उच्च शिक्षणाला योग्य वेळी योग्य संधी मिळाली नाही तर?
माणूस उच्च ध्येयाने उच्च शिक्षण घेतो. उच्च शिक्षणाची प्रमाणपत्रे लोकांना दाखवित फिरण्यासाठी तो उच्च शिक्षण घेत नाही. पण कठोर बौद्धिक परिश्रमातून मिळविलेल्या उच्च शिक्षणाला योग्य वेळी योग्य संधी म्हणजे उच्च कामाची योग्य संधी जर मिळाली नाही तर उच्च शिक्षित माणसापुढे उच्च ध्येय रहात नाही व उच्च शिक्षण त्याच्या मेंदूवर व्यर्थ भार होऊन बसते. असा उच्च शिक्षित माणूस मग दिशाहीन होऊन छोट्या छोट्या गोष्टींतच त्याचे आयुष्य वाया घालवतो.
निसर्गाचा कारभार किचकट आहे व वाढत चाललेल्या लोकसंख्येने तो अधिकाधिक स्पर्धात्मक व जास्त किचकट झाला आहे. उच्च शिक्षण हे आव्हान पेलण्याचे सामर्थ्य देते. उच्च शिक्षण सतत मोठी आव्हाने डोक्यावर घ्यायला आतुर असते. तीच तर उच्च शिक्षणाची कसोटी असते. अशा या उच्च शिक्षणाला मोठी आव्हाने पेलण्याची संधीच दिली नाही तर उच्च शिक्षण उच्च शिक्षित माणसाच्या डोक्यावर मोठा भार होऊन बसते. कशाला घेतले एवढे मोठे उच्च शिक्षण असे उदास विचार अशा उच्च शिक्षित व्यक्तीच्या मनात सारखे घोंघावत राहतात. समाजात जेव्हा अशिक्षित किंवा अर्ध शिक्षित माणसे पैसा व सत्ता यांच्या जोरावर समाजात दिमाखात मिरवतात तेव्हा तर ही उदासिनता जास्त वाढते.
उच्च शिक्षणातून मिळविलेल्या उच्च ज्ञानाला मोठ्या आव्हानांचे मोठे अवकाश (स्पेस) मिळाले नाही तर उच्च शिक्षण भरकटते. ते शिक्षण छोट्या व साध्या गोष्टींतच अडकून, तिथेच घुटमळत बसते. साधे गवत कापायला खुरपे बस्स असते. तिथे तलवार काय कामाची? पण धारधार उच्च शिक्षणाला जर असे साधे गवत कापण्याची वेळ आयुष्यभर आली तर त्या उच्च शिक्षणाची अवस्था काय होत असेल? मोठ्या गोष्टी जर उच्च शिक्षणाला अवास्तव व छोट्या गोष्टी वास्तव झाल्या तर त्या उच्च शिक्षणाला छोट्या गोष्टींवरच सतत लक्ष केंद्रित करणे शक्य होईल काय? त्या उच्च शिक्षणाला अशी परिस्थितीत छोट्या गोष्टीच अतिशय अवघड वाटू लागल्या तर त्यात त्या उच्च शिक्षणाचा काय दोष?
जगावर प्रभुत्व गाजवणाऱ्या मानव समाजाचे संपूर्ण अवकाश (स्पेस) हे खरे तर मूलभूत शिक्षण व त्यापुढील उच्च शिक्षण यांनी व्यापले पाहिजे. पण ते खरे व्यापलेय कोणी? तर दोन शक्तीशाली गटांनी. एक गट आहे श्रीमंत भांडवलदारांचा व दुसरा गट आहे बाहुबळी राजकारण्यांचा. या दोन्ही गटांची भागीदारी आताची नाही. ती कितीतरी काळापासून पिढ्यानपिढ्या चालू आहे. या अतूट भागीदारीत शारीरिक कष्ट करणाऱ्या शेतकरी-कामगारांचा व बौद्धिक कष्ट करणाऱ्या सुशिक्षित व्यवस्थापक-कर्मचाऱ्यांचा वाटा अगदीच नगण्य आहे. खरं तर हे शारीरिक व बौद्धिक कष्टकरी वरील दोन शक्तीशाली गटांचे अर्थात भांडवलदार व राजकारणी यांच्या भागीदारीचे नोकर चाकर, गुलाम राहिले आहेत व रहात आहेत.
मेहनतीने घेतलेल्या उच्च शिक्षणाला त्याचे कर्तुत्व गाजवण्याची संधी कोण देणार? माणसांनी बनवलेला कायदा की हा कायदा राबवणारी माणसे? पण हा कायदा खऱ्या अर्थाने कोण राबवतेय? समाजातील मूठभर भांडवलदार व राजकारणी हे दोन शक्तीशाली गटच ना! आता हे दोन गट कायद्याची अंमलबजावणी कायद्याप्रमाणे करतात की नाही हे पाहण्यासाठी व न्यायाचे हुकूम देण्यासाठी जरी स्वतंत्र न्याययंत्रणा असली तरी तिलाही तिच्या मर्यादा आहेत. न्यायाधीश मंडळी ही सुद्धा माणसेच असतात व न्यायालयात अशिलांच्या न्याय हक्कासाठी कायदेशीर युक्तिवाद करणारी वकील मंडळी ही सुद्धा माणसेच असतात. आणि शेवटी न्यायालयात भांडवलदार व राजकारणी या दोन शक्तीशाली गटांना अशील म्हणून स्वीकारून त्यांची वकिली करणारे मूठभर वकील हे सुद्धा फार मोठे वकील असतात. त्यांच्यापुढे गरीब व अशक्त अशा सर्वसामान्य अशिलांचा व त्यांची हिंमतीने वकिली करणाऱ्या वकिलांचा काय आणि किती निभाव लागणार? तरीही आपण म्हणायचे की कायद्यासमोर सर्व समान आहेत. अशा परिस्थितीत उच्च शिक्षणाला उच्च दर्जाच्या कामाची संधी कशी मिळणार? कारण शेवटी अशी संधी देणारे आहेत कोण? वर उल्लेखित भांडवलदार व राजकारणी हे दोन शक्तीशाली गटच ना? त्यांच्याकडे उच्च शिक्षण असो नसो, ते प्रचंड शक्तीशाली आहेत हे आपल्या मानव समाजाचे कटू वास्तव आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर हे कटू वास्तव कळल्यावर बऱ्याच गोष्टी मनाला पटेनाशा होतात. पण त्या सहन करीत राहण्याशिवाय पर्याय नसतो. पटवून घ्यावे लागते व त्यासाठी मनावर विजय मिळवावा लागतो. मनावर विजय मिळविण्याला पर्याय नाही!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा