https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

COMPETITION

तुकडे गोळा करण्याच्या स्पर्धेत माणूस जगणेच विसरून गेलाय!

(१) माणूस जन्मला की सुरू होते त्याची विश्व भ्रमंती व जगण्याची धडपड! ही धडपड पुढे नुसती जगण्यापुरतीच थांबत नाही तर ती ज्या पृथ्वीने त्याला जगण्याची संधी दिली त्याच पृथ्वीचे लचके तोडण्यास सुरूवात करते. या लचके तोडण्याच्या कर्माला माणूस मोठ्या दिमाखात जग जिंकायला निघालोय असे मोठे लेबल लावून मोकळे होतो.

(२) अंतराळ व्यापलेल्या संपूर्ण विश्वाचे लचके तोडण्याच्या स्वतःच्या मर्यादा लक्षात आल्या की मग माणूस पृथ्वीचे लचके तोडण्यावरच स्वतःचे लक्ष केंद्रित करतो. पृथ्वीचे लचके दोन प्रमुख भागात किंवा तुकड्यात तोडता येतात. एक तुकडा असतो पृथ्वीच्या ज्ञानाचा तुकडा व दुसरा तुकडा असतो पृथ्वीवरील भौतिक, रासायनिक व जैविक साधनसंपत्तीचा तुकडा. हे दोन्ही तुकडे स्वतःकडेच जास्तीतजास्त कसे येतील या प्रयत्नात माणूस स्वतःचे आयुष्य खर्ची घालतो. त्यासाठी एक माणूस दुसऱ्या माणसाबरोबर स्पर्धा करतो. पृथ्वीचे हे दोन प्रमुख तुकडे गोळा करण्याच्या स्पर्धेला पुढे मोठे स्वरूप प्राप्त होते.

(३) ही ज्ञानाची व आर्थिक संपत्तीची स्पर्धा हळूहळू जीवघेणी स्पर्धा होते. मग या स्पर्धेवर अधिपत्य गाजविण्यासाठी पुढे सुरू होते ती राजकीय सत्तेची स्पर्धा जी खूप भयंकर असते. वर उल्लेखलेले दोन तुकडे गोळा करण्याची ही स्पर्धा नसते तर या दोन तुकड्यांवर राजसत्तेचे अधिपत्य गाजविण्याची स्पर्धा असते आणि या राजकीय स्पर्धेचा उद्देश काय सांगितला जातो तर वरील दोन तुकडे गोळा करण्याच्या मूलभूत स्पर्धेवर शिक्षेच्या भीतीचे नियंत्रण ठेवणे.

(४) शिक्षेच्या भीतीचे नियंत्रण वरील मूलभूत ज्ञान व अर्थ स्पर्धेवर ठेवण्यासाठी राजसत्तेला राजकीय दृष्ट्या सामर्थ्यवान असणे आवश्यक असते. त्यासाठी लोकांच्या मोठ्या समूहाच्या (ज्याला राष्ट्र म्हणतात) अंतर्गत कुरघोडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राजसत्ता पोलीसी बळ निर्माण करते व राष्ट्राचे बाह्य/परकीय आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी राजसत्ता लष्करी बळ निर्माण करते. ज्ञान व अर्थ हे पृथ्वीचे दोन प्रमुख तुकडे गोळा करण्याच्या मूलभूत स्पर्धेवर शिक्षेच्या भीतीचे नियंत्रण ठेवण्याचा कायदा राजसत्ता तयार करते व कायद्याचे राज्य हे लेबल स्वतःला लावून घेऊन देशाच्या जनतेवर सत्तेचा फास घट्ट आवळते.

(५) राजसत्तेचा फास देशाच्या जनतेभोवती घट्ट आवळण्यासाठी राजसत्ता ज्ञान व अर्थ या दोन प्रमुख तुकड्यांनाच स्वतःच्या पायाशी लोळण घ्यायला भाग पाडते. त्यासाठी मूठभर ज्ञान संपन्न लोक व मूठभर भांडवलदार या दोघांना साम, दाम, भेद, दंड नीती वापरून राजसत्ता हाताशी धरते. हीच ती राजसत्तेभोवती गोंडा घोळणारी मूठभर माणसे असतात जी अज्ञान व गरिबी यांच्या जाळ्यात अडकलेल्या जनतेला ज्ञान व अर्थ स्पर्धेच्या चक्रात धूर्तपणे गुंतवून ठेवून प्रसंगी धर्माचेच नव्हे तर विज्ञानाचेही राजकारण करून वेठीस धरतात. हे सत्य कळल्यावर जर कोणी बंड करून उठले तर अशा बंडखोरावर राष्ट्रद्रोहाचा गंभीर आरोप ठेवून त्याला पोलीसी व काही प्रसंगी लष्करी  बळाच्या जोरावर कठोर शिक्षा देत त्याला गप्प केले जाते व त्यातून जनतेचा आवाज दाबला जातो. याला कायद्याचे राज्य असे गोंडस नाव दिले जाते.

(६) ज्ञान व अर्थ हे दोन तुकडे गोळा करण्याचे हे चक्र इतके चक्रावून टाकणारे आहे की या चक्रात अडकून माणसाचे सुंदर आयुष्य कधी संपून जाते हे कळतच नाही. शेवटी माणूस मरतो हे माहित असूनही जवळजवळ सगळीच माणसे पृथ्वीचे लचके तोडून तिच्या ज्ञान व अर्थ या दोन प्रमुख तुकड्यांना गोळा करण्याच्या स्पर्धेत स्वतःला झोकून देतात व शेवटी जमेल तेवढे गोळा केलेले हे दोन तुकडे आपल्या वारसांच्या ताब्यात देत मरण पावतात.

(७) ज्ञान व अर्थ हे पृथ्वीचे दोन प्रमुख तुकडे (राजसत्ता ही या दोन तुकड्यांवर अधिसत्ता गाजविणारी तिसरी शक्ती आहे जी या दोन तुकड्यांतूनच निर्माण होते) गोळा करण्याच्या स्पर्धेत माणूस जगणेच विसरून गेलाय. ज्ञान व ज्ञानाच्या सरावाने अंगी मुरवलेले कला कौशल्य  यांचे प्रदर्शन (सादरीकरण हा सौम्य शब्द) लोकांपुढे करून लोकांकडून नुसती वाहव्वा, शाब्बासकीच नव्हे तर आर्थिक मोबदला (काही वेळा राजकीय मोबदला) मिळविण्याचा प्रयत्न ज्ञान संपन्न लोक करीत असतात. त्यात सर्वच ज्ञानी लोकांना यश प्राप्त होते असे नसते. ज्यांना ज्ञानातून शिकलेल्या तत्वांना मुरड घालणे जमत नाही त्यांची या यश प्राप्तीच्या मार्गात खूप गोची होते.

(८) काही ज्ञानी माणसे चित्रे काढीत चित्रकार होतात, काही मूर्तिकार होतात, काही कवी, गीतकार होतात, काही लेखक होतात, काही संगीतकार, नाट्य चित्रपट कलाकार होतात, काही खेळाडू होतात, काही उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक होतात तर काही राजकारणी होतात. ज्यांच्याकडे ज्ञानाचा छोटासा तुकडा असतो असे अल्पज्ञानी कष्टकरी कामगार होतात. ही सर्व ज्ञाती, अज्ञाती मंडळी वरील  स्पर्धेच्या चक्रात स्वतःला अडकवून घेऊन सुंदर  मनुष्य जीवनाला संघर्षाचे स्वरूप देतात. तुकडे गोळा करण्याच्या वरील स्पर्धेचा शेवट काय? काही महापुरूषांचे जीवन आदर्श म्हणून अजरामर होते, तर काही शास्त्रज्ञांचे शोध व काही कलाकारांच्या कलाकृती कायम स्मरणात राहतात. पण कालानुरूप या सर्व मानवनिर्मित गोष्टी निसर्ग कालबाह्य करून टाकतो हे सत्य विसरून कसे चालेल?

(९) माझा एक लेखक मित्र होता. परिस्थितीने गरीब व शासकीय खात्यात कारकून म्हणून नोकरी करणारा तो मित्र खूप वेगळा होता. घरातील कुटुंब सदस्य व त्याची भावंडे यांना त्याच्या लेखन कलेचे काहीही सोयरसुतक नव्हते. कारकूनीच्या पगारातून तो घरी किती पैसे आणतो याकडेच सर्वांचे लक्ष असायचे. अशा नकारात्मक वातावरणात माझ्या या मित्राने पुस्तकांचा खूप मोठा संग्रह घरात जमा केला होता. झोपडपट्टीतील घराच्या माळ्यावर त्याची स्वतःची छोटीशी अभ्यासिका व लायब्ररी होती. तिथे मला प्रवेश असायचा. तिथेच अनेक विषयांवर आमच्या गप्पागोष्टी व्हायच्या. दादर येथे जुन्या पुस्तक विक्रेत्यांच्या गल्लीत एक छोटा प्रकाशक होता. त्याच्या मदतीने माझ्या या लेखक मित्राची काही पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यांच्या प्रकाशन सोहोळ्यासाठी मला खास आमंत्रण असायचे. माझा हा मित्र अल्पायुषी ठरला. पन्नाशी पार केल्यावर हार्ट अटॕकने तो गेला. त्याच्या कलेला न ओळखणाऱ्या त्याच्या कुटुंबाची व लग्न करून संसार थाटलेल्या त्याच्या भावंडांच्या संसाराचीही पुढे वाट लागली. त्याची प्रसिद्ध झालेली ती पुस्तकेही लोकांच्या स्मरणातून हळूहळू निघून जात रद्दी खाती जमा झाली.

(१०) हे सगळे जीवन चक्र हे असेच आहे. पण माणूस पृथ्वीचे लचके तोडण्याच्या व वरील तुकडे गोळा करण्याच्या कामात निरंतर व्यस्त आहे. तुकडे गोळा करण्याच्या स्पर्धात्मक संघर्षात मनुष्य हे सुंदर जीवन आनंदाने व शांततेने जगणेच विसरून गेलाय!

-ॲड.बी.एस.मोरे©१८.४.२०२०



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा