https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ३१ मे, २०२०

राजकारणापासून अलिप्त!

मी राजकारणापासून अलिप्त!

माझे वडील मुंबईत गिरणी कामगारांच्या मान्यताप्राप्त युनियनचे म्हणजे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे पुढारी होते. त्यांचे व तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे जवळचे संबंध होते. कामगार चळवळ व राजकारण मी जवळून पाहिलेय. राजकारणात निवडणूक हा पैशाचा खेळ झालाय. उभे रहायचे, पैसे खर्च करायचे आणि पडायचे व पुन्हा निवडून येण्यासाठी आणखी प्रयत्न करायचा यासाठी तुमच्याकडे पैसा पाहिजे व लोकांचे पाठबळही पाहिजे. त्यासाठी ही पैसा लागतो. केवळ तुमचा चांगला स्वभाव व चांगले काम हे राजकारणात तुमचे भांडवल होऊ शकत नाही. आता तर काय माझे वय झालेय ६३ वर्षे आणि दगदग सहन होत नाही. वकिली सुध्दा मर्यादित केली आहे. राजकारणापासून अलिप्त झालोय मी!

-ॲड.बी.एस.मोरे©१.६.२०२०

मनाशी मैत्री

मनाशी मैत्री!

ओम् अशी आध्यात्मिक संज्ञा विश्वाला कोणी दिली? दिलीही असेल कोणीतरी साधु संतांनी! म्हणून तेच सत्य मानायचे काय? शेवटी देव कोणी पाहिलाय? ते सत्य आहे की अशीच कोणाच्या तरी डोक्यातून आलेली संकल्पना आहे? कोणीतरी देव मानतो म्हणून आपणही देव मानायचा का? मानणे व असणे यात फरक नाही का? बरं देवाला मानल्यावर त्याची प्रार्थना  अमूक अमूक वेळी व अमूक अमूक पद्धतीनेच केली पाहिजे हे कोणी ठरविले? कोण ओम् सुख शांती परमेश्वरा म्हणेल तर कोण हरी हरी म्हणेल तर कोण आणखी काही! म्हणजे देवाचे अस्तित्व जसे वैज्ञानिक पुराव्याने सिद्ध करता येत नाही तशी देवाची प्रार्थना कशी करावी यावर धर्माचे एकमत नाही. विविध धर्म विविध पद्धतीने देवाला मानतात व भजतात. असे मानणे व भजने हे वैश्विक सत्य नाही हेच यातून सिद्ध होत नाही का? आपल्या डोक्यात एखादी  गोष्ट लहानपणापासून भरवली गेली की मनाला त्या गोष्टीची सवय लागते. नंतर आयुष्यात सत्य काय हे मनाला कळल्यावर सुध्दा मन त्याला न पटणाऱ्या गोष्टी सुध्दा टाकून देऊ शकत नाही. मग त्या न पटणाऱ्या गोष्टी सुध्दा आपल्या मनाला मरेपर्यंत चिकटूनच राहतात. हे फक्त देवाचेच नाही तर कोणत्याही गोष्टीचे असेच आहे. मनाला जेवढा दाबण्याचा प्रयत्न करावा तेवढे ते चेंडूसारखी उसळी घेऊन उलटे वागते. म्हणून मनाशी कठोर वागण्याऐवजी त्याच्याशी गोड मैत्री करण्यातच बुद्धीचा शहाणपणा!

-ॲड.बी.एस.मोरे©१.६.२०२०

वरळी बीडीडी चाळ

का रे दुरावा?

(१) वय वाढते तसे जीवनात बरेच बदल घडत जातात. तुरळक माणसे अविवाहित राहत असली तरी बरीच माणसे विवाह करून संसारात रमतात. त्यांना मुलेबाळे होतात. मग हळूहळू त्यांचे जुन्या मित्रमंडळींकडे जाणे येणे कमी होते आणि राहतात त्या फक्त जुन्या आठवणी!

(२) तुम्ही जेवढे जास्त संवेदनाशील तेवढ्या जुन्या आठवणी तुमच्या मनात पुन्हा पुन्हा येत राहतात. मी वरळीच्या बी.डी.डी. चाळीत राहायचो. त्या चाळीतले प्रेमळ वातावरण मी कदापि विसरू शकत नाही. १०×१२ च्या छोट्या खोल्यांत सर्वांचे संसार थाटलेले. घरे जेवढी चिकटून तेवढी माणसांची मनेही चिकटून!

(३) दिवाळीच्या अगोदर सगळे शेजारी करंज्या, लाडू वगैरे गोड पदार्थ बनवायचे तेंव्हा एकमेकांच्या घरात मदतीला जायचे. बहुतेक शेजारी गिरणी कामगारच असल्याने दिवाळीचा बोनस मिळाला की मग बाजारातून रवा, मैदा साखर, तेल वगैरे कच्च्या मालाच्या खरेदीची लगबग सुरू व्हायची. सर्वांची आर्थिक परिस्थिती जवळजवळ सारखी असल्याने दिवाळीचे पदार्थ बनविताना तूपाऐवजी गोडेतेलाचाच जास्त वापर व्हायचा. पण रेशनवर डालडा अर्थात वनस्पती तूप मिळायचे. त्या डालड्याचाही पदार्थ खुसखुसीत होण्यासाठी वापर व्हायचा. सगळीकडे दिवाळीच्या पदार्थांचा घमघमाट सुटलेला असायचा. एकमेकांचे पदार्थ चाखून अमूक अमूक शेजाऱ्याचा लाडू मस्तच झालाय, अमूक अमूक शेजाऱ्याची करंजी खूपच छान झालीय, अशी कुजबूज कानी यायची. दिवाळी तर सर्वजण मिळूनमिसळून धूमधडाक्यात साजरी करायचे.

(४) दिवाळीचे जाऊ द्या, पण रोजच्या दैनंदिन जीवनात सुध्दा घरात बनविलेल्या अन्नपदार्थांची देवाणघेवाण व्हायची. अमूक अमूक शेजाऱ्याच्या घरी मच्छी तळत असल्याचे लगेच कळायचे कारण त्याचा ठसका शेजारच्यांना जोरात लागायचा. संबंध खूपच जवळचे असतील तर त्या शेजाऱ्याला तो मच्छीचा तुकडा मिळायचा. 

(५) सांगता येण्यासारख्या बऱ्याच सुंदर आठवणी आहेत वरळी बी.डी.डी. चाळीतल्या त्या वास्तव्याच्या. मनातून जाता जात नाहीत त्या आठवणी. आता सगळी मंडळी विखुरलेली आहेत. जवळजवळ सर्वांचेच आईवडील आता हयात नाहीत. जी मंडळी हयात आहेत ती आता मागेपुढे माझ्याच वयाची आहेत. आता वेगवेगळ्या ठिकाणी राहणारी ही मंडळी आपआपल्या संसारात इतकी समरस झाली आहेत की एकमेकांना पुन्हा भेटून जुन्या आठवणींना उजाळा द्यायला कोणाला वेळच नाहीये. 

(६) काहीजण फेसबुक वर माझे मित्र आहेत. पण माझ्या पोस्टस ते वाचतात की नाहीत हे मला माहित नाही. नाही वाचू देत. पण कधीतरी त्यांनी फेसबुकच्या इनबॉक्स मध्ये यावे, जुन्या आठवणी काढीत मस्त गप्पा माराव्यात असे अधूनमधून वाटत राहते. फेसबुक वर असणाऱ्या एका बी.डी.डी. चाळ शेजाऱ्याचा काल वाढदिवस होता. मी व्हॉटसअपवर नाही त्यामुळे त्याला त्याच्या फेसबुक टाईमलाईन वर वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच इनबॉक्स मध्ये "कसा आहेस, मुलेबाळे काय करतात" असा मेसेज टाकलाय.  बघूया काय उत्तर येतंय ते. शेवटी सर्वांनाच या जगाचा कायमचा निरोप घ्यायचाय. जिवंत आहोत तोपर्यंत तरी अधूनमधून बोलूया की! वय झाले म्हणून काय झाले? एवढा दुरावा का?

-आपल्या सर्वांचा तोच संवेदनाशील बाळू

गुरुवार, २८ मे, २०२०

ओम् सुख शांती परमेश्वरा!

ओम् सुख शांती परमेश्वरा!

ही प्रार्थना अंतर्मनाच्या अंतःप्रेरणेतून व अंतःस्फूर्तीतून येत असेल तर म्हणायला काहीच हरकत नसावी. पण ही प्रार्थना सारखी सारखी किंवा पुन्हा पुन्हा म्हणण्याचा मंत्रचळ लावून घेऊ नये.

या प्रार्थनेत ओम् म्हणजे प्रचंड मोठे विश्व असा अर्थ असल्याने अशी प्रार्थना संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची अर्थात संपूर्ण विश्वात सुख शांती  इच्छिणारी अर्थात तेवढी विशाल असेल तरच तिला अर्थ आहे. कारण फक्त स्वतःच्याच सुख शांतीची इच्छा प्रगट करणारी स्वार्थी प्रार्थना विश्वाच्या सर्वोच्च, स्वयंभू, स्वयंपूर्ण निसर्गशक्ती पर्यंत म्हणजे परमेश्वरापर्यंत पोहोचतच नाही.

हा माझा स्वतःचा वैयक्तिक विचार आहे. त्याला कोणत्याही धार्मिक पांडित्याचा आधार नाही. याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी व माझ्याशी निरर्थक वाद टाळावेत ही नम्र विनंती!

-ॲड.बी.एस.मोरे©२९.५.२०२०

मंगळवार, २६ मे, २०२०

निसर्ग माझा गुरू!

निसर्गाला गुरू मानायचे, पण देव मानायचे नाही?

(१) निसर्गाच्या म्हणजे विश्वाच्या निर्मिती मागे देव आहे की नाही, त्या निर्मिती नंतर निसर्गात देवाचे अस्तित्व, वास्तव्य आहे की नाही यावर होत असलेल्या चर्चा बस्स झाल्या व वादही बस्स झाले. काय झाले या चर्चातून, वादातून तर आस्तिक व नास्तिक असे दोन गट तयार झाले. या दोन गटांनी खरं तर बुद्धीचा फालुदा करून टाकलाय. म्हणून मी या वादातच पडत नाही. काही फायदा नाही या वादात पडून. पण मला निसर्गाचे कुतूहल आहे. त्या कुतूहलापोटी मी निसर्गाचे निरीक्षण करतो. त्याचे परीक्षण करण्याएवढा मी मोठा नाही. म्हणून निरीक्षण हाच माझ्या अभ्यासाचा पाया!

(२) या निरीक्षणातून मला कळते की निसर्ग हा स्वयंभू आहे, स्वयंपूर्ण आहे. तो कोणावरही अवलंबून नाही. मग निसर्ग हा जर एवढा मोठा, परिपूर्ण, शक्तीमान आहे तर त्यालाच देव मानले तर काय फरक पडतो? या निसर्गात जन्म घेतल्यावर हा निसर्गच तर आमचा गुरू होतो. तोच तर आम्हाला त्याच्या सान्निध्यात कसे रहायचे हे शिकवितो.

(३) गुरू म्हणून निसर्गाची शिकवण काय तर तुम्हाला मी जगण्यासाठी शारीरिक व बौद्धिक ताकद दिली आहे तिचा हुशारीने वापर करून जगा. तुम्ही माझ्यासारखे स्वयंभू व स्वयंपूर्ण होऊ शकत नसला तरी तुम्हाला माझ्या कडून मिळालेल्या मर्यादित शारीरिक व बौद्धिक शक्तीच्या जोरावर तुम्ही जास्तीतजास्त स्वावलंबी म्हणजे आत्मनिर्भर व्हा. तुम्ही तुमचे स्वत्व जाणा व स्वतःच्या नैसर्गिक अंतःस्फूर्तीने, स्वयंस्फूर्तीने, स्वप्रेरणेने स्वतःचे स्वकर्तुत्व सिद्ध  करीत स्वाभिमानी व्हा!

(४) निसर्गाचे निरीक्षण करताना व निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घेताना निसर्गाकडून मला वरील संदेश मिळतो आणि म्हणून निसर्ग हाच माझा सर्वात मोठा गुरू होतो. या महान गुरू पुढे इतर सर्व महान शास्त्रज्ञ, महापुरूष, संत, महात्मे मला लहान वाटतात. याचे कारण म्हणजे या महान लोकांचे महान कर्तुत्व हे त्यांनी निसर्ग गुरूला जवळ केल्यानेच शक्य झाले आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे.

(५) आता प्रश्न राहिला की, निसर्गाला गुरू मानायचे पण देव मानायचे नाही, असे का? याचे कारण म्हणजे मानवी मन देव संकल्पने विषयी खूप हळवे आहे. या हळवेपणातूनच देवावर विसंबून राहण्याची मानवी मनाला सवय लागते. आणि हे परावलंबीत्व निसर्गाला मान्य नाही. प्रत्येक सजीवाने स्वावलंबी व्हायलाच पाहिजे हा निसर्गाचा आग्रह असतो. उदा. वयानुसार माणसाची दृष्टी कमी होते. अशावेळी निसर्ग माणसाला काय सांगतो तर "बाबारे, दृष्टी  अधू झाली म्हणून माझ्याकडे रडत येऊन मी तूला दिलेल्या बुद्धीचा अपमान करू नकोस, त्याच बुद्धीने डोळ्यांच्या डॉक्टरकडे जा व चष्म्याचा नंबर काढून घेऊन दुकानातून चष्मा विकत घेऊन तो डोळ्यांवर लाव"! हा निसर्ग संदेश माणसाला स्वावलंबनाचे, आत्मनिर्भरतेचे शिक्षण देतो व त्या शिक्षणातून मानवी बुद्धीला शहाणपणा शिकवितो.

(६) क्षणभर अशी कल्पना करा की, निसर्ग जर देव रूपात प्रकट होऊन माणसांपुढे साक्षात उभा राहिला तर काय होईल? माणसाच्या मर्यादित बुद्धीला, इंद्रियांना निसर्गाचे ते महान देव रूप झेपेल काय? माणसेच काय पण निसर्गातील सर्व सजीव सृष्टीच ठप्प होऊन जाईल. याच प्रमुख कारणामुळे निसर्ग कधीही देव रूपात प्रकट होत नाही किंवा प्रकट होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. हे एकदा का मनाला कळले की मग निसर्गाला देव माना नाहीतर मानू नका, काही फरक पडत नाही. पण निसर्गाला गुरू मानून त्याच्याकडून त्याच्या नैसर्गिक सत्याचे अर्थात विज्ञानाचे शिक्षण घेण्यात व त्या वैज्ञानिक शिक्षणातून शहाणपणा शिकण्यात फायदाच आहे हे विसरता कामा नये.

-ॲड.बी.एस.मोरे©२६.५.२०२०

शनिवार, २३ मे, २०२०

आत्मनिर्भर भारत?

आत्मनिर्भर भारत ही घोषणा भावनिक आहे, व्यावहारिक नाही!

एक तरी ॲप आहे का टिकटॉक सारखे भारतात? आणि टिकटॉक वरील लोकांची कला ही किटकिट वाटण्यासारखी गोष्ट आहे का? कला सादर करण्याची मक्तेदारी काय फक्त सेलिब्रिटी लोकांनाच आहे? आणि हे फेसबुक काय किंवा व्हॉटसअप काय ते भारत निर्मित समाज माध्यम आहे काय? ते नसते तर माझ्यासारख्या सर्वसामान्य घरात जन्माला आलेल्या व बडी पोच नसलेल्या लोकांचे  लिखाण कोपऱ्यात धूळ खात पडले असते ना! वकील, डॉक्टर मंडळी फेसबुक लाईव्ह होऊन लोकांना कायदेविषयक व वैद्यकीय मार्गदर्शन करू शकतात ते या परदेशी समाज माध्यमांच्या मुळेच ना! टिकटॉक वर सादर होणाऱ्या गरिबांच्या, सर्वसामान्य माणसांच्या कलेचेही तसेच आहे. ट्वीटर वरील राजकारणी, सेलिब्रिटी लोकांची टिवटिव चालते आणि टिकटॉक वरील सर्वसामान्य माणसांच्या कलेची किटकिट वाटते? आत्मनिर्भर भारत व्हायचेय ना, मग चीनच्याच का भारत सोडून इतर सगळ्याच देशांच्या सगळ्याच गोष्टी फेकून  दिल्या पाहिजेत ना! १४० कोटी भारतीय जनते पैकी किती भारतीय तयार होतील परदेशी अॕप, परदेशी समाज माध्यमे, परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकायला? जरा ही मोहीम उघडून तरी बघा! स्वातंत्र्यपूर्व काळात परकीय ब्रिटिशांबरोबर लढण्यासाठी म्हणून ही स्वदेशी चळवळ ठीक होती, पण आता असे देशप्रेमी करोडोच्या संख्येने पुढे येतील का? आत्मनिर्भर भारत ही घोषणा भावनिक आहे, व्यावहारिक नाही!

-ॲड.बी.एस.मोरे©२३.५.२०२०

बुधवार, २० मे, २०२०

सत्य हाच ईश्वर!

सत्य हाच ईश्वर!

(१) महात्मा गांधी म्हणाले की Truth is God म्हणजे सत्य हाच ईश्वर! त्यांच्या या वाक्यात खूप सखोल अर्थ दडलेला आहे. हिंदू धर्मात सत्यनारायणाची पूजा केली जाते. पण त्या पूजेमागील शास्त्रीय अर्थ समजून घेण्याचा कोणी प्रयत्न केलाय का? तो अर्थ समजून न घेता चमत्कार असलेल्या काही कथा त्या पूजेत घालून लोकांना सत्यापासून अंधश्रध्देकडे नेण्याचा प्रयत्न चुकीचा आहे.

(२) महात्मा गांधी म्हणतात त्याप्रमाणे संपूर्ण विश्व हे सत्याने भरलेले आहे. विश्व म्हणजेच निसर्ग! देवाची करणी आणि नारळात पाणी या म्हणीचा अर्थ हाच की नारळ हे विश्व किंवा निसर्गाचे प्रतीक होय आणि त्यातील पाणी हे  विश्वातील किंवा निसर्गातील सत्य ईश्वराचे प्रतीक होय! थोडक्यात विश्व किंवा निसर्ग हे सत्य ईश्वराचे घर किंवा मंदिर होय! या घराचे किंवा मंदिराचे सत्य हे त्यातील सत्य ईश्वराचेच सत्य होय. संपूर्ण विश्व किंवा निसर्गाचे नैसर्गिक सत्य हे त्यातील सत्य ईश्वराचेच प्रतिबिंब होय!

(३) सत्य निसर्गातील सत्य ईश्वर कसा आहे? तर तो त्या निसर्गाप्रमाणेच आहे. अर्थात आपण आपल्या शरीराला जर निसर्ग मानले तर त्या शरीरातील आपल्या मनाला आपण ईश्वर मानणे यात चूक नाही (तोरा मन दर्पण कहलाये या आशा भोसले यांनी गायलेल्या गाण्यातील मन ही ईश्वर, मन ही देवता हे शब्द आठवा). आपले शरीर व आपले मन या दोन्हीही गोष्टी सत्य आहेत व निसर्गातील सत्य ईश्वराचाच त्या आविष्कार आहेत. निसर्गाचे नैसर्गिक सत्य हे निसर्गातील सत्य ईश्वराप्रमाणे दोन स्वरूपात आहे. हे सत्य सुंदर आहे तसे बीभत्सही आहे, प्रकाशमय आहे तसे अंधारमयही आहे, चांगले आहे तसे वाईटही आहे, स्वच्छ आहे तसे अस्वच्छही आहे, सुखदायक आहे तसे दुःखदायकही आहे. हे सत्य म्हणजे ऊन सावलीचा खेळ! निसर्गात असलेल्या सत्य ईश्वराचे किंवा सत्यनारायणाचे हेच तर खरे रंग, रूप आहे व हेच गुण आहेत.

(४) निसर्गाचे नैसर्गिक सत्य हाच ईश्वर आहे हे एकदा का मनात ठामपणे पक्के केले की मग देवाविषयीच्या अंधश्रध्दा आपोआप दूर होतात. या अर्थाने ईश्वरावर श्रध्दा असणाऱ्या महात्मा गांधी यांचा ईश्वराविषयीचा दृष्टिकोन हा पूर्ण वैज्ञानिक होता हे मान्य करावेच लागेल.

(५) निसर्गातील ईश्वरी सत्य ही मिथ्या कल्पना करायची गोष्ट नाही तर प्रत्यक्षात अनुभवायची गोष्ट आहे. निसर्गातील नैसर्गिक सत्याचा खरा अनुभव हीच निसर्गातील सत्य ईश्वराची प्रत्यक्ष अनुभूती होय! निसर्गात सतत सत्यकर्म करीत रहायचे व त्या सत्यकर्माचा सत्य अनुभव घेत रहायचा हेच तर त्या सत्य ईश्वराने नेमून दिलेले ईश्वरी कार्य होय!

-ॲड.बी.एस.मोरे©२०.५.२०२०

मंगळवार, १९ मे, २०२०

कोरोनाची भीती?

कोरोनाची भीती, खरे काय आणि खोटे काय?

कोरोनावर लस नाही, औषध नाही तर मग कोरोनाचे रोगी बरे कसे होतात? अहो, ज्यांचा कोरोना प्राथमिक अवस्थेत आहे व ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत आहे ते सर्दी, खोकला, तापाच्या जनरल ट्रीटमेंटने बरे होतात आणि कोरोनावर स्पेसिफिक ट्रीटमेंट नसल्याने बाकीचे मरतात हे जनतेला नीट समजावून कधी सांगणार? सूर्यप्रकाशात असलेल्या  ड जीवनसत्वामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पण सक्तीच्या लॉकडाऊन मुळे सूर्यप्रकाश दुर्मिळ झालाय त्याचे काय? लॉकडाऊन हा कोरोनावर उपाय आहे काय? रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असलेली कोरोनाग्रस्त व्यक्ती या रोगाच्या लक्षणाशिवाय मस्त राहते, पण ती समाजात कोरोना वाहक म्हणून फिरते हे विचित्र वाटत नाही काय? मग सगळ्यांनाच क्वारंटाईन करून टाकायचे काय? आम्ही वैद्यकीय तज्ञ नसलो तरी आम्हाला यातील काहीच कळत नाही असे कृपया गृहीत धरू नका! मुंबई, पुण्यातील एखाद्या कोपऱ्यात कोरोनाग्रस्त वाढत असतील तर मग तो तेवढा कोपराच रेड झोन म्हणून सील करून त्या कोपऱ्याचीच विशेष वैद्यकीय काळजी घेत राहिल्यावर सगळी मुंबई व सगळे पुणे शहर कोरोनामय झालेय असा चुकीचा संदेश गावी जाणार नाही ना? मुंबई, पुण्यातील मोठा प्रदेश कोरोनापासून सुरक्षित असेल तर तसे जाहीर का होत नाही? रोज नवीन आकडेवारी जाहीर होतेय व सरसकट प्रचंड मोठी भीती निर्माण होतेय या कोरोनाविषयीच्या नकारात्मक बातम्यांनी त्याचे काय करायचे? खरं तर, कोरोनाची भीती ही त्याच्या प्रत्यक्ष धोक्यापेक्षा त्याच्या विषयीच्या अज्ञानातच जास्त आहे, हे खरे नाही काय? कधी तळपणार ज्ञानाचा सूर्य आणि कधी होणार अज्ञानाच्या अंधाराचा नायनाट?

-ॲड.बी.एस.मोरे©१९.५.२०२०

सोमवार, १८ मे, २०२०

ओम् सुख शांती!

ओम् सुख शांती!

(१) निसर्ग व देव यांना मला मरेपर्यंत सोडता येणार नाही. नास्तिक निसर्गाला जवळ करतात पण देवाला दूर करतात. त्यामागे त्यांची एक विशेष बौद्धिक धारणा आहे. पण मी निसर्ग व देव या दोघांनाही चिकटून आहे व त्यामागे माझीही एक विशेष बौद्धिक धारणा आहे. निसर्गाच्या पाठीमागे व निसर्गात भले भौतिक स्वरूपात का असेना पण कोणती तरी प्रचंड मोठी देव शक्ती असल्याशिवाय निसर्गाचा पसारा वाढू शकत नाही व त्या पसाऱ्याचा गाडा चालू शकत नाही, अर्थात आईबापाशिवाय मुले होऊ शकत नाहीत व मुलांचा नीट सांभाळ होऊ  शकत नाही, ही माझी आस्तिक होण्यामागील सरळ साधी मूळ बौध्दिक धारणा!

(२) माझ्यासाठी निसर्ग म्हणजे संपूर्ण विश्व जे पदार्थमय आहे व शक्तीमय आहे. या निसर्गाचे रंग, रूप, गुण त्यातील असंख्य सजीव, निर्जीव पदार्थांच्या विविधतेमुळे वेगवेगळे आहेत. पण तरीही या निसर्गाचे (म्हणजे विश्वाचे) वैश्विक वागणे सगळीकडे म्हणजे सगळ्या विश्वात सारखेच आहे हे विशेष! पृथ्वीवरील संपूर्ण सजीव, निर्जीव सृष्टी हे पृथ्वीवरील संपूर्ण विश्व असा मर्यादित अर्थ घ्यायला हवा. कारण ग्रह, तारे युक्त अंतराळ विश्व हे प्रचंड मोठे आहे व त्यात पृथ्वीच काय पण तिच्यासोबत असलेली सूर्यमाला हा सुध्दा अंतराळ विश्वातला एक छोटासा कण आहे. त्यामुळे आपण आपल्या पृथ्वीवरील विश्वाविषयीच जास्त बोलू शकतो. 

(३) निसर्गाचे वागणे हे त्याच्या विविधतेसह जगात सगळीकडे म्हणजे पृथ्वीवर असलेल्या  वेगवेगळ्या प्रदेशात सारखेच आहे हे सद्याच्या कोरोना विषाणूने (कोविड-१९) सिद्ध केले आहे. विविधतेत असलेला निसर्गाचा हा वैश्विक  सारखेपणा हेच सिद्ध करतो की निसर्ग हा सगळीकडे एकच आहे. सगळीकडे एकच असलेल्या निसर्गाची निर्मिती ही आपोआप झालीय की ती कोणत्या तरी दैवी शक्तीने (देवशक्तीने) केलीय हे समजायला मार्ग नाही. ही निर्मिती देवशक्तीने केली असावी असा एक बौद्धिक तर्क आहे. पण विश्वाची निर्मिती ही आपोआप झालेल्या महास्फोटाने झाली असाही काही वैज्ञानिकांचा तर्क आहे. मी तो तर्कच म्हणतो कारण त्या वैज्ञानिकांकडे बिग बँग नावाची एक थिअरी आहे जी थिअरी ठोस शास्त्रीय पुराव्याने सिद्ध झालेली नाही. नास्तिक लोक ती सिद्ध न झालेली थिअरी स्वीकारतील पण देवशक्तीचा तार्किक सिद्धांत स्वीकारणार नाहीत. मी मात्र तसा महास्फोट झालाच असेल तर त्यामागेही देवशक्तीच असली पाहिजे या मताशी ठाम आहे.

(४) माझ्या मनात येणारा दुसरा तार्किक विचार असाही आहे की निसर्गाची निर्मितीच झाली नाही. निसर्ग पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. त्याला सुरूवात नाही की अंत नाही. हा निसर्ग त्याच्या प्रचंड मोठ्या विश्वात त्याला हवा तिथे व त्याला हवा तसा त्याच्या मर्जीप्रमाणे उत्क्रांत होतो जसा तो पृथ्वीवर उत्क्रांत झाला. डार्विन या शास्त्रज्ञाने पृथ्वीवर सजीव सृष्टीची उत्क्रांती "बळी तो कानपिळी" या नियमानुसार कशी झाली हे काही वैज्ञानिक पुराव्यांसह पटवून सांगितले आहे. पण मी तर म्हणेल की पृथ्वीवर निसर्ग हा त्याच्या मर्जीनुसार उत्क्रांत झाला व या उत्क्रांती मागेही निसर्गातील गूढ शक्ती आहे. या निसर्गाचे एकंदरीत वागणेच एक गूढ आहे. मग पुन्हा मनात एक तार्किक प्रश्न असा निर्माण होतो की गूढत्वाने भारलेल्या या निसर्गालाच देव मानावे की निसर्गाहून वेगळी अशी कोणती तरी गूढ दैवी शक्ती (देवशक्ती) या निसर्गातच वास्तव्य करून आहे असे मानून त्या सर्वश्रेष्ठ शक्तीलाच देव मानावे? या तार्किक प्रश्नांची उत्तरे वैज्ञानिक पुराव्यांनी मिळणे हे खूप कठीण आहे. याचे कारण म्हणजे माणूस नावाचा स्वतःला अती बुद्धीमान समजणारा प्राणी हा निसर्गापुढे अत्यंत क्षुल्लक आहे.

(५) मी मात्र माझ्या सरळसाध्या बुद्धीने या प्रश्नांची उत्तरे शोधली आहेत जी भली लोकांना वरवरची उत्तरे वाटतील. माझ्या बुद्धीला एकच कळते आणि ते म्हणजे निसर्ग काय किंवा त्या निसर्गातला देव काय या दोन्ही गोष्टी एकमेकांत इतक्या मिसळलेल्या आहेत की त्या अलग करताच येणार नाहीत. जसे मनुष्याचे शरीर व मन या दोन गोष्टी एकमेकांपासून अलग करता येणार नाहीत. म्हणून माझ्यासाठी निसर्ग व देव या दोन्ही गोष्टी जशा एक आहेत त्याप्रमाणे  निसर्गाचे भौतिक विज्ञान व देवाचा आध्यात्मिक धर्म या दोन्ही गोष्टीही एकच आहेत. एकच याचा अर्थ असा की या दोन्ही गोष्टी त्यांच्या विविधतेसह एकमेकांत योग्य प्रमाणात अशा मिसळून गेल्या आहेत की त्यातून एकच  एकसंध अशी गोष्ट अस्तित्वात आली आहे किंवा पूर्वीपासूनच ती तशीच एकसंध आहे. ती एकसंध गोष्ट म्हणजे निसर्गासह देव आणि विज्ञानासह धर्म!

(६) मी अशाप्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोन जवळ बाळगूनच आस्तिक आहे. अर्थात देवाविषयीची माझी आस्तिकता ही पूर्णतः नैसर्गिक आहे. त्यात अंधश्रध्दा बिलकुल नाही. मी निसर्गातील देवापुढे "ओम् सुख शांती" असे पुटपुटतो त्यामागे मोठा अर्थ आहे. ओम् मध्ये संपूर्ण निसर्ग त्यातील देवासह सामावलेला आहे अशी मी तार्किक कल्पना करतो (ज्याची नास्तिक लोक मिथ्य किंवा असत्य कल्पना अशी संभावना करतील) व मग त्या ओम् पुढे सुख, शांती या दोनच गोष्टींची संक्षिप्त प्रार्थना करतो. कारण माझ्या मते या दोन गोष्टी मिळाल्या की सर्व गोष्टी मिळाल्या (या प्रार्थनेचीही नास्तिक लोक अंधश्रध्दा अशी संभावना करतील). ओम् मध्ये मी संपूर्ण जग व जगाचा म्हणजेच निसर्गाचा ईश्वर पाहतो आणि म्हणून त्या ओम् पुढील माझी "सुख, शांती" ही प्रार्थना फक्त स्वतःसाठी नसते तर संपूर्ण जगासाठी असते. जगात मीही आलो म्हणजे परमार्थात स्वार्थाचे समाधान हे सुध्दा आपोआप आले. माझी ही आस्तिकता माझ्यासाठी तरी पूर्ण नैसर्गिक असल्याने नास्तिक काय किंवा इतर लोक काय म्हणतात याची मी पर्वा करीत नाही.

ओम् सुख शांती!

-ॲड.बी.एस.मोरे©१८.५.२०२०

शनिवार, १६ मे, २०२०

निसर्गातील देवाला माणसाकडून काय हवंय?

निसर्गातील देवाला माणसाकडून काय हवंय?

निसर्गाचा निर्माता असलेला देव जर निसर्गातच अदृश्य स्वरूपात लपून राहून निसर्गाची भौतिक  हालचाल करीत असेल व या हालचालीतून मनुष्यापुढे अनेक भौतिक आव्हाने निर्माण करीत असेल तर मग त्या देवाला माणसाने आध्यात्मिक प्रतिक्रिया द्यावी की भौतिक? देव निसर्गातून भौतिक प्रश्न निर्माण करीत असताना मनुष्याने त्या प्रश्नांत आध्यात्मिक उत्तरे शोधत बसणे कितपत बरोबर? देवाने निर्माण केलेली निसर्गातील भौतिकता लक्षात न घेता देवाला आध्यात्मिक दृष्टीने बघत त्याला आध्यात्मिक नमस्कार करणे, त्याची आध्यात्मिक प्रार्थना करणे व त्यातून त्याच्याकडून एका बाजूने भौतिक सुख व दुसऱ्या बाजूने आध्यात्मिक शांतीची अपेक्षा करीत राहणे हे किती बरोबर? खरं तर हे आध्यात्मिकतेचे खूळ डोक्यातून काढून टाकून मनुष्याने भौतिक निसर्गातील भौतिक देवाची भौतिक आव्हाने भौतिक भावनेने व भौतिक बुद्धीने स्वीकारून भौतिक प्रश्नांवर भौतिक उत्तरे शोधली पाहिजेत. देवाची नैसर्गिकता ही भौतिकता होय हे ओळखायला हवे. निसर्गातील भौतिक देवाला माणसाकडून काय हवंय, भौतिकता की आध्यात्मिकता की दोन्हीही? पण आध्यात्मिकता म्हणजे काय तर देवापुढे शरणागती! देवाला माणसाकडून अशी आध्यात्मिक शरणागती हवीय की भौतिक हुशारी? याचा छडा निसर्गातील घडामोडींचे नीट निरीक्षण व परीक्षण करून माणसाने लावलाच पाहिजे. माणसाने त्याची मानसिकता बदलण्याचा आटापिटा करण्यापेक्षा त्याची मानसिकता व्यावहारिक बनवायला हवी. निसर्गातील देवाचा व्यवहारच जर भौतिक असेल तर मग त्या व्यवहाराला माणसाने भौतिक प्रतिक्रिया देण्यातच त्याचा व्यावहारिक शहाणपणा होय! स्वतःच्या आध्यात्मिक भावनेला व्यावहारिक वळण द्यायला मनुष्याने शिकले पाहिजे. व्यावहारिक वळण म्हणजे भौतिक वळण! भौतिक व्यवहाराचे महत्व हे भौतिक फायद्यात असते. लोकांना हा फायदा कळला की त्यांची मानसिकता बदलते. भौतिक कायद्याचे बोल हे भौतिक फायद्याचे बोल असतात. निसर्गातील देवाला माणसाकडून हा व्यावहारिक शहाणपणा हवाय का?

-ॲड.बी.एस.मोरे©१७.५.२०२०

शुक्रवार, १५ मे, २०२०

लॉकडाऊन?

लॉकडाऊन हा कोरोनावरील उपाय नव्हे!

कोरोनापासून काळजी घेणे म्हणजे स्वतःला घरात कोंडून घेणे असेच का? असे किती दिवस चालणार? एडस रोगाच्या एच.आय.व्ही विषाणू वर लस अजून सापडली नाही. तो विषाणू अंगाला चिकटू नये म्हणून काळजी घ्यायची असते. पण जग घरी बसलेय का त्या विषाणूला घाबरून? अगदी तसेच कोरोना विषाणूच्या बाबतीत करावे लागणार. मुखपट्टी लावून शारीरिक अंतर ठेवीत लोकांना आता कामासाठी घराबाहेर पडावेच लागणार. किती दिवस घरात बसून राहणार? कोरोनावर लवकर लस निघण्याची किंवा लवकर जालीम औषध निघण्याची कोणीच खात्री देऊ शकत नाही. लॉकडाऊन हा कोरोनावरील उपाय नव्हे हे सर्वांनी नीट समजून घेतले पाहिजे.

-ॲड.बी.एस.मोरे©१६.५.२०२०

गुरुवार, १४ मे, २०२०

Myth of God's spiritualism

MYTH OF GOD'S SPIRITUALISM!

The things of world can get straight natural to human mind if it changes its outlook towards God. Let mind see God with material outlook and not with spiritual outlook. Let God believing mind assume that God created material Nature and started living within it by making Nature as God's home. The next logic would then follow that if God's home viz. Nature is material, how can God live as spiritual entity within Nature as God's home? The two logics follow viz. God behind Nature as creator of material Nature and God within or in Nature as material resident and material controller of Nature. By this logic, God cannot be called as Nature or Nature cannot be called as God. The Nature is just a material world by, of and for God. God's motion in or within Nature is material. Such material motion is God's material conduct. God is thus materially natural and not spiritually divine within Nature. The humanity or human morality is also materially natural and should not be confused with God's spiritualism or divinity. Even cruelty found within Nature is materially natural and constant war between good and bad, right and wrong is also materially natural motion of God. The human concept of law and flaw or dharma and adharma is thus materially natural. There is nothing spiritual about it. We, the human beings, are all small parts of material Nature along with other material parts, living and non -living. Let us look at God as material entity in or within material Nature and then follow such God materially and not spiritually. Let us come out of myth of God's divinity or spiritualism.

-Adv.B.S.More©14.5.2020

बुधवार, १३ मे, २०२०

राजधर्म व नीतीधर्म

राजधर्म व नीतीधर्म!

नीती म्हणजे धोरण! धोरण दिशादर्शक असते. ते ध्येयप्राप्तीचा मार्ग दाखवते. धर्म काय किंवा कायदा काय तो नीतीधर्म असतो. ध्येयाच्या दिशेने न्याय बुद्धीने पुढे जाण्याचा तो मार्ग असतो. उदाहरणार्थ, राज सिंहासन प्राप्त करणे  अर्थात राजा होणे (लोकशाहीत देशाचा प्रमुख म्हणजे पंतप्रधान हा देशाचा लोकनियुक्त राजा असतो, निदान त्याचे स्थान राजाएवढे उच्च मानले जाते) हे जर एखाद्या राजकीय नेत्याचे ध्येय असेल तर त्यासाठी त्याला कायद्याचा नीतीधर्म (उदाहरणार्थ, निवडणूक कायदा) हा पाळावाच लागतो. राजेपद मिळविल्यानंतर राजाला राजधर्म पाळावा लागतो. राजधर्म व नीतीधर्म यात खरं तर फरक असताच कामा नये. कायद्याच्या राज्यात राजाला कायद्याच्या चौकटीत राहून अर्थात न्याय बुद्धीवर आधारित नीतीधर्मानुसारच राज्य कारभार करणे हे बंधनकारक असते. अर्थात धर्मनीती हीच राजनीती असली पाहिजे. पण असे होताना सहसा दिसत नाही. कारण राजकारणात राज सिंहासन मिळविणे ही महत्वाकांक्षा असते व तिच्यासाठी काही राजकारणी मंडळीकडून नीतीधर्माला म्हणजे कायद्याला गुंडाळून ठेवले जाते. पूर्वीचे राजे काय किंवा हल्लीचे राजकीय नेते काय, यांची वैयक्तिक महत्वाकांक्षा, स्वार्थ, असूया इत्यादी वैयक्तिक गोष्टी जनतेला नाहक सार्वजनिक युद्धाच्या खाईत लोटतात. अशा युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी जनतेला धर्मयुद्धाचे तत्त्वज्ञान शिकविले जाते. शेवटी महाभारत कथेतून तरी आपल्याला काय संदेश मिळतो? हस्तिनापूर राज्यासाठी कौरव व पांडवांत जे महायुद्ध झाले त्याला अधर्म विरूद्ध धर्म असा रंग दिला गेला असला तरी यात हस्तिनापूरच्या जनतेचे हित किती होते? दोन्हीही बाजूंनी हस्तिनापूरच्या राज सिंहासनाचा वैयक्तिक हक्कच पुढे केला गेला. बरं मग ज्या वैयक्तिक हक्कासाठी अधर्म विरूद्ध धर्म असे हे युद्ध झाले त्या युद्धात तरी धर्माचे पालन दोन्ही बाजूंनी केले गेले का, हा अभ्यासाचा विषय आहे. कौरवांनी मागे अधर्म केला होता मग पांडवांनी आता युद्धात थोडा अधर्म केला तर बिघडते कुठे असा युक्तिवाद श्रीकृष्णाने करणे म्हणजे सोयीनुसार धर्माने बदलने नव्हे काय? पण एकदा का श्रीकृष्णाला देव मानले की मग असे धार्मिक प्रश्न गौण ठरतात. म्हणून राजधर्म हा बऱ्याच वेळा नीतीधर्म रहात नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©१३.५.२०२०

विचलित मन

विचलित मन!

एखाद्या गोष्टीचे विशेष ज्ञान संपादन केल्यावर त्या गोष्टीत विशेष सराव करून तिच्यात विशेष प्रावीण्य मिळवून तज्ज्ञ होण्याची संधी मिळाली नाही की मग अशा व्यक्तीचे मन सर्वसाधारण गोष्टींकडे भरकटते. अशा व्यक्तीचे मन कुठेच स्थिर होत नाही. कशावरच लक्ष केंद्रित करता न आल्याने अशा व्यक्तीचे मन विचलित होऊन जगते.

-ॲड.बी.एस.मोरे©१३.५.२०२०

रविवार, १० मे, २०२०

आध्यात्मिक देव व भौतिक निसर्ग?

भौतिक निसर्ग हाच आध्यात्मिक देव की भौतिक निसर्गाच्या मागे आध्यात्मिक देव?

(१) देव ही संकल्पना माणसाचा पिच्छा सोडत नाही, मग माणूस आस्तिक असो की नास्तिक! आस्तिक माणूस देवाला मानतोच पण नास्तिक माणूस सुध्दा जगात देव नाहीच हे आग्रहाने पटवून देण्यासाठी तार्किक युक्तिवाद करीत  राहतो. म्हणजे नास्तिक माणूस सुध्दा देवाच्या अस्तित्वाला नाकारत अप्रत्यक्षपणे देवाला चिकटतोच. खरं म्हणजे, आस्तिक माणसाकडे देवाला स्वीकारण्यासाठी जसा ठोस पुरावा नसतो तसा नास्तिक माणसाकडेही देवाला नाकारण्यासाठी ठोस पुरावा हा नसतोच! दोघांकडेही असतो तो फक्त तर्क आणि तर्क!

(२) नास्तिकाच्या तर्काचा विचार नास्तिकाकडे सोपवून देऊन आस्तिकाच्या तर्काचा विचार करायचा तर मग देव ही संकल्पना नीट समजून घेतली पाहिजे. देवाला मानायचे तर मग ते कसे मानायचे हा प्रश्न इथे महत्त्वाचा आहे. देव तर दिसत नाही, मग दिसणाऱ्या निसर्गालाच देव मानायचे का? पण शेवटी निसर्ग म्हणजे तरी काय? अंतराळ विश्व व उत्क्रांत, विकसित  झालेली पृथ्वीवरील सृष्टी मिळूनच निसर्ग होतो ना! या निसर्गात सूर्य, चंद्र, पृथ्वी, वनस्पती, पक्षी, प्राणी, माणसे या गोष्टीही येतात. मग निसर्गाला देव मानायचे तर या गोष्टींच्याच पाया पडावे लागेल. मग माणसांनाही देव मानून त्यांच्याही पाया पडावे लागेल! हे मनाला पटत नाही. म्हणून मग तार्किक विचार करणारे मन निसर्गाला देव मानणे टाळते. थोडक्यात, निसर्ग म्हणजे तरी काय तर भौतिक जग व निसर्गाचे विज्ञान म्हणजे तरी काय तर निसर्गाचे भौतिक सत्य!

(३) पुढचा प्रश्न हा उपस्थित होतो की, निसर्ग हा जर देव नाही तर मग देव कोण आहे? मग मानवी मन असा तर्क करते की, देव हा निसर्गापेक्षाही मोठा आहे व तो निसर्गाहून वेगळा आहे. तो निसर्गाच्या पाठीमागे अदृश्य स्वरूपात उभा आहे. तो सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तीमान आहे. तोच निसर्गाचा निर्माता, विधाता व नियंता आहे. विधाता म्हणजे विधीनियम, कायदा करणारा निसर्गाचा राजा व नियंता म्हणजे कायद्यानुसार निसर्ग नियमन, नियंत्रण करणारा निसर्गाचा न्यायाधीश. सर्वश्रेष्ठ देव अशाप्रकारे निर्माता, राजा व न्यायाधीश या तीनही भूमिका पार पाडतो हे एकदा का मनाने तर्काने कल्पले की मग मन देवश्रध्द होते. असे देवश्रध्द मन निसर्गातील आव्हानांना नीट व पूर्णपणे तोंड देता येत नाही म्हणून त्या अदृश्य पण सर्वश्रेष्ठ देवाला आध्यात्मिक भावनेने शरण जाते व त्याला भक्तीने प्रसन्न करण्याचा धार्मिक प्रयत्न करते. त्यासाठी देवाच्या भक्तीची उपवास, प्रार्थना यासारखी धार्मिक कर्मकांडे करते.

(४) शरण जायचे म्हणजे तरी काय करायचे असते? ज्यावेळी आपले शरीर व आपली बुद्धी  निसर्गाचे आव्हान पेलण्यात नुसती अशक्तच नव्हे तर पूर्णपणे हतबल ठरते तेंव्हा असहाय्य होऊन निसर्गाचे भौतिक आव्हान हलके करून देणाऱ्या कोणापुढे तरी शरणागत होऊन याचक व्हायचे. या संकटातून सोडव बाबा म्हणून त्या कोणा तरी सर्वशक्तीमानाची प्रार्थना करायची. देवाशिवाय असा या जगात कोण आहे की जो सर्वशक्तीमान आहे? म्हणून मग देवालाच शरण जायचे.

(५) अशाप्रकारे अदृश्य देवापुढे आध्यात्मिक भावनेने किंवा श्रध्देनेच शरण जाता येते. तिथे स्वतःच्या शरीराचा माज व स्वतःच्या बुद्धीचा शहाणपणा बाजूला काढून ठेवावा लागतो. तिथे असते ती भावना आणि फक्त भावनाच व तीही आध्यात्मिक! आध्यात्मिक भावना व वैज्ञानिक भावना यात फरक असतो. वैज्ञानिक म्हणजे सत्य! आता जर अदृश्य देव (ईश्वर) हाच सत्य स्वरूपात पुराव्यासह सिद्ध करता येत नाही तर मग आध्यात्मिक भावनेचा व सत्याचा संबंध कसा जोडायचा? बरं, देवाचा पुरावा मागायचा तर आध्यात्मिक भावनेपुढे बुद्धीला वावच नाही. मग देवाच्या सत्याचा शोध कसा घेणार?अशाप्रकारे देव हा नेहमीच अज्ञात, अदृश्य व आध्यात्मिक पातळीवरच राहतो. देवापुढे बुद्धीचे काय काम? तिथे फक्त आणि फक्त आध्यात्मिक भावना किंवा श्रध्दा! मग देवाची चिकित्सा कशी करायची? नव्हे ती करायचीच नसते आणि इथेच श्रध्दाळू आस्तिक विरूद्ध केवळ बुद्धीलाच प्रमाण मानणारा नास्तिक यांच्यात वाद होतो.

(६) निसर्ग प्रत्यक्ष स्वरूपात बघता येतो, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. अर्थात निसर्गाचे भौतिक सत्य हे पुराव्यासह सिद्ध करता येते. म्हणून निसर्गाकडे वैज्ञानिक भावनेने बघायचे व  त्याला वैज्ञानिक बुद्धीने अंगावर घ्यायचे! एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, वैज्ञानिक व आध्यात्मिक या दोन शब्दांतील अर्थात खूप फरक आहे. जिथे निसर्गाची भौतिकता आहे तिथे निसर्गाचे भौतिक सत्य म्हणजे भौतिक विज्ञान आहे व जिथे देवाची आध्यात्मिकता किंवा भावनिक श्रध्दा आहे तिथे देवाचे सर्वश्रेष्ठ  आध्यात्मिक अधिष्ठान आहे. ही आध्यात्मिक भावना माणसाला निसर्गापलिकडील देवाचा आधार घेत त्याच्यापुढे नतमस्तक व्हायला, त्याला शरण जायला प्रेरित करते.

(७) प्रश्न हा आहे की, निसर्गात रहायचे तर मग निसर्गाचे भौतिक सत्य टाळून फक्त देवावर विसंबून चालेल का? जर निसर्गाची निर्मिती हीच मुळी देवाने केली असे गृहीत धरायचे तर मग निसर्गाबरोबर निसर्गाचे भौतिक सत्यही आहे त्या स्वरूपात स्वीकारायलाच हवे ना! हे सत्य डोईजड होत असेल तर मग त्याचा भार हलका करण्यासाठी त्या महान देवाची फक्त  आध्यात्मिक प्रार्थना करीत बसून चालेल का? माणूस तेवढेच करीत बसला असता तर त्याला विज्ञानाचे म्हणजे निसर्गाच्या भौतिक सत्याचे शोध लावता आले असते का व त्या सत्यावर आधारित त्याला तंत्रज्ञानातील प्रगती करता आली असती का?

(८) म्हणून आस्तिक माणसाला सुद्धा देवावर आध्यात्मिक श्रध्दा ठेवत निसर्ग व निसर्गाच्या भौतिक सत्याला वैज्ञानिक भावनेने व वैज्ञानिक बुद्धीने सोयीस्करपणे अंगावर घ्यावेच लागते! अर्थात निसर्गाच्या सान्निध्यात भौतिक निवास करताना मनुष्याला आध्यात्मिक भावनेऐवजी वैज्ञानिक भावना (सत्य दृष्टिकोन) व वैज्ञानिक बुद्धी (सत्याला प्रमाण मानणारी बुद्धी ज्यात विवेकबुद्धीचाही समावेश असतो) या दोन्हींचा आश्रय घ्यावा लागतो. अशावेळी आध्यात्मिक भावनेने भौतिक निसर्गामागील आध्यात्मिक देवाची प्रार्थना करताना आस्तिक माणसाने त्याच्या देवश्रध्देला मिथ्या गोष्टी चिकटवून अंधश्रध्द होणे हे चुकीचे होय!

-ॲड.बी.एस.मोरे©१०.५.२०२०


शुक्रवार, ८ मे, २०२०

Instincts versus Emotions and Intelligence!

मानवी जीवनाचे निसर्ग विज्ञान!

(१) सजीवांची नैसर्गिक उत्क्रांती होत असताना मानवी जीवन हे इतर सजीवांपासून उच्च जैविक कसे झाले याचा लाखो वर्षांपासूनचा इतिहास थक्क करून सोडणारा आहे. या उत्क्रांतीत मानवी मेंदू अधिकाधिक विकसित झाला व या विकसित मानवी मेंदूनेच मानवी जीवन उच्च जैविक पातळीवर आणून सोडले.

(२) उच्च जैविक पातळी म्हणजे मानवी मनाची  मूलभूत जैविक वासनांपासून उंचावलेली उच्च भावनिक पातळी! या उच्च पातळीवर मानवी जीवनाच्या निसर्ग विज्ञानाचा अभ्यास वासना व भावना या दोन नैसर्गिक प्रेरणांत विभागून केला तर सोपा होतो. वासना म्हणजे भूक, लैंगिकता, झोप यासारख्या मूलभूत जैविक वासना. मानव सोडून इतर प्राणीमात्रांच्या मनाची पातळी ही या जैविक वासनेच्या पातळीवरच स्थिर असते. पण मनुष्याला या मूलभूत जैविक वासनांच्या बरोबर भावनाही असतात.

(३) मानवी भावनांची विभागणी दोन पातळीत करता येते. एक असते ती कनिष्ठ भावनिक पातळी जी फक्त मूलभूत जैविक वासनांनीच बरबटलेली असते. कनिष्ठ भावनिक पातळीवर मनुष्य व जनावर यात फार मोठा फरक राहत नाही. दुसरी असते ती श्रेष्ठ भावनिक पातळी जी मनुष्याला वासनेच्या कनिष्ठ पातळीवरून वर उंचावून प्रेम, करूणा, परोपकार, समाजहित, विश्वहित या परमार्थी भावनांकडे ओढून नेते. कनिष्ठ पातळीवरील भावनांना वाईट भावना व उच्च पातळीवरील भावनांना चांगल्या भावना अशी सर्वसाधारण मानवी भावनांची वर्गवारी करता येईल.

(४) वासना व भावना यांच्यासोबत मानवी मेंदूत बुद्धीचाही निवास असतो. वासना व वाईट भावना यात फारसा फरक न करता वाईट भावना व चांगल्या भावना यात फरक करणे मानवी बुद्धीला सोपे पडते. वासनेने पूर्णपणे  बरबटलेल्या वाईट भावना व प्रेम, करूणा, परोपकार, समाजहित, विश्वहित यांची ओढ असलेल्या चांगल्या भावना या दोन्ही भावनांचा संतुलित, विवेकी विचार करून त्यांच्यावर विवेकी विचाराचे स्थिर नियंत्रण मिळविणारी बुद्धी हीच मनुष्याची श्रेष्ठ बुद्धी होय. वाईट भावनांच्या आहारी जाऊन भ्रष्ट होणारी बुद्धी ही नीच बुद्धी होय. तसेच दोन्ही भावनांच्या मध्ये चाचपडणारी व ठाम विवेकी निर्णय घेऊ न शकणारी बुद्धी ही अस्थिर बुद्धी होय.

(५) मानवी बुद्धीचा विचार करता ईश्वर व धर्म या संकल्पनांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. या संकल्पनांविषयी मानवी बुद्धी बऱ्याच वेळा  गोंधळून जाते. निसर्गात ईश्वर (देव) बघायचा की नाही अर्थात आस्तिक व्हायचे की नास्तिक व्हायचे, हा देव विरूद्ध निसर्ग वाद हा मानवी बुद्धीच्या दृष्टिकोनातील गोंधळाचा भाग झाला. तर ईश्वरवादी किंवा आस्तिक होत आध्यात्मिक विचारांचा म्हणजे ईश्वराला स्मरून चांगल्या भावनिकतेचा "ईश्वर धर्म" स्वीकारायचा की निरीश्वरवादी किंवा नास्तिक होऊन ईश्वराला सोडून देऊन फक्त मानवी बुद्धीशीच प्रामाणिक असलेल्या विवेकी विचारांचा म्हणजे चांगल्या पण निरीश्वरी भावनिकतेचा "मानव धम्म" स्वीकारायचा, हा धर्म विरूद्ध धम्म वाद हा मानवी बुद्धीच्या वैचारिक किंवा तात्त्विक गोंधळाचा भाग झाला. अशी गोंधळलेली बुद्धी स्थिर होऊ शकत नाही. यावर तोडगा हाच की, जोपर्यंत दुसऱ्यांचे युक्तिवाद तुमच्या बुद्धीला पटत नाहीत तोपर्यंत तुम्ही तुमच्या विचाराशी ठाम राहिले पाहिजे!

-ॲड.बी.एस.मोरे©८.५.२०२०

गुरुवार, ७ मे, २०२०

Right to Family

RIGHT TO FAMILY IS BASIC HUMAN RIGHT!

(1) Man is social animal by nature! But the sensitiveness of his social nature differs. He is very sensitive meaning very personal in relation to his own family (he includes she). But he is not that much sensitive in relation to other people and their families, meaning in relation to the community as a  whole.

(2) This is the difference between micro social sensitivity at own family unit level and macro social sensitivity at community level. Man remains socially narrow minded in relation to his family and socially broad minded in relation to whole community.

(3) It is likely that some people may choose to remain unmarried or single. Such people may be away from family sensitivity, but they may satisfy their social tendency by developing social companionship, social friendship etc. Their social sensitivity normally remains broad and not narrow.

(4) The social government while making and enforcing social laws should take into account the natural phenomenon of man being social animal but generally being very sensitive in relation to his own family. The right to family is man's basic human right!

-Adv.B.S.More©7.5.2020


बुधवार, ६ मे, २०२०

Respect Judges

RESPECT JUDGES!

Let people know law both in letter and spirit before criticizing judges and their judgments. If ignorance of law is no excuse, how can judgment in law be excuse? But judges should allow fair criticism coming from common sense of common man with due respect to judges judicial chair even if such common man does not have that special sense (I mean letter and spirit sense) in law!

-Adv.B.S.More©6.5.2020

अज्ञानी झुंड

अज्ञानी झुंडीपासून सावधान!

अज्ञानातून भय निर्माण होते व भयातून हिंसा, म्हणून तर बिनविषारी सापांची विषारी साप समजून हत्या केली जाते. म्हणून अज्ञानी, अंधश्रध्द, अफवेने भयग्रस्त असलेल्या झुंडीपासून सावधान! जिथे अशा झुंडींचे प्रमाण जास्त तिथला निसर्ग कितीही चांगला वाटला तरी त्या ठिकाणी प्रवास टाळा!

-ॲड.बी.एस.मोरे©६.५.२०२०

विषाणू माणसाचे मित्र?

विषाणू माणसाचे मित्र?

निर्जीव पदार्थांपासून सजीवांची उत्पत्ती होताना निर्जीव व सजीव यांच्या सीमारेषेवरील अर्ध निर्जीव व अर्ध सजीव असलेले प्रोटीनयुक्त असंख्य विषाणू हे घटक त्यांच्या आर.एन.ए. सह सजीवांच्या डी.एन.ए. चे मित्र कसे झाले व त्यांच्या या मैत्रीतूनच सजीवांची उत्क्रांती कशी झाली हा लाखो वर्षांपूर्वीचा उत्क्रांती इतिहास खरंच रोमांचकारक! हा इतिहास जीवशास्त्र विज्ञानाच्या जैवतंत्रज्ञान व औषधनिर्माण शास्त्र विषयांत अभ्यासला जातो. जगात कोरोना विषाणूने कहर मांडला असताना या संदर्भातील  एक बातमी दिनांक २० एप्रिल, २०२० च्या टाईम्स अॉफ इंडिया वृत्तपत्रात वाचली आणि आश्चर्याने मन थक्क झाले. खरंच किती अवघड करून टाकलेय हे जीवन निसर्गाने? अशा या निसर्गाची देव म्हणून आध्यात्मिक आराधना तरी कशी करावी? पण देव संकल्पना मनातून जाता जात नाही आणि मग माझे आस्तिक मन "हे परमेश्वरा, ओम् शांती" असे म्हणतेच!

-ॲड.बी.एस.मोरे©६.५.२०२०

मंगळवार, ५ मे, २०२०

वृध्दापकाळातील शहाणपणा!

वृध्दापकाळातील शहाणपणा!

पुढच्या महिन्यात २७ जून रोजी ६३ वर्षे पूर्ण करून मी ६४ व्या वर्षात पदार्पण करणार. या कोरोना विषाणूने लॉकडाऊनच्या काळात मला अंतर्मुख केले आणि स्वतःचा विचार करायला भाग पाडले. माझ्या म्हाताऱ्या शरीराचे आता पूर्वीसारखे खाण्यापिण्याचे लाड नकोत की या शरीराला पूर्वीसारखा जड व्यायाम नको. या वयात या गोष्टी म्हणजे शरीराचे चोचले नव्हे तर वृध्द शरीराची चैनच झाली. साधे, हलके फुलके खाणे व हलका फुलका व्यायाम आता पुरेसा! तसेच माझ्या म्हाताऱ्या मेंदूचे आता पूर्वीसारखे अती विचाराचे चोचले नकोत. या उतार वयात अती खोलातला, अती लांबचा विचार करणे ही तर वृध्द मेंदूची चैनच झाली. हलका फुलका विचार, जगाकडे सहजसाध्या नजरेने बघणे हेच आता ठीक! भूतकाळ हा भूतकाळ असतो. तो पुन्हा पुन्हा आठवून काही उपयोग नसतो.  भूतकाळातील कटू आठवणींना उजाळा देणे म्हणजे म्हाताऱ्या मेंदूला उगाच ताप देणे. तसेच  भूतकाळातील रम्य आठवणींत रमणे म्हणजे उतार वयातील शरीर व मनाला न झेपणाऱ्या  जुन्या आकर्षणांना कवटाळून बसणे. अशा व यासह अनेक आकर्षणांचा व अशा बऱ्याच गोष्टींचा त्याग करणे हाच वृध्दापकाळातील शहाणपणा!

काम, क्रोध, लोभ जवळ मी केला
मद, मोह, मत्सर उगाच का केला
जगाचा लांब खोल विचार अती केला
संसार स्वतःचा उगाच दुबळा केला
बाळू म्हणे आता सोड विचार जगाचा
अंत जवळ आला आता घोर कशाचा?

-ॲड.बी.एस.मोरे©५.५.२०२०

टीपः
हा लघुलेख उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या मोठ्या माणसांसाठी जी माणसे वृध्दापकाळातही न थकता महान कार्ये करीत आहेत त्यांच्यासाठी नसून माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व असलेल्या वृध्दांसाठी आहे. त्यांनीही माझा हा विचार पटला तर घ्यावा नाहीतर सोडून द्यावा!

-ॲड.बी.एस.मोरे (५.५.२०२०)

सोमवार, ४ मे, २०२०

Death and Expiry

DEATH AND EXPIRY!

When human person's life comes to an end by accident, disease, murder etc. prematurely, a person can be said to be "died" and when human person's life comes to an end by aging after full living, a person can be said to be "expired".  The word "expired" is proper in latter case because human life gets finished by reaching to working expiry point.

-Adv.B.S.More©5.5.2020

Cyclic Transformation

CYCLIC TRANSFORMATION TAKES PLACE AUTOMATICALLY BY FORCE OF NATURE!

(1) If you keenly observe the motion of things in and around, you will find that total matter and total energy of three basic non-living things viz. air, land and water and all other living things viz. plants, birds, animals including human beings evolved by Nature on earth planet remain constant or same all time. What happens to these things is only their cyclic transformation in the form of their cyclic reproduction and cyclic reconsumption from the same original things having same total matter and same total energy all time. This cyclic transformation or simply recycling takes place or happens automatically by flow of energy under force of Nature.

(2) The ocean water is boiled by sun's heat energy and rain water is showered on earth from sky in cyclic motion, plants, flowers, fruits, grains are reproduced in cyclic motion, birds and animals including human beings get reproduced by sexual interaction in cyclic motion. This cyclic reproduction happens automatically by flow of energy under force of Nature. The things cyclicly reproduced themselves reconsume such reproduction in cyclic motion. This cyclic  reconsumption also happens automatically by flow of energy under force of Nature. The human knowledge about such cyclic reproduction and such cyclic reconsumption gets reproduced in cyclic motion from generation to generation through cyclic education  process.

(3) In short, actions and reactions of all things on earth are cyclic and they are enforced automatically by force of Nature. We are just pushed by force of Nature to do things in cyclic motion. This is science of Nature on earth which is stable with  some ups and downs happening  within such science by force of Nature. The cyclic transformation is stable change and ups and downs within such cyclic transformation is unstable change. These changes are forced by Nature and human brain has no control over them.

-Adv.B.S.More©5.5.2020

रविवार, ३ मे, २०२०

Lawyer's Mastery

LAWYER'S MASTERY!

Lawyer is said to be jack of all but master of none and this creates a problem for lawyer. The law is not  technology. It is only philosophy giving right direction to technology. It is often found that while lawyer masters knowledge in law and gets right direction, he does not master technology. Such position is like that of railway engine having track to run and destination to go, but not having internal machinery and fuel that can make engine run on track and move towards destination. It is therefore very much necessary for lawyer that while mastering law for knowing right direction of motion, lawyer should also concentrate on mastering technology of collecting and using materials of world.

-Adv.B.S.More©3.5.2020

शनिवार, २ मे, २०२०

Understanding Truth of Nature

UNDERSTANDING TRUTH OF NATURE, SCIENCE, TECHNOLOGY AND LAW!

(1) The Nature is all and all is of, by and within Nature. The Nature can be sensed through science. The science is thus consciousness of Nature. This sense/consciousness of Nature through science is meant for practice of science. The science can be practised in the form of technology and as per the mode, manner, way or direction of law. The science is thus divided in two parts viz. technology and law for its practice purpose. These two parts can be called as applied science or science in practice.

(2) The technology is application of diverse forms of matter and energy  and their diverse properties namely  physical, chemical, bio-physical, bio-chemical & bio-psychological. This application of science in the form of technology cannot be just arbitrary. It has to be as per the law which is actually the mode, manner, way or direction for technology prescribed by Nature.

(3) The law is reasoned & principled direction to technology. It can also be called as reasoned & principled philosophy or religion of Nature contained within science. The sense or knowledge of science is not complete only with technology or only with law. One is required to have knowledge of both technology and law. The knowledge of law is useless without knowledge of technology and the knowledge of technology is aimless in absence of proper direction contained within law.

(4) The science, technology and law are so vast that these three things cannot be mastered by one person. It is for this reason that there are scientists for science, engineers, doctors, artists, sportsmen etc. for technology and lawyers, judges along with businessmen, politicians etc. for law. The law is also so vast that it cannot be held together by any one person or any one group of persons and hence it is divided in three groups viz. legislature as the group of scientists of law, executive as the group of technocrats of law and judiciary as group of directors of law.

(5) The science is whole design of Nature whose movement is not possible without technology & law. But the motion of science cannot be smooth without technology and law working together as friends of each other. Even in the matter of law, motion of direction of law given by legislature cannot be smooth without executive and judiciary working together as friends of each other. One should not forget that law within science or philosophy of science called law itself is the religion of Nature.

(6) The science or design of Nature moves in the form of technology and as per the mode of law under strong force of time cycle called kalchakra. This time cycle creates cyclic ups and downs within motion  of science. These ups and downs are mythologically called the works of destiny or fate called Niyati. But actually the destiny is nobody than the Nature itself and the force of time cycle is also actually the force of Nature itself. It is pertinent to note that the Nature is permanent, its science is stable, but this stable science is not free from temporary ups and downs created by force of Nature called time cycle!

-Adv.B.S.More©3.5.2020

शुक्रवार, १ मे, २०२०

हरी हरी

हरी हरी!

(१) देव ही एक संकल्पना आहे, ते सत्य नाही, असे जर काही लोक म्हणत असतील तर मग ती संकल्पना आधुनिक काळातही का चालू आहे, तिच्या पासून माणसाला असे कोणते मानसिक समाधान मिळते, कोणता मानसिक आधार मिळतो याचा नीट अभ्यास करून ती संकल्पना नीट राबवायला काय हरकत आहे, याचा योग्य, विवेकी विचार झाला पाहिजे. देश ही सुध्दा एक संकल्पनाच आहे ना, मग ती आपण का व प्रत्यक्षात कशी राबवतो? त्याच पध्दतीने देव ही संकल्पना प्रत्यक्षात कशी राबवता येईल याचा नीट विचार झाला पाहिजे.

(२) आपण या जगात, समाजात विशेष कार्य करणाऱ्या महान लोकांना आपआपल्या सोयीप्रमाणे ज्याप्रमाणे विविध जातीधर्मात, समूहात वाटून घेऊन त्यांची विभागणी केली आहे, त्याचप्रमाणे आपण एकाच परमेश्वराची विविध धर्मात, अनेक देवीदेवतांत विभागणी केली आहे. ती विभागणी नष्ट करून देवाला एकसंध करण्यासाठी आपण देव संकल्पनेकडे वेगळ्या स्वरूपात पाहिले पाहिजे. संपूर्ण विश्वाचा निर्माता व नियंता असलेल्या एकमेव परमेश्वराला एकटे राहण्याचा कंटाळा आला म्हणून त्याने स्वतःला अनेक गुणरूपांत निर्मिले (वैज्ञानिक संदर्भः विश्व निर्मितीचा महास्फोटाचा सिद्धांत अर्थात बिग बँग थिअरी) व त्या अनेक रूपांना स्वतःचेच प्रतिस्पर्धी बनवून विश्वाचा एक वेगळाच खेळ मांडला. अशी जर आपण कल्पना केली तर देव ही संकल्पना सहज, सोपी होऊन जाईल.

(३) तो एकमेव परमेश्वर किंवा देव त्याच्या अनेक रूपांना त्यांच्या मूळ ईश्वर स्वरूपाची जाणीव होऊ देत नाही आणि म्हणून ही अनेक रूपे देवाच्या या अजब खेळात स्वतःला स्वतंत्र समजून अखंडपणे खेळ खेळू लागतात, असे समजू या! पण मनुष्याला मोठी बुद्धी आहे, मोठी जाणीव आहे म्हणून तो देव संकल्पनेला अगदी सहजपणे सोडून देत नाही. आपण व देव या दोन वेगळ्या गोष्टी नसून एकच आहेत असा जेंव्हा मनुष्याला साक्षात्कार होतो तेंव्हा  मनाचा गोंधळ संपतो व मग निसर्गाचे विज्ञान व देवाचा धर्म या दोन गोष्टी एक होऊन जातात. मग नैसर्गिक गोष्टी त्यांच्या सत्य स्वरूपात म्हणजे वैज्ञानिक पध्दतीने पार पाडताना सुध्दा ती देवाचीच लीला म्हणून साक्षात्कारी माणूस त्या गोष्टी सहजपणे पार पाडतो.

(४) अशावेळी नैसर्गिक काय व दैवी काय यात फरक राहत नाही. मग अनेक देवीदेवतांच्या प्रतिमा डोळ्यांसमोर आणून त्यांची विविध नावे घेत त्यांना विविध नमस्कार करीत त्यांच्यापुढे विविध प्रार्थना करण्याची सवय हळूहळू सुटते व शेवटी असे कर्मकांड निरर्थक आहे याचा सुध्दा साक्षात्कार होतो. त्यानंतर दिवसाच्या ठराविक वेळीच देवाला नमस्कार करण्याची व वर्षाच्या ठराविक सणीच विविध देवी देवतांची विशिष्ट प्रकारे आराधना करण्याची कर्मकांडे संपून जळी तळी पाषाणी सदासर्वकाळ एकच देव दिसू लागतो व मग माणूस निसर्गाचे कोणतेही काम वैज्ञानिक पद्धतीने करताना सुध्दा ते त्या एकमेव देवाचेच काम आहे असे समजून देवाला फक्त "हरी, हरी" एवढेच म्हणून ते काम पार पाडतो. ते काम करताना कसलेही धार्मिक कर्मकांड नसते की कसलीही प्रार्थना नसते किंवा काही विशेष चमत्कार व्हावा अशी कोणतीही अपेक्षा नसते. फक्त "हरी, हरी" म्हणायचे बस्स!

-ॲड.बी.एस.मोरे©२.५.२०२०