https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ३१ मार्च, २०२४

मुलांचे यश आणि आईबापांचा बडेजाव!

मुलांचे यश आणि आईबापांचा बडेजाव!

प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या यशाचा आनंद होणे हे नैसर्गिक आहे. परंतु आपण मनुष्य  जन्म घेऊन आपण स्वतः आपल्या आयुष्यात काय कर्तुत्व गाजवले याकडे न बघता नुसत्या मुलांच्या यशाची टिमकी वाजवत फिरणे हे मला तरी पटत नाही. मी इतरांच्या अनुभवावरून नाही तर स्वतःच्या अनुभवावरून बोलतो, लिहितो.

मीही बी.कॉम. (आॕनर्स), कंपनी सेक्रेटरी (इंटर), एलएल.बी एवढे उच्च शिक्षण घेतलेय. परंतु उपयोग काय? या एवढ्या मोठ्या शिक्षणाचा ५% भाग सुद्धा मी माझ्या गेल्या ३६ वर्षांच्या वकिलीत वापरू शकलो नाही. अर्थात माझ्या शिक्षणाच्या मानाने मी ५% एवढेही यश माझ्या आयुष्यात मिळवू शकलो नाही. पण याच्या उलट माझी उच्च शिक्षित मुलगी व माझा उच्च शिक्षित जावई या दोघांनी थोड्याच काळात जगात व्यवहारी बनून या अल्प काळातच एवढे मोठे यश मिळवलेय की त्या यशाच्या ५% एवढेही यश मी माझ्या अख्ख्या आयुष्यात (६७ वर्षाच्या आयुष्यात) मिळवू शकलो नाही. मग मी काय माझ्या मुलीच्या व जावयाच्या यशाची टिमकी वाजवत गावभर फिरावे? मी स्वतः अयशस्वी वकील आहे हे तर जगजाहीर आहे आणि तरीही स्वतःच्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी मी माझ्या मुलीच्या व माझ्या जावयाच्या यशाची टिमकी वाजवत गावभर फिरू? हसतील ना लोक माझ्या या वेडेपणाला आणि हो असे करताना माझी मला स्वतःलाच लाज वाटेल त्याचे काय?

हेच कारण आहे की मी माझी पत्नी, माझी मुलगी व माझा जावई यांच्या सोबतचे कौटुंबिक फोटो समाज माध्यमावर टाकत नाही. तो आनंद फक्त स्वतःपुरताच, इतरांना काय पडलेय त्याचे? मी समाज माध्यमात फक्त माझे स्वतःचे अनुभव व विचार लिहितो. पण त्यालाही काही अर्थ राहिला नाही. अपयशी माणसाचे अनुभव व विचार वास्तव असले तरी लोकांना त्याची काहीही किंमत नसते व ती अपेक्षा करणेही चुकीचे. असो, यशाच्या धुंदीत जगणे सहज सोपे असते पण अपयश पचवून जगणे महाकठीण असते. माझ्या मनाला कसा आवर घालावा? ते गप्प बसत नाही. सारखे व्यक्त होत राहते. ही खरं तर माझी निरर्थक बडबड आहे. लोकांपासून अलिप्त राहू का मी? माझे बोलणे, लिहिणे बंद करू का मी? अशाप्रकारे मौन बाळगणे यालाच अध्यात्म म्हणू का मी?

-©ॲड.बी.एस.मोरे, १.४.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा