स्वार्थाचे महासत्य!
(१) स्वार्थ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तुम्ही संसारासाठी बाहेरून किती कमाई करून घरात आणता याकडे घरातील माणसांचे लक्ष असते, तर तुमच्या शारीरिक आणि/किंवा बौद्धिक कष्टाला जास्तीत जास्त फुकटात कसे ओरबाडता किंवा लुबाडता येईल याकडे बाहेरच्या जगातील माणसांचे लक्ष असते. याचा अर्थ असा की, घरातील माणसे स्वार्थी असतील तर बाहेरची माणसे महास्वार्थी असतात.
(२) रामायण महाकाव्याची निर्मिती ज्या वाल्मिक मुनींनी केली त्यांची वाल्याचा वाल्मिक मुनी कसा झाला ही कथा सर्वांनाच ठाऊक आहे. वाल्याच्या घरची माणसे जेंव्हा वाल्याने त्या माणसांसाठीच केलेल्या पापांचा भार डोक्यावर घ्यायला नकार देतात तेंव्हा वाल्याला स्वार्थाचे महासत्य कळते व त्याचा वाल्मिक मुनी होऊन त्याच्या हातून प्रसिद्ध रामायण महाकाव्याची निर्मिती होते. गौतम बुध्दाने सुध्दा स्वार्थ हेच जगातील दुःखाचे मूळ आहे असे म्हटले आहे. या सर्व गोष्टी माझ्या वाचनात, ऐकण्यात आल्या असल्या तरी माझ्याकडे त्यांचे ठोस पुरावे नाहीत. पण तरीही या कथांतून चांगला संदेश घ्यायला काय हरकत आहे?
(३) स्वार्थ हेच जर दुःखाचे मूळ आहे तर मग या स्वार्थावर विजय हा मिळवलाच पाहिजे. पण तो कसा मिळवायचा? कारण आपण जगातून स्वार्थ तर नष्ट करू शकत नाही. या संदर्भात स्वार्थाचा कायदा काय म्हणतो हे नीट शिकले पाहिजे. स्वार्थासाठी पापे म्हणजे वाईट कृत्ये करण्यास स्वार्थाचा कायदा प्रतिबंध करतो. हाच कायदा वाईट कृत्ये कोणती याची यादी आपल्याला देतो व मग ही वाईट कृत्ये टाळून आपल्या स्वार्थाचे समाधान कसे करता येईल त्याचा कायदेशीर मार्ग सांगतो.
(४) तुम्ही तुमच्या स्वार्थावर विजय मिळविणे याचा अर्थ हा की, तुम्ही तुमच्या अवतीभवती घुटमळणाऱ्या तुमच्या घरातील माणसांचा स्वार्थ व बाहेरच्या जगातील माणसांचा महास्वार्थ ओळखून या दोन्ही स्वार्थांची सांगड तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाशी म्हणजे तुमच्या वैयक्तिक आवडीनिवडींशी घालण्यात तरबेज होणे. अर्थात जगातील स्वार्थ, महास्वार्थ यांच्यात वैयक्तिक पातळीवर असे संतुलन निर्माण करून ते कायम राखण्याचा सतत प्रयत्न करणे व त्यासाठी स्वार्थाच्या कायद्याची शिकवण आत्मसात करणे.
-ॲड.बी.एस.मोरे©२०.४.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा