https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २० मार्च, २०२४

कृत्रिमतेचा भस्मासूर!

कृत्रिमतेचा भस्मासूर!

निसर्गाने पृथ्वीवर विविध पदार्थांची जी सृष्टी निर्माण केली ती नैसर्गिक उत्क्रांती पद्धतीने. या निर्मितीचा उद्देश निर्मित पदार्थांचा पदार्थांकडून नैसर्गिक वापर हाच होता. पण याच निसर्गाने पृथ्वीवर माणूस नावाचा सजीव पदार्थ पृथ्वीवर उत्क्रांत केला आणि त्याला अशी काही वासना व बुद्धी दिली की त्याने निसर्गाच्या मूळ नैसर्गिक उद्देशाचीच वाट लावली. त्याच्या तल्लख बुद्धीच्या जोरावर त्याने संपूर्ण सृष्टीची मूळ नैसर्गिकता नष्ट करून तिच्यात कृत्रिमता ठासून भरली.

निसर्गाने पृथ्वीवर विविध पदार्थांची सृष्टी निर्माण केली व तिच्यात आंतर वापराची एक शृंखला तयार केली. या आंतरवापर व्यवहारात निसर्गाने मनुष्याला उच्च स्थानावर आणून बसवले. मानवाची जैविक उत्क्रांतीच सृष्टीच्या पर्यावरणीय पिरॕमिडमध्ये सर्वोच्च स्थानावर झाल्याचे (की केल्याचे?) दिसत आहे. मनुष्याची बुद्धी सुद्धा उत्क्रांतीतून अधिकाधिक  तल्लख होत गेली. या बुद्धीच्या जोरावर मनुष्याने विविध पदार्थांचे गुणधर्म तर शोधलेच पण या विविध पदार्थांमधील आंतरवापरी साखळी सुद्धा शोधून काढली. मग मनुष्याने स्वतःच या सर्व पदार्थांचा स्वतःच्या मर्जीनुसार वापर सुरू केला. हा वापर खरोखरच नैसर्गिक वापर राहिलाय का की मनुष्याकडून त्याचे कृत्रिम वापरात रूपांतर केले गेलेय हा प्रश्न आहे.

पदार्थांच्या नैसर्गिक वापराचे तांत्रिक कृत्रिम वापरात रूपांतर केल्यानंतर मनुष्याने या पदार्थांची त्यांच्या कृत्रिम वापरासह जी आंतरमानवी देवाणघेवाण सुरू केली ती तरी नैसर्गिक राहिलीय का? निसर्गाने माणसासह विविध पदार्थ निर्माण केले पण त्यांची पैशातील किंमत  माणसाने स्वतःच्या सोयीनुसार ठरविली. ही किंमत मानवनिर्मित म्हणजे कृत्रिम आहे. विविध पदार्थ वैशिष्ट्यांना संलग्न विविध मानवी सेवा निर्माण करून माणसाने या सेवांची किंमतही पैशात ठरविली. वस्तू व सेवा कर (गुडस अँड सर्विस टॕक्स म्हणजे जी.एस.टी.) हे या पैशातील किंमतीचे सरकारी पिल्लू. मुळात वस्तू व सेवांची आंतरमानवी आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी निर्माण केला गेलेला पैसा हीच मानवनिर्मित म्हणजे कृत्रिम गोष्ट आहे.

पैसाच काय पण ज्यावर व ज्यासाठी माणसाचे राजकारण चालते ती राजकीय सत्ता ही सुद्धा कृत्रिम म्हणजे मानवनिर्मित गोष्ट होय. कृत्रिमतेची ही यादी अपूर्ण आहे. हल्ली हल्लीच कृत्रिम बुद्धिमत्तेचाही मानवाने शोध लावलाय व तिचा वापरही सुरू केलाय. माणसाने सृष्टी मध्ये नैसर्गिकता किती शिल्लक ठेवलीय याचा हिशोब करण्याची वेळ आली आहे.

माणूस नैसर्गिक जीवन जगणेच विसरून गेलाय. त्याला कृत्रिमतेची इतकी सवय लागलीय की तो या कृत्रिमतेतच आयुष्य जगतो व आयुष्य संपवतो. आयुष्यभर तो या कृत्रिमतेचे मार्केटिंग करून तिचीच देवाणघेवाण करीत राहतो. इतकेच काय कृत्रिमतेच्या कृत्रिम भीतीने तो स्वतःचे जीवन त्रस्त, तणावग्रस्त करून टाकतो. कृत्रिमता ही पूरक गोष्ट आहे. ती मूळ नैसर्गिकतेची जागा घेऊ शकत नाही हे माणसाने वेळीच ओळखले पाहिजे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.३.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा