https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २७ मार्च, २०२४

वधू परीक्षा!

वधू परीक्षा!

हल्ली मुले मुली एकतर अगोदर प्रेम करून आईवडिलांना नंतर सांगतात की अमूक अमूक हा किंवा ही माझा जीवनसाथी/जोडीदार किंवा स्वतःच वधूवर सूचक मंडळाच्या माध्यमातून आपला जोडीदार निवडून आपल्या आईवडिलांपुढे उभा करतात. मग आईवडिलांना लग्न मंडपात जाऊन त्यांना आशीर्वाद द्यायचे तेवढेच  काम उरते.

आमच्या काळात परिस्थिती वेगळी होती. प्रेम विवाहाला विशेष करून घरातूनच अनेक अडथळे निर्माण केले जायचे. त्यामागे आईवडिलांचे तसे ठोस कारणही असायचे व ते कारण म्हणजे आपल्या मुलाला किंवा मुलीला कोणी अनोळखी व्यक्तीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवू नये. माझ्या बाबतीत थोडे असेच झाले. माझे आॕफीसमधल्या एका मुलीवर प्रेम बसले. ती तशी  आमच्याच मराठा जातीतली होती. शिवाय एम.ए., बी.एड. अशी उच्च शिक्षित होती. मीही नोकरी करीत त्यावेळी बी.कॉम. (आॕनर्स), कंपनी सेक्रेटरी (इंटर), एलएल.बी. अशा तीन शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्या होत्या. ती दिसायलाही सुंदर होती. दोघे एकाच ठिकाणी नोकरीत व दोघेही कायम झालेलो. थोडक्यात आमचे ते परफेक्ट मॕच होते.

ती मला म्हणाली "अरे, तुझे घर व आईवडील कधी दाखवतोस"? मी तिला सांगितले की "तू आमच्या घरी गणपतीला ये, देव दर्शनही होईल, घरही बघशील आणि आईवडील पण भेटतील". ती तयार झाली. मग गणपतीत मी आईला ती घरी येतेय तेव्हा काकांना (माझ्या वडिलांना) घरी थांबायला सांग असे सांगितले. आईने वडिलांना तसे सांगितलेही.

मग ती व मी आॕफीस सुटल्यावर आमच्या वरळी बी.डी.डी. चाळीत असलेल्या १२० चौ. फुटाच्या छोट्या खोलीत आलो. पण घरी आलो तर काय माझे वडील अंगावर कधी नाही ती फाटकी बनीयन घालून बसलेले. आईचा चेहरा हिरमुसलेला. कारण माझ्या वडिलांसमोर कोणाचे काही चालत नसे. माझ्याकडे बघत तिने कसेबसे गणपतीचे दर्शन घेतले व आईने दिलेला चहा घेऊन सर्वांना नमस्कार करून मला "चल खाली मला कॕबमध्ये बसवून दे" म्हणाली. मी तिला घेऊन चालत चालत कॕब शोधण्यासाठी जांबोरी मैदानाजवळ येईपर्यंत ती माझ्याशी काही बोलली नाही. मग त्या भयाण शांततेतच मी तिला कॕबमध्ये बसवून दिले. मी घरी आलो तेव्हा फाटक्या बनियनमध्ये बसलेल्या वडिलांना जाम भांडावे असे वाटले पण शेवटी गप्प बसलो व कसेबसे चार घास खाऊन वर गच्चीवर जाऊन झोपलो. त्या रात्री खरंच मी गच्चीवर एकटाच खूप रडलो.

आता पुढची गोष्ट सांगतो. दुसऱ्या दिवशी मी आॕफीसमध्ये गेलो. मला वाटत होते की ती आमचे छोटे घर व आमच्या गरीब, फाटक्या व अशिक्षित माणसांपेक्षा प्रतिकूल परिस्थितीतून एवढे उच्च शिक्षण घेतलेल्या मला किंमत देईल व आपण स्वतंत्र राहू असे म्हणून लग्नाला होकार देईल. पण तिने त्या दुसऱ्याच दिवशी मला नकार दिला. ही होती माझ्या वडिलांनी फाटकी बनीयन घालून तिची घेतलेली साधी वधू परीक्षा. पुढे वडिलांनीच गावी जाऊन दुसरे स्थळ जमवले ती माझी बायको फक्त बारावी शिकलेली पण दिसायला तिच्यापेक्षा सुंदर जिच्या बरोबर मी १९८५ पासून गेली ३९ वर्षे संसार करीत आहे.

ही माझी स्वतःची सत्यकथा आहे. पूर्वी लग्ने ही अशी जमायची व वधू परीक्षा या अशा व्हायच्या. पदराला पदर लागलाच पाहिजे म्हणजे वधू वराच्या कुटुंबांचा धागा हा जवळच्या नातेवाईकांच्या नातेसंबंधात कुठेतरी जुळलाच पाहिजे यावर दोन्ही कुटुंबांचा कटाक्ष असायचा. हल्ली लग्ने कशी जमतात, आॕनलाईन वधूवर सूचक मंडळांनी पैशासाठी लग्नाचा काय बाजार मांडलाय यावर लिहावे व बोलावे तितके कमीच!

-©ॲड.बी.एस.मोरे, २८.३.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा