https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

आता लोकांच्या मागे लागणे बंद!

आता लोकांच्या मागे लागणे बंद!

स्वकष्टाने मिळवलेले माझे ज्ञान मी लोकांपुढे खूप पाजळले. पण त्यांना त्याची कदर नाही. व्यापारी भाषेत बोलायचे तर माझ्या ज्ञानाची लोकांना गरज नाही म्हणून माझ्या ज्ञानाला बाजारात मागणी नाही, उठाव नाही.

भारतीय स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास मी वाचला. तो इतिहास म्हणजे मागील पिढीचा इतिहास जी पिढी नैसर्गिक जीवन चक्रानुसार कालवश झाल्याने आता हयात नाही. त्या इतिहासात बघितले तर असे दिसून येईल की वर्तमान काळात जशी फक्त काही लोकांचीच शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रांत चलती आहे तशी चलती त्या काळातही फक्त काही मूठभर लोकांचीच होती व ते मूठभर लोकच समाजात चमकत होते. याचा अर्थ असा नव्हे की फक्त त्या मूठभर लोकांकडेच काही विशेष गुण होते, काही विशेष बुद्धिमत्ता होती. असे कितीतरी हिरे त्या काळातही झाकोळले गेले होते. त्यांना चमकण्याची संधी मिळाली नाही किंवा त्यांना हेतुपुरस्कर त्या काळातील काही मूठभर सरंजामी प्रवृत्तीच्या लोकांकडून डावलले गेले. प्रतिकूल परिस्थितीतून काही महान माणसे त्या काळात पुढे आली पण त्या पुढे येण्यामागे फक्त त्यांचे विशेष गुण, विशेष बुद्धिमत्ताच कारणीभूत नव्हती तर योगायोगाने इतर घटकही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले ज्यांच्या पाठिंब्याने त्या व्यक्ती त्या काळी समाजात चमकू शकल्या व पुढे इतिहासात अजरामर होऊन वर्तमानकाळात मार्गदर्शक म्हणून उभ्या राहिल्या.

आता वर्तमान काळात वर्तमान पिढी कडूनही तेच होताना दिसत आहे. मी त्या महान व्यक्तींएवढा मोठा नाही. पण वास्तव हे आहे की स्वकष्टार्जित सखोल ज्ञान व प्रामाणिकपणा या चांगल्या गोष्टी जवळ असूनही या गोष्टींना उचलून धरणारे आर्थिक दृष्ट्या व राजकीय दृष्ट्या सबळ व्यक्तींचे पाठबळ तर मला मिळाले नाहीच पण समाजातूनही माझ्या या चांगल्या गोष्टींना झिडकारले गेले. त्यामुळे साहजिकच माझे ज्ञान माझ्या जवळच कुजले गेले, सडले गेले.

माझ्या ज्ञानाला व प्रामाणिकपणाला उचलून धरणारी पॉवरफुल माणसे योगायोगाने म्हणा किंवा आणखी कशाने म्हणा मला का मिळाली नाहीत? याला काहीजण दैव, नशीब म्हणतील तर काहीजण प्रारब्ध. या काहीजणांना तसे खुशाल म्हणू द्या. मी त्याकडे लक्ष दिले नाही व देणार नाही. दैवी चमत्कारावर माझा बिलकुल विश्वास नाही व तसल्या चमत्काराची मी अपेक्षाही करीत नाही. त्यासाठी देवळात जाऊन घंटानाद करण्यात, देवाच्या पोथ्या वाचण्यात किंवा देवाची जपमाळ ओढत बसण्यात मला जराही रस नाही. कारण माझे अध्यात्म हे अंधश्रद्ध नसून वैज्ञानिक आहे, वास्तव आहे. या अनुभवातून बोध घेऊन उतार वयात एकच गोष्ट करणार व ती म्हणजे सखोल अभ्यास करून अतिशय कष्टाने मिळवलेले ज्ञान आता लोकांपुढे फुकटात पाजळायचे नाही व आपले ज्ञान लोकांनी उचलून धरावे म्हणून लोकांच्या मागे लागायचे नाही व त्यांच्या नादी लागायचे नाही. माझ्या ज्ञानाला ओळखण्याची समाजातील लोकांची पात्रता नाही, लायकी नाही त्यांच्याकडून कसली अपेक्षा करीत बसायचे? स्वतःचे ज्ञान स्वतःपुरते वापरायचे व स्वतःसाठी एन्जॉय करायचे. आता लोकांच्या मागे लागणे बंद!

-©ॲड.बी.एस.मोरे, ६.२.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा