परिक्रमा!
निसर्गातील विविधतेशी देवधर्माची विविधता कशी संलग्न आहे हा माझा संशोधनाचा विषय. तसा मी कोणी वैज्ञानिक शास्त्रज्ञ किंवा आध्यात्मिक पंडित नाही. मी एक निरीक्षक आहे व निरीक्षणातून माझ्या अल्प बुध्दीला जे काही आकलन होते त्या आकलनाची मी शब्दांत मांडणी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मी जे काही बोलतो किंवा लिहितो ते परिपूर्ण असूच शकत नाही. त्यात त्रुटी राहणारच. तेंव्हा चुकभूल द्यावी घ्यावी.
माझ्या वैयक्तिक निरीक्षणानुसार निसर्ग विज्ञानाच्या विविधतेचे जसे एक गोल चक्र आहे तसे परमेश्वरी अध्यात्माच्या विविधतेचेही एक गोल चक्र आहे. ही दोन्ही वैज्ञानिक व आध्यात्मिक चक्रे एकमेकांशी संलग्न व एकमेकांत मिसळलेली आहेत. ही दोन्ही चक्रे वेळ आणि काळाच्या घड्याळात (कालचक्रात) गोल फिरत असतात. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या चक्राला मी वेळचक्र म्हणतो तर तिच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा (परिक्रमा) पूर्ण करण्याच्या चक्राला मी कालचक्र म्हणतो. संपूर्ण विश्वाचे (ब्रम्हांडाचे) कालचक्र खूप मोठे आहे हा माझा निरीक्षणावर आधारित असलेला एक अंदाज.
इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, वैज्ञानिक व आध्यात्मिक या दोन्ही चक्रांची परिक्रमा (सर्किट) पूर्ण होणे हे शारीरिक आरोग्यासाठी व मनःशांतीसाठी खूप आवश्यक असते. या परिक्रमेत अडथळा (ब्लॉक) निर्माण होऊ शकतो जसा हृदयाच्या पंपिंगचे सर्किट पूर्ण करणाऱ्या विद्युत प्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो. हा २ एवी हार्ट ब्लॉक मला सद्या चालू आहे जो माझा हृदयविकार आहे. माझ्या याच हार्ट ब्लॉक मधून मला वैज्ञानिक व आध्यात्मिक चक्रे व त्यांची परिक्रमा कळली असे म्हणायला हरकत नाही. संकटे, आव्हाने यांच्यातूनच अशाप्रकारे सकारात्मक गोष्टी कळतात.
निसर्ग विज्ञानाच्या विविधतेची परिक्रमा करताना कोणत्या तरी एकाच गोष्टीत अडकून पडले की वैज्ञानिक परिक्रमा पूर्ण होत नाही. अगदी तसेच परमेश्वरी अध्यात्माच्या विविधतेची परिक्रमा पूर्ण करताना कोणत्या तरी एकाच देव किंवा देवतेत अडकून पडले की सर्व देव देवतांची परिक्रमा पूर्ण होत नाही. निसर्ग हा वैज्ञानिक विविधतेच्या चक्राचा प्रमुख असतो तसा परमेश्वर हा आध्यात्मिक विविधतेच्या चक्राचा प्रमुख असतो. निसर्ग व परमेश्वर एकमेकांशी संलग्न व एकमेकांत मिसळलेले आहेत तसे विज्ञान व अध्यात्म एकमेकांशी संलग्न व एकमेकांत मिसळलेले आहे. निसर्गाचा (सृष्टीचा) निर्माता व नियंता परमेश्वर असल्याने शेवटी वैज्ञानिक व आध्यात्मिक या दोन्ही चक्रांच्या परिक्रमा त्याच्या भोवतीच पूर्ण होत असतात, फिरत असतात.
कालचक्री घड्याळात फिरणाऱ्या वैज्ञानिक व आध्यात्मिक चक्रांची परिक्रमा (सर्किट) पूर्ण करताना एखाद्या वैज्ञानिक गोष्टीतच किंवा एखाद्या आध्यात्मिक गोष्टीतच जास्त वेळ गूंतून, अडकून राहणे म्हणजे दोन्ही चक्रांची परिक्रमा पूर्ण करण्याच्या मार्गात अडथळा/ब्लॉक निर्माण करणे. असा अडथळा (ब्लॉक) वैज्ञानिक दृष्ट्या आणि/किंवा आध्यात्मिक दृष्ट्या अनैसर्गिक असतो. वैज्ञानिक व आध्यात्मिक परिक्रमेत असा अडथळा (ब्लॉक) निर्माण होऊ नये व झालाच तो लवकर दुरूस्त व्हावा म्हणून सर्व देव देवतांची व परमेश्वराची मनोमन प्रार्थना!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा