https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४

दैव जाणिले कुणी!

दैव जाणिले कुणी?

पृथ्वीवरील सर्व पदार्थ-प्राणीमात्रांवर पृथ्वीच्या सर्व भागात सारखाच प्रभाव टाकणाऱ्या विज्ञानातून व या प्राणीमात्रांतील सर्वात बुद्धिमान असलेल्या माणसांवर पृथ्वीच्या सर्व प्रदेशात जवळजवळ सारखाच प्रभाव टाकणाऱ्या सामाजिक कायद्यातून एखाद्या प्राण्याच्या किंवा माणसाच्या वाट्यास अगदी सहज, न मागता आलेले विशेष अकल्पित वास्तव जे दैवी आधार देणारे असेल किंवा दुर्दैवी निराधार करणारे असेल अशा विशेष वास्तवाला दैव/दुर्दैव, देवाचा आशीर्वाद/देवाचा शाप, प्रारब्ध, नशीब, नियतीचा फेरा वगैरे म्हणतात.

दैव सुखकारक, आनंद देणारे असते तर दुर्दैव दुःखकारक, पीडा देणारे असते. नशीब फळफळल्याने जे यश मिळते ते प्रयत्नवादी कर्तुत्वाचे यश नसते. त्यामुळे अशा यशाची उगाच फुशारकी मारणे चुकीचे. अविरत प्रयत्नाने, स्वकर्तुत्वावर मिळविलेले यश किंवा स्वतःच्या फालतू मस्तीने अंगावर ओढवून घेतलेले संकट हा नशिबाचा भाग नसतो. तो तुमच्या कर्माचा भाग असतो.

दैव किंवा दुर्दैव ही ठरवून प्रयत्न करता सहज, न मागता, योगायोगाने मिळणारी फायद्याची किंवा सहज, न मागता, योगायोगाने अंगाशी येणारी गोष्ट होय. परंतु ठरवून प्रयत्न केलेल्या कर्मातही नशिबाचा भाग असू शकतो. काहींना थोडा प्रयत्न केला तरी दैवाने सहज मोठे यश मिळते तर काहींना सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न करूनही मार्गात अडथळ्यांचे दुर्दैव सतत आडवे आल्याने फार थोडे यश मिळते.

प्रश्न हा आहे की, कोणाच्या नशिबी चांगले दैव तर कोणाच्या नशिबी वाईट दुर्दैव या गोष्टी परमेश्वराने जर अगोदरच ठरवून टाकल्या असतील तर मग देवाच्या आर्त प्रार्थनेला व प्रयत्नांती परमेश्वर या म्हणीला काय अर्थ राहतो? शेवटी काय, तर दैव जाणिले कुणी!

-©ॲड.बी.एस.मोरे, २१.२.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा