग किती असतो? माध्यमातून त्यांच्या बातम्या बघणे, वाचणे वेगळे व त्यांच्याशी प्रत्यक्षात व्यावहारिक संबंध असणे वेगळे.
आपल्या जवळचे कोण, आपल्या समोर परिस्थितीने काय मांडून ठेवलेय व आपल्यासाठी व्यवहार्य गोष्ट कोणती याकडेच प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. आपल्याशी संबंध नसलेल्या बाकीच्या गोष्टींकडे एक विरंगुळा (टाईम पास) म्हणूनच बघितले पाहिजे. थोडक्यात, दुरून डोंगर साजरे!
-©ॲड.बी.एस.मोरे, १७.२.२०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा