अर्धज्ञानी लोक आणि स्वार्थाचा बाजार!
निसर्गाच्या विविधतेत त्याचे विविध ज्ञान शाखांत विखुरलेले विज्ञान आहे. विज्ञान म्हणजे निसर्गाच्या वास्तवाचे ज्ञान. निसर्गात जोपर्यंत हे विज्ञान आहे व त्या विज्ञानाचा भाग असलेली माणसे आहेत तोपर्यंत माणसे त्या विज्ञानाशी झोंबाझोंबी करीत राहणार व त्या झोंबाझोंबीतून विज्ञानाच्या विविध ज्ञान शाखांत विशेष ज्ञान व प्रावीण्य मिळवून त्या अर्धवट ज्ञानाच्या व प्रावीण्याच्या जोरावर ही अर्धवट ज्ञानी माणसे निसर्ग पदार्थांच्या तुकड्यांवर सत्ता गाजवत एकमेकांना एकमेकांवर अवलंबून ठेवणार. कोणताही एक मनुष्य त्याच्या मर्यादित आयुष्यात संपूर्ण विज्ञानाचे ज्ञान मिळवू शकत नाही मग संपूर्ण विज्ञानात प्रावीण्य मिळविण्याची तर गोष्टच सोडा.
त्यामुळे प्रत्येक माणसाला कोणत्या तरी विज्ञान शाखेत (समाजशास्त्र व सामाजिक कायदा हाही निसर्ग विज्ञानाचाच एक भाग) ज्ञानसंपन्न व प्रवीण होऊन विविध वस्तू, सेवांच्या देवाणघेवाणीच्या बाजारात स्वतःचे वैशिष्ट्य विकण्याचा प्रयत्न करावाच लागतो. या बाजारात परावलंबीत्व असते तसा नफ्या तोट्याचा हिशोब असतो, व्यावहारिक शहाणपणा असतो तसा अती स्वार्थातून निर्माण होणारा अप्रामाणिकपणा, संशय, अविश्वास, विश्वासघात, भ्रष्टाचार असतो.
स्वार्थाच्या बाजारातील अर्धज्ञानी माणसे स्वतःजवळ असलेल्या अर्धवट ज्ञानाचे व मर्यादित पदार्थ संपत्तीचे मोल ग्राहकांना (गरजूंना) एवढ्याचे तेवढे करून सांगतात व परावलंबी ग्राहकांना जास्तीतजास्त कसे लुटता येईल याचाच स्वार्थी (बहुधा महास्वार्थी) विचार करीत असतात व या स्वार्थी, व्यापारी वृत्तीतून एकमेकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत राहतात.
स्वार्थाच्या अशा बाजारात माणसा माणसांमध्ये माणुसकी रहात नाही. माणसे एकमेकांना माया प्रेमाने बघत नाहीत. स्वार्थाचे काम संपले की ओळख देत नाहीत. बाजारात स्वार्थ बोकाळला की मग लोक कायद्याला जुमानत नाहीत. अशा बाजारात कायद्याविषयीचा आदर व वचक कमी होतो. त्यामुळे बाजारू सामाजिक व्यवहारात भ्रष्टाचार वाढतो. हळूहळू विज्ञानाच्या बोकांडी तंत्रज्ञान बसते आणि विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास सुरू होतो. देवाच्या धर्मात ढोंग घुसते आणि अध्यात्मातला देव निष्क्रिय होतो. तरीही असहाय्य झालेली देवश्रद्ध आस्तिक माणसे कठीण विज्ञानात व माणसांच्या स्वार्थी बाजारात देवाने मदत करावी म्हणून देवाला साकडे घालीत राहतात.
या लेखाचा सार एवढाच की, स्वार्थी व्यवहारी जगात, व्यापारी बाजारात माणुसकी, माया प्रेम शोधत फिरणे हा शुद्ध वेडपटपणा होय. मायाप्रेम हे स्वतःच्या कुटुंबापुरतेच मर्यादित असते, बाहेर नाही!
-©ॲड.बी.एस.मोरे, १६.२.२०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा