विसरलेली नाती माझ्या वडिलांनी पुन्हा कशी जोडली?
अनुवंशशास्त्र हे फार महत्वाचे शास्त्र आहे. वंश सातत्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारी ही एक स्वतंत्र विज्ञानशाखा आहे. कूळ हा शब्द वंश या शब्दाशी निगडित आहे. वंश किंवा कूळ हा डी.एन.ए. म्हणजे वंश तत्वाने एकमेकांशी जोडला गेलेला एक अत्यंत जवळचा (सोप्या भाषेत जवळच्या रक्ताच्या नात्याचा) एक मानव समूह असतो. डी.एन.ए. ने, रक्ताने, संस्कृतीने व कुळदैवतांनी जोडला गेलेला हा लोकसमूह घट्ट नात्यांनी बांधलेला असतो.
हल्लीचे जीवन जीवघेण्या स्पर्धेचे व कृत्रिम व्यावहारिक संबंधापुरते मर्यादित झाल्याने पूर्वीची एकत्र कुटुंब व्यवस्था संपून स्वतःपुरतेच बघणारी छोटी छोटी संकुचित कुटुंबे निर्माण झाली. या अशा सामाजिक बदलाने नातेसंबंध दुरावले. वंश, कूळ, कुळदैवत, कुळाचार या सर्व गोष्टी कालबाह्य झाल्या. आपण कधी काळी एकमेकांशी जवळच्या नात्यांनी जोडलो गेलो होतो ही गोष्ट नातेवाईकांच्या विस्मरणात गेली.
माझे वडील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील साडे गावात त्यांच्या इतर चार भांवडांबरोबर अत्यंत दरिद्री अवस्थेत जगत होते. त्यांची शेती वगैरे त्यांच्या वडिलांनी विकल्यामुळे साडे गावातील आमचे ते मोरे कुटुंब निराधार झाले होते. माझ्या वडिलांसह पाचही भावंडांची दया येऊन मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या मामांनी त्या सर्वांना मुंबईत आणले व त्यांना मुंबईच्या कापड गिरणीत कामाला लावून त्यांची लग्नेही त्या मामांनी लावून दिली. त्यासाठी जवळच्या नात्यातील मुली शोधल्या. या पाच भावंडांपैकी चार भाऊ होते तर एक बहीण होती (माझी आत्या). तिचेही लग्न नातेसंबंधात लावून दिले.
निराधारांना कसली नाती आणि कसले काय? पण मामांनी मुंबईत आधार दिला आणि निराधार मोरे कुटुंबाला नाती मिळाली. माझे वडील फक्त सातवी पर्यंत शिकलेले पण अत्यंत हुशार व धाडसी होते. स्वकर्तुत्वावर ते मुंबईत मोठे गिरणी कामगार पुढारी झाले. तो इतिहास वेगळा व रोमांचकारक आहे. पण इथे विषय हा आहे की मामांनी लग्नांनी जोडून दिलेली नाती माझ्या वडिलांनी पुढे कशी जोडली, वाढवली व टिकवली?
माझ्या वडिलांचे लग्न त्यांच्या मामांनी सोलापूर जिल्ह्यातील केम जवळील ढवळस गावातील एका अशिक्षित मुलीशी जमवले ती माझी आई. त्याकाळी साधा फोन नव्हता. मोबाईल फोनची तर गोष्टच विसरा. त्याकाळी होती ती फक्त साधी पोस्ट कार्डस व अंतर्देशीय पत्रे. माझ्या वडिलांनी त्यांच्या खेडगल्लीतील मामांकडून व माझ्या आईकडून हळूहळू सर्व नातेवाईक मंडळींची माहिती गोळा करायला सुरूवात केली. त्यांचे मुंबईतील व सोलापूर जिल्ह्यातील पत्ते शोधले व सर्वांना सुरूवातीला पोस्ट कार्डस व नंतर अंतर्देशीय पत्रे लिहून सगळ्यांच्या कुळांची मुळे शोधून आपण सर्व एकमेकांना जवळच्या नात्यांनी कसे जोडले गेलो आहोत हे समजावून सांगितले. आणि मग हळूहळू मुंबई, व सोलापूरच्या गावांतून नातेवाईक मंडळीच्या पत्रांचा ओघ आमच्या वरळी बी.डी.डी. चाळीतील घरी सुरू झाला. मग पुढचा टप्पा होता मुंबईतील खेडगल्ली ते पार बोरीवली पर्यंत विखुरलेल्या व सोलापूर जिल्ह्यातील निरनिराळ्या गावांत वास्तव्य करून असलेल्या नातेवाईकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्याचा. तो टप्पा माझ्या वडिलांनी यशस्वीपणे पार पाडला. आणि मग सुरू झाली आमच्या वरळीच्या घरी विस्मरणात गेलेल्या आमच्या नातेवाईकांची वर्दळ.
आमचे वरळीचे घर फक्त १२० चौ. फुटाचे. पण त्याच छोट्या घरात माझ्या वडिलांनी पूर्णपणे विसर पडलेल्या नातेवाईकांची जत्रा भरवली. त्यातील काहींना त्यांच्याच मिलमध्ये नोकरीला लावले. मी घरात थोरला मुलगा असल्याने माझे वडील सतत मला त्यांच्याबरोबर फिरवायचे. विसरलेली नाती पोस्ट कार्डस, अंतर्देशीय पत्रांच्या जोरावर पुन्हा जोडल्यावर बार्शी, पांगरी, मोहोळ, पंढरपूर अशा विविध ठिकाणी माझे वडील मला घेऊन फिरायचे. काय तो मायाप्रेमाचा गोतावळा होता. नुसत्या पत्रांनी जवळ आलेला तो गोतावळा केवढा आनंद देऊन गेला. केवढी आपुलकी होती त्यात.
खंत याचीच आहे की काकांना (माझ्या वडिलांना आम्ही काका म्हणायचो) जे साध्या पोस्ट कार्डस, अंतर्देशीय पत्रांवर जमले ते मला हल्लीच्या एकदम फास्ट असलेल्या मोबाईल, व्हॉटसॲपवर जमले नाही. तो काळच वेगळा होता. ती माणसेही वेगळी होती.
-©ॲड.बी.एस.मोरे, २२.३.२०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा