निसर्ग म्हणे मानवी मेंदूला!
निसर्ग म्हणे मानवी मेंदूला, अरे विस्मयचकित करून टाकणारे जग आहे ना माझे! अरे माझ्या या आश्चर्यकारक जगाकडे बघताना माझ्यातला देव काय बघत बसलास! तुझ्या कल्पनेतला तो धार्मिक देव मी नव्हेच! मी निसर्ग आहे! निसर्ग म्हणतात मला! मग माझ्या पाया पडत काय बसलास? आजूबाजूला बघ जरा! सगळीकडे मीच तुला दिसेल! पण तो विविध पदार्थांत, त्यांच्या विविध गुणधर्मांत व त्यांच्या विविध हालचालीत! सर्वांची एक विशिष्ट साखळी बघ, सर्वांची एक विशिष्ट हालचाल बघ! या विविध पदार्थांशी, त्यांच्या साखळीशी, त्यांच्या गुणधर्म व हालचालीशी असलेला तुझा संबंध ओळख व त्यानुसार तुझीही विशिष्ट हालचाल कर. तुझी ही हालचाल माझ्या रचनेशी ताळमेळ असणारी म्हणजेच नैसर्गिक हवी. तुझ्या धार्मिक प्रार्थनेशी मला काहीही देणे घेणे नाही. तुझ्या नैसर्गिक वागण्यात तू चुकलास की मग तुला तुझ्या अनैसर्गिक कर्माची कडू फळे ही भोगावीच लागणार. नैसर्गिक वागणूक काय व कशी असावी हे तुला माझ्या विविध सजीव, निर्जीव पदार्थांच्या गुणधर्मांतून व त्यांच्या विविध प्रकारच्या नैसर्गिक हालचालीतूनच शिकावे लागणार. या शिक्षणाला तर विज्ञान म्हणतात आणि या विज्ञानाच्या कौशल्यपूर्ण सरावाला, वापराला तंत्रज्ञान म्हणतात. मी एवढा मोठा आहे व माझे हे जग एवढे मोठे आहे की विज्ञान व तंत्रज्ञान ही तुझ्याकडून सतत, अविरतपणे चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत देव व धर्म आणून तू स्वतःला भ्रमिष्ट करू नकोस. त्यात तुझा उगाच वेळ वाया जाईल. आता बघ, हा कोरोना विषाणू कोणी निर्माण केला? माझ्या जगातील नैसर्गिक हालचालीत कोणाकडून काहीतरी चूक झालीय का याचा नीट शोध घे. या शोधातून तुला नक्की या विषाणूवर औषध सापडेल. पण तोपर्यंत त्रास हा होणारच! पण तू चिवट आहेस. मागे किती संकटे आली तुझ्या जगण्याच्या मार्गात! पण तू तुझ्या बुद्धीचा नीट वापर करून शांतपणे स्वतःला किती व्यवस्थित सावरून घेतलेस! आता पण तसेच होणार! तू माझी धार्मिक प्रार्थना करीत बसू नकोस. तुझ्या बुद्धीने अशाप्रकारे केविलवाणे होणे मला कसे आवडेल? वैज्ञानिक प्रयत्न कर, नक्की मार्ग सापडेल!
तुझाच,
निसर्ग!
-ॲड.बी.एस.मोरे©२६.४.२०२०
टीपः
हे माझे काल्पनिक स्वगत आहे. मी निसर्गालाच वैज्ञानिक देव मानतो व निसर्गातच वैज्ञानिक देव पाहतो.
-ॲड.बी.एस.मोरे©२६.४.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा